Vijay Wadettiwar-Ajit Pawar
Vijay Wadettiwar-Ajit Pawar Sarkarnama
पुणे

NCP Vs Congress : अजितदादा, खडा टाकू नका : पुण्याच्या जागेवरून काँग्रेस नेत्याने सुनावले

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत पुन्हा खडाखडी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे, त्याला काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिले आहे. अजितदादांना आमची विनंती आहे की खडा टाकू नका. आपल्याला महाविकास आघाडी म्हणून भक्कमपणे निवडणुकीला सामोरे जायचे आहे, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी पवारांचा दावा फेटाळून लावला. (Vijay Wadettiwar's Reply to Ajit Pawar's Pune Lok Sabha Claim)

खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा सांगितला जात आहे. बापटांच्या निधनानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी खुद्द अजित पवार (Ajit Pawar) यांनीच पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

पुणे (Pune) लोकसभा (Loksabha) मतदारसंघातून काँग्रेसचा गेल्या काही निवडणुकांत पराभव झाला आहे, त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला देण्यात यावी. आमची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त आहे, त्यामुळे आम्ही ही जागा जिंकू शकतो, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्याला काँग्रेसकडून उत्तर देण्यात येत आहे. त्यासंदर्भानेच विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यातून आमचा लोकसभेचा उमेदवार निवडून आला नाही, असे जर अजित पवार म्हणत असतील तर कसब्याची जागा आम्ही किती वर्षांनी जिंकली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. अजितदादांना आमचा आग्रह आणि विनंती आहे की खडा टाकू नका. महाविकास आघाडी म्हणून आपल्या सर्वांना निवडणुकांना भक्कमपणे सामोरे जायचे असेल तर काँग्रेसकडे आहे त्या जागा राहू द्या.

पुण्यात आम्ही कलमाडीपर्यंत जिंकत आलो आहोत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यानंतर पुण्यात आम्हाला अपयश यायला लागले. मागील दोन टर्ममध्ये तर मोदी लाटेमुळे दिग्गजांना हरावे लागले. त्यामुळे पराभवाचा निकष लावून पुण्यावर दावा सांगणे चुकीचे आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत. आमची ताकद, तुमची ताकद हे विषयच नाहीत. आपल्याला लोकसभेला संयुक्त ताकद राबवायची आहे आणि निवडणुकीत वापरायची आहे, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची संयुक्त ताकद आपण म्हणतो. मग आघाडी कशाला म्हणतात. काँग्रेस कमजोर आहे, राष्ट्रवादी मोठी आहे, काही ठिकाणी काँग्रेस मोठी काही राष्ट्रवादी छोटी आहे. कोठे छोटे आणि कोठे मोठे, यापेक्षा आपण संयुक्तपणे लढायचा निर्णय घेतो, त्यावेळी आपण ठरवलं पाहिजे की आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणायचे आहे, तेव्हा वाद होणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT