पुणे : पेपरफुटी प्रकरणी (Maharashtra Government examination paper leak case) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंना (Tukaram Supe) अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेनंतर पुणे पोलिसांना अजून धागेदोरे सापडत आहेत. सुपेंच्या अनेक ठिकाणच्या मालमत्तेवर छापेमारी सुरू करण्यात आली आहे. या छापेमारीत पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले असून याप्रकरणी अजून महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. यावरून राज्यातील घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे ट्विटरच्या माध्यामातून केली आहे.
फडणवीस ट्विटमध्ये म्हणाले, "टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढले." तर, दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले, "आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी."
याप्रकरणाची आता "सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्या खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर, हे प्रकरण सीबीआयला सोपवा," अशी मागणी फडणवीसांनी ट्विटच्या माध्यमातून मुंख्यमंत्र्याकडे केली आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने पेपर फुटीचे सत्र सुरू आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर मोठी नामुश्की आली आहे. सैनिक भरती पेपरमध्ये गैरव्यवहार झाल्यावर या प्रकरणाचा तपास करतांना यामध्ये सहभागी असलेल्यांचा सहभाग हा राज्यातील आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या पेपरफुटीत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर लगेचच राज्यातील गृहनिर्माण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या म्हाडाच्या परिक्षेत सुद्धा गैरव्यवहार होणार असल्याचे लक्षात आल्यावर तोही पेपर ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. नेमका त्याच प्रकरणाचा तपास करत असतांना शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टीईटी परिक्षेसंदर्भातील कागदपत्रे म्हाडा परिक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी.ए. टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुखच्या घरात सापडले होते. यानंतर हा सर्व गैरव्यवहार बाहेर येत असून याप्रकरणी तुकाराम सुपे आणि काही अन्य काही जणांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी फडणवीस यांनी केलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीला राज्य सरकार किती गांभीर्याने घेते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.