Three Vishrambag Police personnel faced disciplinary action after allegedly taking a complainant to Kaas Plateau during a crime investigation.  
पुणे

Pune police : तपासाच्या नावाखाली पोलिसांची मौजमजा! महिलेला ढाब्यावर नेलं, कास पठारावर फिरवलं! पण ज्या कामासाठी गेले ते न करताच परतले...

Vishrambag Police disciplinary action : विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या तपासासाठी हे पथक तक्रारदार महिलेला सोबत घेऊन साताऱ्याला गेले होते. मात्र, साताऱ्यात पोहोचल्यानंतर कायदेशीर नियमांना हरताळ फाळण्यात आला. नियमानुसार स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती देऊन मदत घेणे आवश्यक होते.

Sudesh Mitkar

Pune News, 30 Jul : गुन्ह्याचा तपास करण्याऐवजी तक्रारदार महिलेला सोबत घेऊन सातारा अन् कास पठारावर 'टुरिझम' करणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर अखेर प्रशासनाची कुऱ्हाड कोसळली आहे. निष्काळजीपणा आणि कर्तव्य चुकीचा ठपका ठेवत अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी या तिघांचीही पुढील दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत.

या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कारवाई झालेल्यांमध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे, पोलीस हवालदार श्रीहरी पाटील, महिला पोलीस शिपाई कोमल कांबळे यांचा समावेश आहे.

नेमके काय घडले?

विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याच्या तपासासाठी हे पथक तक्रारदार महिलेला सोबत घेऊन साताऱ्याला गेले होते. मात्र, साताऱ्यात पोहोचल्यानंतर कायदेशीर नियमांना हरताळ फाळण्यात आला. नियमानुसार स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती देऊन मदत घेणे आवश्यक होते. परंतु, या अधिकाऱ्यांनी तसे न करता आधी साताऱ्यातील कणसे ढाब्यावर जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात केवळ नोंद करून पंचनामा उरकला.

आसपासच्या रहिवाशांकडे गुन्ह्याबाबत कोणताही सखोल तपास केला नाही. पंचनामा संपताच पुण्याला परतणे अपेक्षित असताना, या 'त्रिकुटाने' तक्रारदार महिलेला गाडीत बसवून साताऱ्याजवळील 'कास पठार' आणि इतर प्रेक्षणीय स्थळे फिरण्याचा आनंद लुटला. तपासाच्या नावाखाली थेट पर्यटनाची मजा घेण्याचा बेजबाबदारपणा या प्रकरणात समोर आला.

तक्रारदार महिलेची विनंती धुडकावली!

तक्रारदार महिलेची आजारी आई घरी एकटीच होती. मला लवकर घरी सोडा अशी विनंती ती महिला वारंवार करत होती. मात्र, पोलिसांनी तिच्या विनंतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. पर्यटन संपल्यानंतर हे सर्वजण महिला शिपाई कांबळे यांच्या घरी रात्री जेवले. मध्यरात्री एकच्या सुमारास पुण्यात पोहोचल्यानंतरही या महिलेला तिच्या घरापर्यंत न सोडता, आधी स्वारगेट एसटी स्टँडवर उतरवण्याचा प्रयत्न झाला. शेवटी तिने गयावया केल्यानंतर तिला नारायण पेठ पोलीस चौकीजवळ एकटीला सोडून हे अधिकारी निघून गेले.

चौकशी अधिकाऱ्यांचे कडक ताशेरे

या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती. या प्रकरणाची अंतर्गत चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपआयुक्तांनी केली. सादर केलेल्या अहवालात पोलिसांचा हा नाकर्तेपणा आणि बेजबाबदारपणा सिद्ध झाला.

चौकशी अहवालातील महत्त्वाचा ठपका

"तुम्ही सर्वांनी तपासाच्या नावाखाली केवळ मोघम काम करून पर्यटनस्थळांची पाहणी करण्यात वेळ घालवला. फिर्यादीला सोबत घेऊन गुन्ह्याचा तपास करण्याऐवजी फक्त मौजमजा केली. तुमचे हे वर्तन अत्यंत बेशिस्त, बेजबाबदार आणि निष्काळजीपणाचे असून, यामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाली आहे." या गंभीर ठपक्याच्या आधारेच अप्पर पोलीस आयुक्तांनी तिघांच्याही दोन वर्षांच्या वेतनवाढ रोखण्याचे कडक आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT