PMC Ward : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरुन आता राजकीय शीतयुद्ध पेटण्याची शक्यता आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये नाराजी नाट्य रंगू शकतं. कारण पुण्याच्या प्रभाग रचनेत या तिन्ही नेत्यांचा प्रत्यक्षपणे हस्तक्षेप असणार आहे. याच हस्तक्षेपामुळं या तिन्ही नेत्यांमध्ये काही प्रमाणात नाराजीचं वातावरण निर्माण होऊ शकतं.
नुकतीच जाहीर झालेल्या प्रभाग रचनेचं प्रारुप पुणे महानगरपालिकेकडून राज्याच्या नगर विकास खात्याकडं पाठवण्यात आलं होतं. नगर विकास खात्याच्या मंजुरीनंतर ही प्रभाग रचनेची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण महापालिकेनं नगर विकास विभागाकडं पाठवलेल्या प्रस्तावात तीन प्रभाग-तीन सदस्य असा प्रस्ताव पाठवला होता. जो तिथून तीन सदस्य प्रभाग न ठेवता चार सदस्यीय प्रभाग करण्यात आला. त्याचबरोबर एका प्रभागात पाच सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
महापालिकेनं पाठवलेला तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा प्रस्ताव हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्यानं झाला असण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजपला अनुरुप होईल अशा पद्धतीची रणनीती यामध्ये आखलेली असू शकते. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री देखील आहेत, पुणे शहरामध्ये त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा मतदारदार वर्ग आहे. त्यामुळं पालकमंत्री या नात्यानं त्यांनी देखील महापालिकेच्या प्रस्तावात काही बदल सुचवले असण्याची शक्यता आहे.
तर तिसरीकडं राज्याच्या नगर विकास विभागाचे मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळं त्यांच्या शिवसेनेला अनुरुप ठरेल अशा प्रकारे बदल शेवटी प्रस्तावात झालेला असू शकतो. पण मूळ प्रस्तावात तीन सदस्यीय प्रभागाचा उल्लेख असताना तो प्रत्यक्षात नगर विकास विभागानं चार सदस्यीय प्रभागात परावर्तीत केला असून यावर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती येऊन त्यानंतर ही प्रभाग रचना अंतिम होणार आहे. पण तोपर्यंत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या शीतयुद्धात अजित पवारांचाही भर पडू शकते.
दरम्यान, पुणे महापालिकेनं जाहीर केलेल्या या प्रभाग रचनेत एकूण ४१ प्रभाग करण्यात आले आहेत. यामध्ये महापालिकेच्या हद्दीत नव्यानं समाविष्ट झालेल्या २३ गावांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ४० प्रभाग हे प्रत्येकी चार सदस्यीय आहेत तर ४१ वा ३८ क्रमांकाचा प्रभाग हा ५ सदस्यांचा असणार आहे. या एकाच प्रभागात १ लाख १४ हजार ७९० मतदार असणार आहेत. या प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्यासाठी २२ ऑगस्टपासून ४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.