Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : ‘आम्हाला खाज होती; म्हणून ‘माळेगाव’चा चेअरमन झालो, आता ‘सोमेश्वर’चाही होणार’ : अजितदादांच्या गुगलीने अनेकांची उडाली झोप

Someshwar Sugar Factory Program : सोमेश्वर साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्प भूमिपूजनात अजित पवार यांनी ‘माळेगावनंतर आता सोमेश्वरचा चेअरमन होणार’ असा विनोद केला. या वक्तव्याने इच्छूक संचालकांमध्ये चर्चेला उधाण आले.

संतोष शेंडकर
  1. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'आता पुढं सोमेश्वरला चेअरमन होणार आहे' अशी विनोदी टिपण्णी करून संचालकांमध्ये चर्चेला उधाण आणले, मात्र नंतर ती फक्त गंमत असल्याचे स्पष्ट केले.

  2. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे 1000 पदांची भरती ‘एमकेसीएल’मार्फत होणार असून ती पूर्णपणे पारदर्शक व्हावी, कुठेही दबाव टाकू नये असा पवारांनी इशारा दिला.

  3. पूरग्रस्त शेतकऱ्यांना 2200 कोटींची मदत थेट बँक खात्यात जमा होणार असून अतिरिक्त निधीसाठी राज्य सरकार केंद्राशी पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Someshwarnagar, 27 September : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे. ‘आम्हाला फार खाज होती; म्हणून ‘माळेगाव’ला चेअरमन झालो. आता पुढं ‘सोमेश्वर’ला पण चेअमरन होणार आहे. सगळ्यांचे रेकॉर्डच मोडतो, अशी मिश्किली टिपण्णी अजितदादांनी केली, त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी इच्छूक असलेल्या संचालकांच्या पोटात गोळा आला.

आता पुढं सोमेश्वर कारखान्याला (Someshwar Sugar Factory) चेअमरन होणार आहे, हे काही खरं नाही. ही गंमत होती. नाहीतर ज्याला चेअरमन व्हायचंय, त्याची झोप उडायची. आम्ही कुठं जाऊ असा प्रश्न इच्छुकांना पडेल, असे स्पष्टीकरणही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले, त्याामुळे ‘सोमेश्वर’च्या इच्छुकांचा जीव भांड्यात पडला असेल.

दरम्यान, बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कारखान्याच्या चेअरमनपदाबाबत भाष्य केल्याने चर्चेला एकच उधाण आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, शहाजी काकडे, आर. एन. शिंदे, प्रमोद काकडे, राजेंद्र यादव, जगन्नाथ लकडे, ऍड. हेमंत गायकवाड, भरत खैरे उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाल्यावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे एक हजार लेखनिक, अधिकारी, शिपाई, चालक यांची भरती होईल. ही भरतीची प्रक्रिया ‘एमकेसीएल’ या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे. कुठं वजन ठेवावं लागलं, असं माझ्या कानावर येता कामा नये, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

अजित पवार म्हणाले, आस्मानी संकट कोसळलेल्या पूरग्रस्तांना 2200 कोटींची मदत दिली आहे. ती थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून अधिकचा निधी मिळविण्यासाठी मुख्यमंंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ प्रयत्न करत आहे. प्रकल्पग्रस्तांना निकषांपेक्षा अधिकचा निधी कसा देता येईल, ते आम्ही पाहतोय. निधीची कुठेही कमतरता भासू देणार नाही. आम्ही उपकार करत नाही, तर कर्तव्यच करत आहोत.

  1. प्र: अजित पवारांनी कोणत्या कारखान्याच्या अध्यक्षपदाबाबत विनोद केला?
    उ: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना.

  2. प्र: सहकारी बँकेत किती पदांची भरती होणार आहे?
    उ: अंदाजे 1000 पदांची.

  3. प्र: पूरग्रस्तांना किती आर्थिक मदत दिली जाणार आहे?
    उ: २,२०० कोटी रुपये थेट बँक खात्यात.

  4. प्र: भरती प्रक्रिया कोणत्या संस्थेकडे सोपवली आहे?
    उ: एमकेसीएल (MKCL) संस्थेकडे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT