Pune News, 26 Feb : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निर्घृण हत्येमागे तीन प्रमुख कारणे असल्याचा दावा सरकारी वकिलांनी विशेष न्यायालयात युक्तिवादा दरम्यान केला आहे. या प्रकरणात २१ आरोपींविरोधात पुणे गुन्हे शाखेने १७०० पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, ३९ साक्षीदार तपासले गेले आहेत.
आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली असून, उर्वरित प्रक्रिया पुढील सुनावणीत पूर्ण होणार आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात आरोपींनी मुद्दाम वीज पुरवठा खंडित केला. त्यानंतर वनराजवर पाळत ठेवून पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केला. यापूर्वीही दोन वेळा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, असे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी हल्ल्यात वापरलेली आठ पिस्तुले, सात कोयते जप्त केली आहेत. तसेच घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब, आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल्स, आवाज नमुने तपास अहवाल, वैद्यकीय अहवाल इत्यादी भक्कम पुरावे सादर करण्यात आले आहेत.
या प्रकरणात वनराज आंदेकरची बहीण संजीवनी कोमकर, जावई जयंत कोमकर, गणेश कोमकर, प्रकाश कोमकर आणि टोळीप्रमुख सोमनाथ गायकवाड (सोम्या) यांच्यासह २१ आरोपींविरोधात कारवाई सुरू आहे. तपास अधिकारी आणि बचाव पक्षाचे वकील उपस्थित नसल्याने आरोप निश्चितीची उर्वरित प्रक्रिया पुढील सुनावणीत होईल, त्यानंतर खटल्याच्या सुनावणेला सुरुवात होईल.
सरकारी वकिलांच्या युक्तिवादानुसार, वनराज आंदेकर यांच्या हत्येमागे खालील तीन कारणे कारणीभूत ठरली आहेत. त्यामध्ये पाहिलं कारण वनराज आंदेकर आणि त्यांची बहीण संजीवनी कोमकर तसेच जावई कोमकर यांच्यात प्रदीर्घ काळापासून कौटुंबिक संपत्तीवरून वाद सुरू होता. हा वाद आर्थिक वर्चस्व आणि कौटुंबिक मतभेदांमुळे तीव्र झाला होता.
हत्येच्या काही दिवस आधी पुणे महापालिकेने संजीवनी कोमकर यांच्या नाना पेठेतील दुकानावर अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. दुकान पाडण्यात आले होते. ही कारवाई वनराज आंदेकर यांच्या सांगण्यावरून झाल्याचा संशय आरोपींना होता, ज्यामुळे त्यांचा राग वाढला.
तर तिसरं कारण निखील आखाडे हा सोमनाथ गायकवाड (सोम्या) टोळीचा सदस्य होता. त्याच्या हत्येचा आरोप आंदेकर टोळीत होता. या प्रकरणी बंडू आंदेकरसह इतरांवर मकोका अंतर्गत कारवाई झाली होती. मात्र, वनराज आंदेकर यांच्या राजकीय वजनामुळे आरोपींना जामीन मिळाला, ज्याचा राग सोमनाथ गायकवाडला होता. या तिन्ही कारणांमुळे सोमनाथ गायकवाड आणि कोमकर टोळी एकत्र आली. दोन्ही टोळ्यांनी मिळून वनराज आंदेकर यांची हत्या करण्याचे ठरवले असल्याचं सांगितलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.