Anand dave criticizing On BJP : पुण्याचे खासदार व भाजप नेते गिरीश बापट नाकात नळी, ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हिलचेअरवरुन कसबा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले होते. यावरुन राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. कारण बापटांच्या प्रचारातील सहभागावरुन आघाडीतील नेतेमंडळींकडून भाजपवर निशाणा साधला आहे. कसबा मतदारसंघातील हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनीही यावरुन भाजपवर घणाघाती टीका करताना मोठा निर्णय घेतला आहे.
आनंद दवे यांनी गिरीश बापटांच्या प्रचारातील सहभागावरुन भाजपवर टीका केली आहे. यावेळी दवे म्हणाले, गिरीश बापटांना पाहून पर्रीकर आठवले. आज मी व्यक्तिशः प्रचार करणार नाही. त्रास बापटसाहेबांना होत होता. पण यातना आम्हाला जाणवत होत्या असं दवे यावेळी म्हणाले. तसेच आमच्या भूमिकेमुळे हे घडत आहे याचा मानसिक त्रास आम्हांला होत असल्यामुळे आज व्यक्तिशः प्रचार करणार नसल्याचं ठरवलं आहे असंही आनंद दवे(Anand Dave) यांनी जाहीर केलं आहे.
...आणि पुन्हा एकदा बापट मैदानात उतरले!
गेले ३ महिने प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी खूप कमी काम केले असून मला सध्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला आहे. या कारणास्तव पोटनिवडणुकीसाठी मी वैयक्तिकरित्या मतदारसंघात फिरून प्रचार करू शकणार नाही असं बापट यांनी स्पष्ट करत पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती.
मात्र, यानंतर काहीच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसब्याचे किंगमेकर गिरीश बापट यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा ते मैदानात उतरले. पुण्यातील केसरी वाड्यात भाजपची नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन केले.मात्र, यानंतर प्रकृती ठिक नसतानाही भाजपच्या प्रचारात ते सहभागी झाल्यामुळे विरोधकांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
'' भाजप बापटांच्या जीवाशी खेळतंय..''
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपला या मुद्द्यावरून टीका केली आहे. जगताप म्हणाले, गिरीश बापट उद्यापासून प्रचारात उतरत आहेत. मुळातच त्यांची प्रकृती अस्वस्थ असताना भाजपने त्यांना प्रचारासाठी येण्याची गळ घातली आहे. गेल्या पाच वर्षात गिरीश बापट यांना भाजपने पक्षांच्या निर्णयापासून लांब ठेवले. भाजपचे मेळावे, कार्यक्रम यामध्ये साधे त्यांचे फोटोही लावले नाहीत.
मात्र,आज कसब्यात भाजपचा उमेदवार अडचणीत आल्यावर देशातील, राज्यातील नेत्यांना बापट यांची आठवण झाली. हेच भाजपच पराभवाचं लक्षण आहे. बापट यांना आजारपणातही प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जीवाशी खेळतंय अशी टीका जगताप यांनी केली होती.
..म्हणूनच बापटांना भाजपाने मैदानात आणलं!
ठाकरे गटाचे नेते व खासदार विनायक राऊत यांनीही भाजपवर बापटांच्या प्रचारावरुन हल्लाबोल केला आहे. पुणे येथील कसबा पोटनिवडणुकीत फक्त ब्राह्मणांची मते मिळवण्यासाठी दुर्धर आजारात ऑिक्सजनवर असलेल्या खासदार गिरीश बापटांना मैदानात उतरवलं जातं हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने कमकुवतपणाचे लक्षण आहे.
पंतप्रधान, गृहमंत्री पुण्याला येऊन सुद्धा मत मिळणार नाही ही खात्री पटल्यामुळेच गिरीश बापटांना भाजपाने मैदानात आणलं.खासदार विनायक राऊत म्हणाले हे दुर्देवी आहे. ब्राह्मणांची मतं मिळविण्यासाठी केले गेले असा आरोपही राऊत यांनी यावेळी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.