Jagdish Mulik, Murlidahr Mohol, Sunil deodhar  Sarkarnama
पुणे

Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळांचे स्वप्न श्रीराम पूर्ण करणार? उमेदवारीसाठी मोहोळ, मुळीकांमध्ये 'कॉम्पिटिशन'

Chaitanya Machale

Pune News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच इच्छुकांनी जोरात सुरू केली आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये भाजपमधील इच्छुकांनी आघाडी घेतली आहे.

लोकसभा निवडणूक लढविण्यास पुण्यातून इच्छुक असलेले माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यात कार्यक्रमावरून जोरदार चढाओढ सुरूच आहे. नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मुळीक यांनी आरोग्य शिबिर भरविले होते, तर मोहोळ यांनी ' अपने अपने राम' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यापूर्वी मुळीक यांनी बागेश्वर बाबा यांचा हनुमान कथा कार्यक्रम आयोजिला होता.

लोकसभा निवडणुकीसाठी माजी महापौर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासह वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मुळीक (Jagdish Mulik) हे इच्छुक आहेत. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आपल्याला पक्षाकडून संधी मिळावी, यासाठी अनेक इच्छुक उमेदवार प्रयत्नशील असून त्यामध्ये मोहोळ, मुळीक हे आघाडीवर होते. मात्र, निवडणूक आयोगाने पुण्याच्या जागेसाठी कोणतीही निवडणूक न घेतल्याने सर्वच इच्छुकांचा हिरमोड झाला.

पाच राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांतच आता लोकसभेच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. त्याचे संकेतदेखील केंद्र पातळीवरील नेत्यांनी दिलेले आहेत. पुणे लोकसभेची जागा गेल्या दोन निवडणुकीत भाजपला मिळाली होती. त्यामुळे उमेदवारी मिळाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा यामुळे ही जागा मिळविणे फारसे अवघड नाही. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन इच्छुक उमेदवारांकडून सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यापूर्वीदेखील मोहोळ यांनी रक्तदान शिबिर, दिवाळी फराळ असे कार्यक्रम आयोजित करत नागरिकांपर्यंत पोहोचले आहेत, तर मुळीक यांनी बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वरमहाराज यांचा सत्संग कार्यक्रम घेऊन शहरभर संपर्क साधला आहे. मोहोळ यांच्या कार्यक्रमासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मुळीक यांनी घेतलेल्या बागेश्वरमहाराज यांच्या कार्यक्रमाच्या दरबारात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.

नुकतेच मुळीक यांनी शहरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजिले होते. यामध्ये नागरिकांच्या विविध प्रकारच्या आरोग्याच्या तपासण्या करण्यात आल्या. आता अयोध्या येथे 22 जानेवारीला राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. याचे औचित्य साधून मोहोळ यांनी 'अपने अपने राम ' हा रामकथांचा कार्यक्रम घेतला आहे. प्रसिद्ध कवी तत्त्वज्ञ अभ्यासक डॉ. कुमार विश्वास तीन दिवस विचार मांडणार आहेत.

इतर इच्छुक फारसे 'ॲक्टिव्ह' नाहीत

या दोघांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर (Sunil Deodhar), माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, या पैकी देवधर वगळता इतर इच्छुक फारसे 'ॲक्टिव्ह' नाहीत. त्यामुळे या नावांमध्ये केवळ दोन ते तीन जणांची जोरदार चर्चा उमेदवारीसाठी सुरू आहे. मात्र असे असले तरी जे मोठे कार्यक्रम घेतात त्यांनाच पक्षाचे तिकीट मिळतेच असे नाही, असे भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

(Edited By sachin waghmare)

R...

SCROLL FOR NEXT