Pune, 17 January : माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ‘आम्ही सध्या आहे, तिथंच आहोत,’ असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाव घेणे टाळले. मात्र, भाजपमध्ये गेल्यानंतर शांत झोप लागते, असे विधान करणारे पाटील यांनी आज राष्ट्रवादीतही ‘झोप लागायला काही अडचण नाही, ’ असे विधान केले आहे. त्यामुळे पाटलांच्या लोणावळ्यातील विधानाची प्रामुख्याने आठवण झाली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil ) यांनी आज पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात साखर हंगामासंदर्भात बैठक घेतली. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी ऊस गाळप हंगाम, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भेट, विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि शांत झोप लागण्याच्या मुद्यावर मोकळेपणाने संवाद साधला.
पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) पराभवानंतरही माझं काम चालूच आहे. मी सार्वजनिक जीवनात काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्याकडं बरीच कामं असतात, त्यामुळे माझी कामं चाललेली आहेत. निवडणुकीत हार-जीत होतच असते, त्यामुळे त्या गोष्टी चालू राहतात, माझेही काम सध्या चालू आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीबाबतही हर्षवर्धन पाटील यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, साखर आयुक्त कार्यालयात आमची बैठक होती. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही या ठिकाणी आले होते. पद्मश्री विखे पाटील यांचा साखर आयुक्त कार्यालयात जो पुतळा आहे, तो उभारण्यासाठी मी सहकार मंत्री असतानाच परवानगी दिली होती. या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू आहे, त्यामुळे त्याच्या शिफ्टिंगसाठी ते आले होते. त्या वेळी आमची भेट झाली.
राधाकृष्ण विखे पाटील हे आमचे मित्र आहेत. आम्ही एकत्र बसलो, चहा घेतला. त्या भेटीवेळी साखर आयुक्त आणि सर्व अधिकारीही उपस्थित होते, त्यामुळे ती काय खासगी भेट नव्हती, असे स्पष्टीकरणही माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीतील पराभवावर खूप चर्चा झाली आहे. आम्ही सध्या आहे तिथंच आहोत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले खरे पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाव घेणे त्यांनी टाळले. तसेच, झोप लागायला काही अडचण नाही. तुम्हाला लागते म्हटल्यावर आम्हाला लागते, असे उत्तर हर्षवर्धन पाटील यांनी झोप लागण्याच्या मुद्यावर दिले.
लोणावळ्यात हर्षवर्धन पाटील काय म्हणाले होते?
हर्षवर्धन पाटील यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर लोणावळ्यातील एका कार्यक्रमात बोलताना पाटील यांनी भाजपमध्ये आल्यामुळे मला आता शांत झोप लागते, असे विधान केले होते. त्यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी, सीबीआय आणि इनकम टॅक्सकडून मोठ्या प्रमाणात चौकशा सुरू हेात्या, त्यामुळे त्या विधानाची राज्यात मोठी चर्चा झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.