MLA Vijay Wadettiwar Sarkarnama
पुणे

Vijay Wadettiwar News : दलित,ओबीसी, आदिवासींना वापरा अन् फेका ही भाजपची भूमिका ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

Pimpri : हरेगाव (ता.श्रीरामपूर,जि.नगर) येथे दलित तरुणांना अर्धनग्न करून झाडाला उलटे टांगत नुकतीच (ता.२४) झालेली मारहाण ही माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे सांगत आपल्या राजकीय फायद्यासाठी भाजपने पसरवलेल्या द्वेषातून अशा घटना घडत आहेत," असा हल्लाबोल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल केला होता. त्यानंतर याच पक्षाचे माजी मंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही राज्यातील महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

शेळी आणि कबुतरे चोरल्याच्या संशयावरून हरेगावात तीन दलित आणि एक मराठा समाजाच्या मुलाला पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात झालेल्या या अमानूष मारहाणीचा वडेट्टीवारांनी तीव्र निषेध केला.महाराष्ट्रात भाजपचे सरकार असून गृहमंत्रीही त्यांचेच आहेत. ते दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देतील की हे ही इतर प्रकरणांसारखे दाबण्यात येईल ? अशी सांशक विचारणा त्यांनी केली. दलित, ओबीसी,आणि आदिवासी हे वापरासाठी असल्याची भाजपची भूमिका असून त्यांना वापरा आणि फेका असे त्यांचे धोरण आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या राज्यातील अशा घटनांकडे डोळेझाक करून जपानमध्ये मोठमोठ्या वल्गना करतात आणि इकडे त्यांच्या राज्यात समाजमन संतप्त करणाऱ्या घटना घडतात. त्या कायदा आणि सुव्यस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत, अशी टीका वडेट्टीवारांनी केली. हरेगावच्या घृणास्पद कृत्याला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अशा घटनांचा केवळ निषेध करणे पुरेसे नसून त्यातील गुन्हेगारांना कडक शिक्षा होण्याची गरज आहे,असे ते म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT