Vishwajeet Kadam.jpg sarkarnama
पुणे

Vishwajeet Kadam : विश्वजीत कदमांचा ‘सांगली पॅटर्न’ आता पुण्यातही; तो नेमका कुठे आणि कसा?

सरकारनामा ब्युरो

लोकसभेला अपक्ष विशाल पाटील यांच्यासह 31 जागा मिळाल्यानंतर महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकांवर-बैठका पार पडत आहेत. यातच माजी मंत्री, काँग्रसचे नेते, विश्वजित कदम यांनी 'सांगली पॅटर्न'चा उल्लेख केल्यानं महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील काँग्रेस भवन या ठिकाणी विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आगामी विरोधी पक्ष नेते, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या दौऱ्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते हजर होते. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील काँग्रेसचे युवा नेते, असलेले सत्यशील शेरकर हे देखील उपस्थित होते. यानंतर सत्यशील शेरकर आणि विश्वजीत कदम यांच्यामध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली.

सत्यशील शेरकर हे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पण, जुन्नर विधानसभा मतदारसंघवर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षानं दावा सांगितला आहे. त्यामुळे सत्यशील शेरकर यांची गोची झाली आहे. यावर चर्चा सुरू असताना विश्वजीत कदम ( Vishwajeet Kadam ) यांनी सत्यशील शेरकर यांच्यासाठी थेट 'सांगली पॅटर्न' राबवू, असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

दोघांमध्ये काय झाला संवाद?

यावेळी सत्यशील शेरकर यांना उद्देशून विश्वजित कदम यांनी म्हटलं, "नाहीतर मग थेट सांगली पॅटर्न, तुझ्यासाठी कोणताही पॅटर्न राबवू... नाहीतर मग तुझ्यासाठी मग नवा पॅटर्न काढू.... आम्ही केलं की धाडस." विश्वजीत कदम आणि सत्यशील शेरकर यांच्या या संवादानंतर जुन्नर मध्ये महाविकास आघाडीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल बेनके हे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षातूनच निवडणूक लढवणार असल्याचं बेनके स्पष्ट केल आहे. दुसरीकडे जुन्नर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दावा केला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असणाऱ्या सत्यशील शेरकर यांच्यासमोर मोठ संकट उभे राहिलं आहे. पण, आता विश्वजीत कदम यांनी थेट सत्यशील शेरकर यांच्यासाठी 'सांगली पॅटर्न'च राबवू असं म्हटलं आहे. त्यामुळे जुन्नर विधानसभा मतदारसंघात सत्यशील शेरकर हे आणखी ताकदीनं कामाला लागले आहेत.

काय आहे 'सांगली पॅटर्न'?

लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून विशाल पाटील हे इच्छुक होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला विश्वासात न घेता चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी बेबनाव निर्माण झाला होता. अखेर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला. सांगलीतील निवडणुकीत विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या मैत्रीचे किस्से चर्चिले गेले. त्यामुळे विशाल पाटील यांच्या विजयाचा 'सांगली पॅटर्न' आपण थेट जुन्नर मध्येच राबवू असं विश्वजीत कदम यांनी म्हटल्यानंतर आता राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची नक्की काय भूमिका असणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT