NCP MP Supriya Sule
NCP MP Supriya Sule sarkarnama
पुणे

कोण म्हणतं रेल्वे प्रशासन खासदारांचे ऐकत नाही...सुप्रिया सुळेंना आला वेगळा अनुभव

Umesh Bambare-Patil

पुणे : दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस नगर रेल्वेस्थानकावर काल बारा तास थांबवली होती. त्यानंतर थेट पुण्याऐवजी सोलापूर मार्गे ही जाईल, अशी घोषणा झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. ही बाब खासदार सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाशी संपर्क करत रेल्वे पुण्याहूनच पाठविण्याची सूचना केली. रेल्वे प्रशासन व अधिकारी खासदारांचे ऐकत नसल्याची तक्रार करत रेल्वे समितीच्या अध्यक्षपदाचा भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजीनामा दिला. पण, ही घटना पाहता खासदार सुप्रिया सुळे यांना मात्र, वेगळाच अनुभव आल्याचे चित्र आहे.

दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस काल नगर स्टेशनवर पोहोचली. त्यानंतर काही तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तब्बल १२ तास ही रेल्वे त्याच स्थानकावर थांबविण्यात आली. त्यानंतर नेहमीच्या पुणे मार्गे ही रेल्वे न सोडता ती सोलापूर मार्गे जाईल, असे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

पुणे आणि दौंडला उतरणाऱ्या प्रवाशांची अडचण झाली. ही बाब प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यावेळी काही प्रवाशांनी राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकारी लोचन शिवले व बारामती लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक प्रवीण शिंदे यांच्या मार्फत खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून ही बाब लक्षात आणून दिली.

त्यानुसार खासदार सुळे यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्याशी तत्काळ संपर्क साधून प्रवाशांच्या अडचणी सांगितल्या. त्यांना प्रवाशांची अडचण लक्षात आणून देत त्यांच्या सोयीसाठी व्यवस्था करण्यास सांगितले. त्यानंतर अखेर रेल्वे विभागाने निजामुद्दीन एक्सप्रेस सोलापूरकडे न वळवता नेहमीच्या मार्गाने दौंडमार्गे पुण्याला आणण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार गाडी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकांवर पोहोचली. त्यामुळे पुणे व दौंडच्या प्रवाशांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार मानले. दोन दिवसांपूर्वी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे प्रशासन खासदारांचे ही ऐकत नाही, असा आरोप करत रेल्वे समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच नऊ खासदारांनी रेल्वे समितीच्या बैठकीतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना रेल्वे प्रशासन व अधिकाऱ्यांचा वेगळा अनुभव आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT