BJP News : जॅकवेल उभारण्याची दीडशे कोटी रुपयांची निविदा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने पुण्याचे भाजप खासदार गिरीष बापट यांच्या निधनदिनीच (२९ मार्च) मंजूर केली. त्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसने करोडो रुपये लाटण्यासाठी आयुक्तांच्या माध्यमातून करण्यात आलेला हा प्रकार निषेधार्ह आणि निंदनीय असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला.
भाजपच्या स्थानिक नेत्याने स्वहित आणि भ्रष्टाचारासाठी असंवेदनशीलतेचा हा कळस गाठला आहे, असे म्हणणाऱ्या गव्हाणेंचा रोख हा पिंपरी-चिंचवड शहर कारभारी आणि भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या दिशेने आहे.
कारण या निविदा प्रक्रियेत वीस-पंचवीस कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ३ जानेवारीला निधन झालेले भाजपचे शहरातील दुसरे आमदार चिंचवडचे लक्ष्मण जगताप यांनीही केला होता.
मात्र, त्याला न जुमानता २९ मार्चला प्रशासनाने हा विषय स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभेतही मंजूर केला.त्यावरून गव्हाणेंनी भाजपच्या स्थानिक नेत्याला आज लक्ष्य केलं. काळ्या यादीतील गोंडवाना कंपनीला हे काम देणे बेकायदेशीर असल्याने त्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधावयाच्या जॅकवेलसाठी गोंडवाना इंजि. कंपनीने महापालिकेला निविदा सादर करताना खोटी माहिती दिल्याचा गव्हाणेंचा दावा आहे.
ही कंपनी काळ्या यादीत असल्याची माहिती दडविण्यात आल्याने त्यावर आक्षेप घेत ही निविदा प्रक्रिया राबवू नये आणि ही कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्याकडे केली होती.मात्र, त्याकडे आयुक्तांनी दूर्लक्ष करीत या निविदेला मंजुरी दिली आहे.
त्यावर गोंडावना कंपनीच्या माध्यमातून भाजपला 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करावयाचा आहे. म्हणूनच जॅकवेलच्या कामासाठी 121 कोटींची तरतूद असतानाही या कामासाठी 151 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान,राष्ट्रवादीच्या विरोधानंतर ही निविदा बाजूला ठेवण्यात आली होती.परंतू, बापटांचे निधन ही आपल्यासाठी संधी असल्याचे समजून आयुक्तांच्या माध्यमातून या निविदेला मंजूरी देण्यात आली, ही बाब अत्यंत क्लेषदायक आहे,अशी खंत गव्हाणेंनी व्यक्त केली.
२९ मार्चला बापटांच्या निधनाचा सर्वपक्षीय नेते शोक व्यक्त करत असताना भाजपच्या नेत्यांनी मात्र स्वार्थासाठी जॅकवेलची निविदा मंजूर केली, त्यातून त्यांचे खरे चेहरे उघडे पडले.आपल्याच पक्षाच्या नेत्याने निधन ही भ्रष्टाचारासाठी संधी समजावी, इतके घाणेरडे राजकारण आजपर्यंत कधीच झाले नव्हते,असे टोलाही गव्हाणेंनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.