BJP
BJP sarkarnama
पुणे

निवडणुकीच्या तोंडावर भाजप तोंडघशी; आश्वासन पाळता आले नाही

उत्तम कुटे

पिंपरी : गेल्या वर्षभरापासून पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तो १ नोव्हेंबरपासून पूर्ववत होईल, अशी घोषणा पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केली होती. प्रत्यक्षात ही घोषणा हवेतच विरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा दिवाळसणही शहरवासियांना दिवसाआड पाण्याने साजरा करावा लागणार आहे. दुसरीकडे निगडी-प्राधिकरण या शहराच्या उच्चभ्रू परिसरातील काही भागाला मात्र २४ तास पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे आम्ही पाणीपट्टी भरत नाही का अशी विचारणा शहराच्या उर्वरित भागातील नागरिक करीत आहेत.

दरम्यान, १ तारखेपासून संपूर्ण शहराला नाही, तर नोव्हेंबर अखेरपासून दररोज पाणीपुरवठ्याची गरज असलेल्या भागांतच दररोज पाणी दिले जाणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले आहे. तसेच किमान दोन-अडीच दिवसांचा पाणीसाठा करून ठेवणाऱ्या हौसिंग सोसायट्यांना लगेचच दररोज पाणीपुरवठा होणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धरण यावर्षीच्या पावसाळ्यात भरूनही पिंपरी-चिंचवडकरांना मात्र आपली पाण्याची तहान दिवसाआडच भागवावी लागणार आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीसाठी जागतिक निविदा मागवू तसेच तिचे उत्पादन शहरातच आर्थिक अडचणीत आलेल्या एच.ए. कारखान्यात करू,अशी आश्वासने भाजपने यापूर्वी दिली होती. ती प्रत्यक्षात आलीच नाहीत. उलट दररोजचा पाणीपुरवठा दिवसाआड केला आला. त्यासाठी शहरात गेल्या दहा वर्षात दहा लाख लोकसंख्येची भर पडली. पण, एका लिटरनेही पाणीपुरवठ्यात वाढ न झाल्याचे कारण देण्यात आले. पण, ते वाढविण्यासाठी भरीव व ठोस कार्यवाहीही पालिकेने केली नाही. पु्णे महापालिकेने भामा-आसखेड (ता. खेड) धरणातून पाणी आणून त्याचा पुरवठाही सुरु केला. दुसरीकडे तेथूनच मंजूर झालेले पाणी पिंपरी पालिकेला अद्याप आणता आलेले नाही. हीच गत आंद्रा धरणाच्या पाण्याच्या बाबतीतही झाली आहे.

ता. १ नोव्हेंबरपासून संपूर्ण शहरात दररोज पाणीपुरवठा होईल, अशी घोषणा शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी महिन्याभरापूर्वी केली. त्याबाबत कानोसा घेतला असता प्रशासनाकडून तशी तयारीच झाली नसल्याचे दिसून आले. दररोज पाणी देण्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले नसल्याचे सांगण्यात आले. १ तारखेपासून दररोज पाणीपुरवठा होणार नसल्याचे सह अभियंता (पाणीपुरवठा) प्रवीण लडकत यांनी स्पष्ट केले.

नोव्हेंबरअखेरीस दररोज पाण्याची गरज असलेल्या व पाणीसाठा करून ठेवण्याची सोय नसलेल्या भागात म्हणजे झोपडपट्ट्यात तोही टप्पाटप्यांने सुरु केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गृहनिर्माण संस्थांत किमान दोन दिवस पाणीसाठा करून ठेवता येत असल्याने त्या भागात तूर्तास दररोज लगेचच पाणीपुरवठा केला जाणार नाही, अशी माहिती लडकत यांनी दिली. त्यामुळे १ तारखेपासून पुन्हा दररोज पाणीपुरवठा केला जाईल, हे भाजपचे आणखी एक आश्वासन केवळ आश्वासनच ठरणार आहे. त्याचा फटका त्यांना फेब्रुवारीत होणाऱ्या पालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. हा प्रचाराचा मुद्दा केला तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT