Yugendra Pawar -Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Yugendra Pawar : ‘माळेगाव’च्या निकालाबाबत युगेंद्र पवारांचे मोठे भाकित; ‘अजितदादांचा पराभव होऊच शकत नाही, पण त्यांचे पॅनेल पडणार’

Malegaon Sugar Factory Election : माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पराभव होऊच शकत नाही. त्यांनी ‘ब’ वर्ग म्हणजे सोसायटी गटातून अर्ज भरला आहे. त्या गटात फक्त शंभर मतदार आहेत.

Vijaykumar Dudhale

Baramati, 20 June : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालाबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार यांनी मोठे भाकित केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत पराभव होऊच शकत नाही, असे सांगताना त्यांच्या पॅनेलचा मात्र पराभव होईल, असे युगेंद्र पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा पराभव होऊच शकत नाही. त्यांनी ‘ब’ वर्ग म्हणजे सोसायटी गटातून अर्ज भरला आहे. त्या गटात फक्त शंभर मतदार आहेत, त्यामुळे अजित पवारांचा सोसायटी गटातून पराभव होऊच शकत नाही. कारण, सर्व सोसायट्या आज त्यांच्याच हातात आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांचे उमेदवार 80 ते 90 टक्के मते घेऊन निवडून येतात. आता तर खुद्द अजित पवारच त्या गटातून निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळे ते सहज निवडून येतील. पण, त्यांच्या पॅनेलाचा पराभव होईल, असे भाकीत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी केले आहे.

युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आमराई शाखेत घडलेल्या प्रकारावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वेल्हे शाखेत झाले, तेच दोन दिवसांपूर्वी बारामतीमधील आमराई शाखेत झाले आहे. एखाद्या वेळी कामाचा लोड वाढत असेल, त्यामुळे त्यांना रात्री उशिरापर्यंत जास्त काम करावं लागत असेल.

पुणे जिल्हा सहकारी बॅंकेची शाखा साडेअकरा ते बारापर्यंत उघडी ठेवत असतील, तर ती नक्की कशासाठी ठेवत असतील, याबाबत माहिती नाही. पण, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Sugar Factory) सभासदांच्या याद्या बॅंकेत सापडल्या. त्यांच्या ताब्यातील सहकारी संस्था आहेत, त्याची एक यादी सापडली. त्या संस्थेत काम करणारे कर्मचारी, त्यांचे पाहुणे आणि त्यांचे नंबर हे सर्व सापडले आहे, असा दावाही युगेंद्र पवारांनी केला.

आम्ही फक्त अजित पवारच नाही, तर चंद्रराव तावरे आणि रंजन तावरेंना निवडणुकीत एकत्र येण्यासाठी प्रस्ताव दिला होता. सर्वांनी एकत्र यावं आणि सभासदांचा फायदा आपण सर्वांनी मिळून बघितला पाहिजे, या विचाराचे शरद पवार होते. आम्हीही त्या विचारानेच पुढे जात आहोत. पण, ते काही झालं नाही, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी एका साखर कारखान्याची निवडणूक लढवावी का?, या प्रश्नावर युगेंद्र पवार म्हणाले, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांना कारखान्याचे चेअरमन होण्याची इच्छा असेल तर ठीक आहे. आपण काय करणार. पण राज्याचे उपमुख्यमंत्रिपद हे मोठे पद आहे. आमचं म्हणणं असं आहे की, कारखान्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्याला संधी द्या ना. भरपूर इच्छूक असतात. त्यांचं स्वप्न असतं की कधीतरी मी कारखान्याचा चेअरमन होईल. अशा लोकांना संधी दिली पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT