Dhananjay Desai, Kalicharan Maharaj
Dhananjay Desai, Kalicharan Maharaj Sarkarnama
पुणे

Hindu-Muslim Politics : पुण्यात अजित पवारांवर अर्वाच्य भाषेत टीका करणारे देसाई भोसरीत काय बोलणार?

सरकारनामा ब्युरो

PCMC News : पुण्यातील रविवारच्या (दि. २२) हिंदू जनआक्रोश मोर्च्यात हिंदूराष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका केली होती. देसाई यांच्यासह कालीचरण महाराज अशी दोन वादग्रस्त व्यक्तीमत्व आज (२४ जानेवारी) एकाच वेळी सायंकाळी भोसरीत (पिंपरी-चिंचवड) येणार आहेत. तेथे ते काय काय बोलणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

दरम्यान, उद्योगनगरीत शांतताभंग आणि धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी कालीचरण महाराज व धनंजय देसाई यांना शहरात येण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी 'एमआयएम`चे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केली होती.

त्याबाबत त्यांनी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन दिले होते. त्याकडे दुर्लक्ष करून भोसरी पोलिसांनी त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. त्यास आयोजक अभिजीत लांडगे यांनी `सरकारनामा`शी बोलताना दुजोरा दिला आहे.

या दोन्ही व्यक्ती वादग्रस्त असूनही त्यांना का बोलावले, यावर लांडगे म्हणाले, "ते व आमचे घराणे असे दोन्ही अधात्माच्या विचाराचे आहेत. त्यातून त्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित भागवत कथा सांगता समारंभाला निमंत्रित केले आहे". देसाईंचे मार्गदर्शन सायंकाळी सहाला, तर कालीचरण महाराजांचे 'शिवतांडव स्तोत्र पठण'त्यानंतर होणार आहे.

दरम्यान, देसाई आणि कालीचरण महाराजांना शहरात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यासंदर्भात पोलिसांना लिहिलेल्या पत्रात 'एमआयएम`ने म्हटले आहे की, दोन जून २०१४ रोजी पुण्यातील मोहसीन शेख या तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या खूनप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या २१ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यात या संघटनेचे अध्यक्ष देसाईंचाही समावेश होता.

प्रक्षोभक भाषण न देण्यासारख्या काही अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याचे पालन ते करीत नाहीत. वादग्रस्त विधाने, धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये ते करीतच आहेत. कालीचरण महाराज म्हणून नावारूपाला आलेले तथाकथित महाराज हे देखील कायम वादग्रस्त विधाने करतात. त्या विधानांची अनेक उदाहणे साळवे यांनी पत्रात दिली आहेत.

वादग्रस्त वक्तव केल्याप्रकरणी या दोघांवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. याकडे लक्ष वेधून त्यांच्या वक्तव्यामुळे पिंपरी चिंचवडची शांतता भंग होऊन धार्मिक तेढ निर्माण होऊ शकतो, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT