21 th October in History Sarkarnama
विशेष

21st October in History : .. आणि 'त्या' दोघांना फाशी झाली जाहीर

Dinvishesh 20 October : खलिस्तानी अतिरेकी जिंदा आणि सुखा यांच्या विरुद्धचा खटला पुण्यात न्यायाधीश वसंतराव रुईकर यांच्यासमोर चालवला गेला.

Mayur Ratnaparkhe

Dinvishesh: रविवार १० ऑगस्ट, १९८६ - देशाच्या दृष्टीने हा अत्यंत दुर्दैवी दिवस ठरला. त्या दिवशी सकाळी निवृत्त लष्कर प्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य आपल्या पत्नीसह मोटारीतून पुण्यात शिवाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी गेले होते. गाडीत त्यांना देण्यात आलेला अंगरक्षकही होता.

खरेदी आटोपून ते परत निघाले. लष्कर भागातल्या राजेंद्रसिंह मार्गावर त्यांची गाडी आली. कोरेगाव पार्क भागातल्या आपल्या निवासस्थानाच्या दिशेने ते निघाले होते. जनरल वैद्य स्वतः मोटार चालवत होते. पत्नी शेजारी होत्या आणि अंगरक्षक मागच्या आसनावर. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या मोटारसायकलीवर मागे बसलेल्या एका तरुणाने मोटारीच्या उघड्या काचेतून जनरल वैद्य यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या डोक्यात घुसली तर दुसरी गळ्यातून जाऊन श्रीमती वैद्य यांच्या खांद्यावर आदळली.

या हल्ल्यामुळे मोटारीचा ताबा सुटला आणि ती एका सायकलस्वाराला धडक देऊन रस्त्याच्या पलीकडे मोकळ्या जागेत जाऊन थांबली. श्रीमती वैद्य आणि अंगरक्षक क्षीरसागर यांनी जनरल वैद्य यांना एक मॅटेडोरमधून लष्करी रुग्णालयात नेले. पण तिथे जाण्यापूर्वीच जनरल वैद्य यांची प्राणज्योत मालवली. संपूर्ण देश या घटनेने हादरला.

ही हत्या केली होती खलिस्तानी अतिरेकी सुखदेवसिंग उर्फ सुखा, हरजिंदरसिंग उर्फ जिंदा यांनी. या प्रकरणात पुढे निर्मलसिंग उर्फ निमा यालाही अटक करण्यात आली. जनरल वैद्य यांच्या हत्येनंतर एक महिन्याने पुणे- मुंबई महामार्गावर एका अपघातात सापडून सुखा व निमा पोलिसांच्या हाती लागले. तर डिसेंबर १९८७ मध्ये जिंदा दिल्ली पोलिसांच्या हाती लागला.

या सर्वांवर पुण्याच्या सत्र न्यायालयात खटला चालवला गेला. २६ ऑगस्ट १९८८ पासून या खटल्याची सुनावणी सुरु झाली. एकूण १७० जणांच्या साक्षी नोंदवण्यात आला. खटला सुरु असतानाच सुखा व जिंदा यांनी कबुलीजबाब दिला. अमृतसरमधील सुर्वण मंदिरात लष्कर घुसवल्याचा (ऑपरेशन ब्लू स्टार) बदला म्हणून आपण जनरल वैद्य यांची हत्या केल्याचे दोघांनी न्यायालयासमोर सांगितले.

काय होते ऑपरेशन ब्लू स्टार -

१९८० च्या दशकात खलिस्तानवादी अतिरेकी जर्नेलिसिंग भ्रिंदनवाले याने आपल्या साथीदारांसह सुवर्ण मंदिरावर कब्जा केला होता. त्यांच्या हातून सुवर्ण मंदिर सोडविण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्करी कारवाईला मंजूरी दिली. तेच हे ऑपरेशन ब्लू स्टार. ३ ते ६ जून १९८४ मध्ये हे राबवले गेले. त्यावेळी लष्कर प्रमुख होते जनरल अरूणकुमार वैद्य.

याच ऑपरेशन ब्लू स्टार नंतरच्या सूडचक्रात खलिस्तानी अतिरेक्यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधी यांचीही हत्या केली.

जिंदा आणि सुखा यांच्या विरुद्धचा खटला पुण्यात न्यायाधीश वसंतराव रुईकर यांच्यासमोर चालवला गेला. आजच्याच दिवशी म्हणजे २१ ऑक्टोबर १९८९ रोजी न्या. रूईकर यांनी जिंदा आणि सुखा यांना फाशीची शिक्षा ठोठावली. पुराव्याअभावी निमाची मात्र मुक्तता करण्यात आली. पुढे ९ ऑक्टोबर १९९२ रोजी पुण्याच्या येरवडा कारागृहात जिंदा आणि सुखा यांना फाशी देण्यात आली.

दिनविशेष - 21 ऑक्‍टोबर -

1833 - स्वीडिश अभियंते, स्फोटकांचे संशोधक, उद्योगपती व नोबेल पुरस्काराचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म. त्यांनी दिलेल्या देणगीतून विज्ञान, साहित्य, शांतता वगैरे विषयांसाठीची जगात प्रतिष्ठेची मानली गेलेली नोबेल पारितोषिके सुरू झाली. डायनामाइट व इतर अनेक शक्तिमान स्फोटक पदार्थ त्यांनी शोधून काढले. 102 अनुक्रमांकाच्या मूलद्रव्याला त्यांच्या सन्मानार्थ "नोबेलियम' हे नाव देण्यात आले.

1916 - शाहीर अमर शेख यांचा जन्म

1934 - जयप्रकाश नारायण यांच्या काँग्रेस सोशालिस्ट पार्टीची स्थापना

1943- आझाद हिंद सेनेची स्थापना

1945- फ्रान्समध्ये स्त्रीयांना मतदानाचा अधिकार प्राप्त

1949 - इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा जन्म

1987- भारतीय शांतिसेनेने जाफन्यात एका रूग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामीळ अतिरेकी ठार

1999 - ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

2002- अभिनेता सलमानखानच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT