Someshwar Sugar Factory
Someshwar Sugar Factory  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : 'सोमेश्वर'च्या उपाध्यक्षपदासाठी अजित पवार कोणाला संधी देणार? 'ही' नावे आघाडीवर

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (जि.पुणे) : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची निवड शुक्रवारी (ता.३०) होणार असून यादृष्टीने इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने प्रयत्न सुरू केले आहेत. येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी कोणाच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ टाकतात याकडे कार्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे. (Someshwar Cooperative Sugar Factory)

या निवडीचे अधिकार संचालक मंडळाने अजित पवार यांना दिले आहेत. ‘सोमेश्वर’सारख्या राज्यातील नामांकित कारखान्याचे उपाध्यक्षपद मानाचे असल्याने तसेच त्याव्दाद्वारे शिक्षणसंस्थांवरही काम करण्याची संधी मिळणार असल्याने इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे.

सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ऑक्टोबर २०२१ मध्ये झाली होती आणि ८ नोव्हेंबरला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी झाल्या होत्या. यामध्ये सर्वप्रथम आनंदकुमार होळकर यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. सक्रिय कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.

आता ग्रामपंचायत निवडणुका संपताच जिल्हा निवडणूक (Election) प्राधिकरणाने उपाध्यक्ष निवड घेण्याचे निश्चित केले. ३० डिसेंबरला सकाळी अकरा वाजता संचालक मंडळाच्या सभेत ही निवड प्रक्रिया होणार असून बारामतीचे सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

यांच्या नावाची चर्चा

फेब्रुवारीच्या सुरवातीला ग्रामपंचायत निवडणुकांचा दुसरा टप्पा होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे संकेत आहेत. त्यादृष्टीने कारखान्याचे उपाध्यक्षपद मागास घटकातील संचालकांना जाईल, अशी शक्यता आहे.

यामध्ये करंजे परिसरातील उद्योजक संग्राम सोरटे, कोऱ्हाळे खुर्दच्या माजी सरपंच प्रणिता खोमणे, तरडोलीचे माजी सरपंच किसन तांबे, अशा चेहऱ्यांना संधी मिळू शकते. किंवा याच निवडणुका डोळ्यापुढे ठेवून वातावरणनिर्मितीसाठी पुरंदर तालुक्यालाही संधी मिळू शकते.

संपूर्ण पुरंदर तालुकाच कारखान्याचे कार्यक्षेत्र असून तालुक्यात पाच संचालक आहेत. यामध्ये ज्येष्ठ संचालक विश्वास जगताप, नीरा बाजार समितीवर प्रभावी काम केलेले सभापती बाळासाहेब कामथे, दोनदा संचालक झालेले शांताराम कापरे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. ज्येष्ठत्वाचा विचार करता शिवाजीराव राजेनिंबाळकर यांचेही नाव पुढे येऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT