पुणे

Vinayak Nimhan : ...अन् आमदारकीची हॅटट्रिक मारणाऱ्या निम्हण आबांचं 'हे' स्वप्न मात्र अधुरंच राहिलं!

उत्तम कुटे

Pune Politics : पुण्यातील कोथरूड आणि शिवाजीनगरचे दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण तथा आबांचा आज वाढदिवस. त्यामुळे त्यांची आठवण झाल्याशिवाय कशी राहील? राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील हेही आबा नावानेच परिचित होते आणि ते शांत तसेच संयमी स्वभावाचे म्हणून सर्वपरिचित होते. तर हे आबा (निम्हण) आक्रमक म्हणून ओळखले जात होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

३ जानेवारी २०२३ रोजी निधन झालेले चिंचवडचे भाजप आमदार जे सर्वत्र भाऊ म्हणूनच परिचित होते, असे लक्ष्मण जगताप यांच्यात आणि निम्हण आबांमध्ये एक गुण सारखा होता. दोघांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठी ताकद दिली, त्यांना उभे केले. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी अगदी जीव ओवाळूवन टाकायलाही तयार होते. या दोन्ही नेत्यांच्या पाठीशी कायमच कार्यकर्त्यांचे मोठे मोहोळ असायचे आणि त्यातूनच या दोघांनीही आमदारकीची हॅट्रिक केली होती.

माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्यानंतर विनायक निम्हण यांनी कोथरूडची जबाबदारी सांभाळली. ते प्रथम तेथून १९९९ ला आमदार झाले. पुन्हा २००४मध्ये त्याच मतदारसंघातून निवडून आले. पुढे २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली. कोथरूडचे विभाजन झाले आणि शिवाजीनगर वेगळा मतदारसंघ झाला. यानंतर २०१४ मध्ये तेथून निवडून येत त्यांनी आमदारकीची हॅट्रिक केली. लढाऊ,आक्रमक आमदार म्हणून ते ओळखले जात होते आणि पुण्यातील एक बडं प्रस्थ होते, त्यांच्या लग्नाला खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आले होते.

मेगासिटी प्रकल्पामुळे निम्हण प्रसिद्धीस आले -

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेची कल्पना १९९५ च्या युती सरकारच्या काळात पुढे आली. तेव्हा घाटाखाली आणि घाटावर असे दोन मेगासिटी प्रकल्प उभारून त्यातून एक्स्प्रेस वे चा खर्च वसूल करायचे राज्य सरकारने ठरवले होते. पण, घाटावर त्यासाठी बाणेर-बालेवाडीत हजारो जणांनी घेतलेल्या एकेक, दोन-दोन गुंठ्यांच्या जमिनी त्यात जाणार होत्या. त्यावेळी निम्हण आमदार नव्हते, विभागप्रमुख होते. त्यांनी या मध्यमवर्गीय हजारो गुंठेधारकांचा लढा उभारला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्याची दखल घेतली. अखेरीस मेगासिटी उभारण्याचा बेत रद्द झाला. मध्यमवर्गीयांच्या गुंठा, दोन गुंठा जागेच्या जमिनी मोकळ्या झाल्या. त्यांच्या सातबाऱ्यावरील शिक्के निघाले. या आंदोलनामुळे निम्हणांचे चांगलेच नाव झाले आणि ते पहिल्यांदा १९९९ मध्ये आमदार झाले.

...यामुळे निह्मण नारायण राणेंचे कट्टर समर्थक झाले -

सध्या केंद्रात मंत्री असलेले भाजपचे आक्रमक नेते नारायण राणे हे शिवसेनेत असताना आतापेक्षाही अधिक आक्रमक होते. यामुळे त्यांचा आणि निम्हणांचा स्वभाव जुळला आणि ते त्यांचे कट्टर समर्थक बनले. एवढे की २००५ ला राणेंनी शिवसेना सोडली, तेव्हा ते त्यांच्याबरोबर बाहेर पडले.

राणे कॉंग्रेसमध्ये गेले, निम्हणांनीही तोच रस्ता धरला. राणेंनीही त्यांच्या एकनिष्ठेची कदर केली व त्यांना शिवाजीनगरमधून २००९ ला तिकीट दिले. आपले काम, करिष्मा आणि दबदबा यामुळे ते या पुनर्रचित मतदारसंघातूनही निवडून आले. आमदारकीची हॅटट्रिक केली.

२०१४ ला त्यांची घरवापसी झाली. शिवसेनेत ते परत आले. त्यांना पुन्हा मानाने पुणे शहरप्रमुख करण्यात आले. मात्र, नंतर ते काही वर्षे राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले. व्यवसायावर लक्ष केंद्रित केले, पुण्यातील सनीज वर्ल्ड उभे केले.गेल्यावर्षी ह्रदयविकाराने साठाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. दरम्यान, २०१९ ला त्यांचा मुलगा नगरसेवक सनी याने भाजपमध्ये प्रवेश केला. पण,मग आबाांनी शेवटपर्यंत शिवसेना सोडली नाही.

सोमेश्वर फाऊंडेशनच्या माध्यमातून निम्हण यांनी समाजकार्यास सुरवात केली. नंतर ते राजकारणात आले. तेथील त्यांचा प्रवास अल्पावधीत मोठ्या वेगाने झाला.शाखाप्रमुखनंतर ते १९९५ ला विभागप्रमुख झाले आणि लगेच १९९९ ला आमदार बनले.ते त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आमदारकीनंतर त्यांना खासदार व्हायचे होतं. पण, ते स्वप्न मात्र अपूर्ण राहिले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT