Pune, 06 October : माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाला पवारांचे निष्ठावंत म्हणून ओळख असणारे सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्यासह पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूरचे भरत शहा यांनी विरोध दर्शविला होता.
मात्र, निष्ठावंतांच्या विरोधानंतरही पवारांनी पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यांचा उद्या (सोमवारी, ता. 07 ऑक्टोबर) राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. मात्र, पाटलांच्या तुतारी फुंकण्याला विरोध दर्शविणारे माने, जगदाळे, शहा यांची भूमिका काय असणार, याकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
लोकसभा निवडणुकीत आप्पासाहेब जगदाळे, दशरथ माने (Dashrath Mane), भरत शहा यांनी शरद पवार यांना साथ दिली होती, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) निष्ठावंतांना उमेदवारी मिळावी, अशी त्यांची मागणी होती. त्यातूनच इंदापूरसाठी महारुद्र पाटील, अशोक घोगरे, आप्पासाहेब जगदाळे, सागर मिसाळ, अमोल भिसे, प्रवीण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागितली आहे.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंतांच्या गटाने बारामतीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत दशरथदादा माने यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला विरोध दर्शवला होता. त्यांच्या भाषणाची क्लिप सोशल माध्यमातून व्हायरल झाली होती. पवारांसमोर त्यांनी जोरदार बॅटिंंग केली होती.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातून महारुद्र पाटील, अशोक घोगरे, आप्पासाहेब जगदाळे, सागर मिसाळ, अमोल भोसले, प्रवीण माने यापैकी कोणालाही विधानसभेची उमेदवारी द्यावी. त्यांच्यासाठी आम्ही काम करू, अशी विनंती दशरथ माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी केली होती. दशरथदादांचे पवारांसमोरील भाषण चांगलेच गाजले होते.
'आम्ही किती दिवस थांबायचं?'
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर इंदापूर तालुक्यात बूथ कमिट्या स्थापन करताना आम्हाला माणूस मिळाला नाही. इंदापुरात आम्हाला दोन मोठे विरोधक होते, त्यांच्या तावडीतून वाचून आम्ही कसंतरी आमच्या तंबूत येऊन बसलोय. पण, आता आमचा तंबू लुटून चालला आहात. लोकसभेपेक्षा इंदापूर तालुक्यात स्फोटक परिस्थिती असून जो कोणी उभा राहील, तो फक्त शरद पवार यांच्यामुळे निवडून येणार आहे, त्यामुळे आम्ही किती दिवस थांबायचं, असा सवालही दशरथ माने यांनी केला.
'त्यांना घरी बसविल्याशिवाय शांत बसणार नाही'
आमच्या सहा जणांपैकी कोणालाही उमेदवारी द्या. आम्ही सर्वजण एकत्र काम करू. पण, जिथे तुमचा अपमान होतो, तो आम्ही सहन करणार नाही. आपल्याला जे सोडून गेले आहेत, त्यांना घरी बसविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही आपासाहेब जगदाळे यांनी शरद पवार यांच्यासमोर दिला होता.
निष्ठावंतांच्या विरोधानंतरही शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादीत घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. उद्या (ता. 07 ऑक्टोबर) त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असून त्यासाठी खुद्द शरद पवार इंदापुरात येणार आहेत.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या घोषणेपासून पवार निष्ठावंतांचा गट शांत आहे. पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर त्यांनी अद्यापपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळे माने, जगदाळे, शहा गटाचे भूमिका काय असणार, याकडे इंदापूरचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.