Aurangabad plane crash -1993 aviation accident Sarkarnama
विशेष

पायलटची एक चूक अन् ट्रकला धडकून विमानाचे तीन तुकडे..! औरंगाबादमधील 32 वर्षांपूर्वीच्या 'थरारक' आठवणी पुन्हा ताज्या

अहमदाबादमधील विमान क्रॅशनंतर औरंगाबादमधील 32 वर्षे जुन्या विमान अपघाताच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. 26 एप्रिल 1993 रोजी औरंगाबादहून मुंबईला जाणारे विमान पायलटच्या चुकीमुळे ट्रकला धडकून त्याचे तीन तुकडे झाले होते.

सरकारनामा ब्युरो
  • भक्ती चपळगावकर (ज्येष्ठ पत्रकार)

अहमदाबाद दुर्घटना विमान प्रवास करणाऱ्या बहुतेकांसाठी धडकी भरवणारी आहे. पावणे तीनशे लोकांचा बळी घेणारा हा क्रॅश कसा झाला हे जगाने बघितलं, त्याची दृष्ये सारखी सारखी डोळ्यांसमोर येत आहेत. नक्की काय झालं, इंजिन काम करेनासे झाले, चाकं वरती गेली नाही, फ्लॅप्स सरळ रेषेत का होते की बोईंगचं सॉफ्टवेअर फॉल्टी आहे अशा चर्चा सुरू आहेत, त्या अजून दोन चार दिवस सुरू राहतील, पण प्रश्नांची उत्तरं मिळतील का याची खात्री नाही.

विमान उडाल्या उडाल्या उंची न गाठता क्रॅश होतं, हे औरंगाबादच्या लोकांनी अनुभवलं आहे. त्या काळी छत्रपती संभाजीनगरचे नाव औरंगाबाद होतं आणि सगळे संदर्भ त्याच अनुषंगाने आहेत, त्यामुळे शहराचे नाव तेच लिहीत आहे. 26 एप्रिल 1993 चा दिवस. मी अकरावीतून बारावीत जाणार होते. कला शाखा निवडल्यामुळे सुटी निवांत होती. आमचा चौघींचा ग्रुप शाळेतला, मी, रोहिणी, अनुजा आणि अंजली. मी आणि रोहिणी निवांत प्रकृतीच्या, कला शाखेत गेलो आणि अनुजा आणि अंजु इंजिनियरिंगच्या तयारीत लागल्या होत्या. दुपारी गावात सगळीकडे हलकल्लोळ माजला. चिकलठाणा एयरपोर्टला लागून विमान क्रॅश झालं. खूप लोक गेलेत आणि जे गेलेत ते बहुतेक औरंगाबादचेच आहेत. सगळ्या गावात काळजीचे सावट पसरले.

बाबा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या नात्याने त्यांच्या काही सहकाऱ्यांबरोबर चिकलठाणा विमानतळापासून दोन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतावर पाहणी करायला गेले. विमान आधी एका ट्रकला आणि नंतर वीजेच्या तारांत अडकून तिथे पडले होते. बाबा घरी आले आणि त्यांनी मला बाजूला घेऊन सांगितले, बेटा अनुजाचे बाबा विमानात होते. ते वाचले नाहीत. डोकं सुन्नं झालं. मी काकांना फार भेटले नव्हते कधी. नेहमी अनुजाची आई आणि भावंडे यांच्या बरोबरचं बोलणं व्हायचं. पण अरूण जोशी काका अतिशय कर्तृत्ववान आणि मेहनती म्हणून प्रसिद्ध होते, व्हिडियोकॉनमध्ये मोठ्या पदावर कामाला होते.

असं ऐकण्यात आलं की राजस्थानच्या सहलीहून जोशी कुटुंबीय औरंगाबादला परतत होते आणि काका सोडून सगळे कुटुंबीय औरंगाबादला थांबले. विमान पुढे मुंबईला जाणार होते आणि काका त्यांचे बॉस आणि व्हिडियोकॉन कंपनीचे मालक नंदलाल धूत यांच्याबरोबर मुंबईला रवाना झाले. क्रॅशमध्ये धूत काका आणि जोशी काकांबरोबर औरंगाबादचे अनेक लोक मृत्यूमुखी पडले. मी अनुजाला भेटायला गेले पण काहीच संवाद झाला नाही. बारावीच्या तयारीत असलेली अनुजा, तिच्यापेक्षा लहान असलेली तिची भावंडे आणि तिची जेमतेम पस्तिशीत असलेली आई…. इतका धक्का, दु:ख, अविश्वास… नंतर कधी बघितले नाही.

तो अपघात कसा झाला याची पुढे रितसर चौकशी झाली. जस्टीस मोहटा यांनी खोलवर जाऊन अपघाताचे मूळ शोधून काढले. इंडियन एयरलाईन्सचे आयसी 491 (बोईंग737) फार लोकप्रिय विमान होते. राजधानी दिल्ली, जयपूर, उदयपूर, औरंगाबाद अशी मजल दरमजल करत शेवटी विमान मुंबईला जात असे. दिल्ली ते मुंबई व्हाया तीन पर्यटक शहरे असा मार्ग असल्याने ते नेहमीच भरलेले असायचे. त्या काळात विमानतळ लहान, प्रवासी ओळखीचे, आणि नियम फार कडक नाही असे वातावरण असायचे.

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी सामान ही नित्याची बाब होती. अशा जास्त सामानाची नोंद करण्यात यायची नाही. पण या विमानात नियमांपेक्षा सातशे किलो ते एक टन सामान जास्त होते असा निष्कर्ष जस्टीस मोहटा यांनी काढला. त्याला इंडियन एयरलाईन्सने अनेक आक्षेप घेतले. जेव्हा जस्टीस मोहटा यांनी सामानाची लिस्ट सादर करा असे सांगितले तेंव्हा त्या संदर्भातले कागदपत्रे अचानक गायब झाली. असे असले तरी अपघाताचे कारण हे नाही हे लक्षात आले. कारण वाढलेल्या वजनाबरोबर विमानाने उड्डाण भरले तर काय झाले असते याच्या चाचण्या करण्यात आल्या आणि त्यात तसा निष्कर्ष निघाला.

सगळ्यात संशयास्पद वागणूक होती पायलट आणि कोपायलट यांची. कॅप्टन एस. एन. सिंग हा विमानाचा मुख्य वैमानिक होता तर मनिषा मोहन ही त्याची फर्स्ट ऑफिसर (सहवैमानिक) होती. अपघात झाल्या झाल्या ते दोघे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी फार डिफेंसिव झाले होते. मला जर नीट आठवत असेल तर हे दोघे घाईघाईने एका हॉस्पिटलला जाऊन तपासणी करुन आले होते. आम्ही मद्यप्राशन केले नाही वगैरे फिटनेस रिपोर्ट त्यांना हवा होता. हा अपघात झाला त्यावेळी सिंग 38 वर्षांचा होता, तर मनिषा 30 वर्षांची होती.

एस. एन. सिंगला नुकतीच मुख्य वैमानिक म्हणून बढती मिळाली होती. त्या आधी दोन तीन वेळा त्याने हे पद मिळावे म्हणून प्रयत्न केले होते पण त्याची कामगिरी इतकी सुमार होती की त्याला बढती नाकारण्यात आली होती. मनिषा सुध्दा सामान्य दर्जाची वैमानिक होती असे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. अपघात झाला त्यावेळी विमानात काही तांत्रिक बिघाड झाला असा दावा या दोघांनी केला. मनिषाने सिंगला पाठिंबा देण्यासाठी आपली साक्ष दोन-तीन वेळा बदलली. पण कॉकपीट डेटा रेकॉर्डरने खरी कहाणी समोर आणली.

औरंगाबादचा रनवे तुलनेने लहान होता. सहा हजार फुटांचा. त्यानंतर विमानतळाची कंपाऊंडवॉल आणि नंतर बीडला जाणारा रस्ता होता. विमान मुंबईच्या दिशेला निघाले तसे दोघांच्या लक्षात आले की विमानात वजनाचा इश्यू आहे. त्यामुळे विमानाला लिफ्ट मिळण्यास त्रास होऊ शकतो. याचे रेकॉर्डिंग होते, त्यावर सिंग मनिषाला काही होत नाही, असे म्हणाला. ती म्हणाली, काही होऊ नये म्हणजे झालं. सहा हजार फुटांच्या रनवेपैकी तब्बल पाच हजार आठशे फूट अंतर गेल्यावर आयसी 491 ने जमीन सोडली. खरं तर उड्डाण करण्याची सूचना मिळून सात सेकंद झाले होते. तरीही सिंगने रनवे सोडला नव्हता.

हा वेळ वाया का घालवला याचे उत्तर सिंग कडे नव्हते. कदाचित वजन जास्त असल्याने जास्तीत जास्त रनवे वापरून लिफ्ट मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता. रनवे सोडायला उशीर झाल्याचे दोघांना लक्षात आले आणि मनीषाने कंट्रोल हातात घेऊन मदत मागण्याचा प्रयत्न केला, पण सिंगने तिला ती मागू दिली नाही हे रेकॉर्डिंगवरून लक्षात आले. जस्टीस मोहटा यांनी अपघाताला त्याचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला असा निष्कर्ष काढला. त्याला नोकरीवरून काढण्यात आले तर मनीषाला निलंबित करण्यात आले. पण या अपघातात 55/56 जणांनी आपला जीव गमावला. विमानात एकूण 112 प्रवासी होते आणि त्यातले 55 प्रवासी आणि 8 कर्मचारी वाचले.

सिंगला त्याचा अतिआत्मविश्वास नडला. उशिरात उशिरापर्यंत विमान न उडल्यामुळे त्याने उंचीच गाठली नाही आणि रनवेच्या कंपाऊंडच्या अवघे फूटभर उडून विमान वर जायला लागले. कंपाऊंडला लागून असलेल्या रस्त्यावर कापसाचे भारे भरलेला ट्रक चालला होता, तो या दोघांनी बघितला पण तोपर्यंत उशीर झाला होता, विमानाची डावी बाजू ट्रकला धडकली. ट्रक चालकाचे नशीब बलवत्तर होते, तो सहीसलामत राहीला. नंतर पोलिस स्टेशनवर गेल्यावर त्याने मालकाला फोन लावला आणि सांगितलं की ट्रक विमानाला धडकला. असे म्हणतात की त्याच्या मालकाने तू इतका उडायला लागला आहेस, काय दारू प्यायला आहेस का, असे बोलत वाद घातला. शेवटी पोलिसांनी सांगितल्यावर त्याचा विश्वास बसला.

ट्रकला धडकल्यावर विमान पुढे दोन अडीच किलोमीटरवर भरकटले. फार उंचावर गेलेच नव्हते. रस्त्यावर विजेच्या तारांचे काम चालू होते, नशीबाने त्यात प्रवाह सोडलेला नव्हता. त्यात विमान अडकले आणि कोसळले, ते जिथे कोसळले तिथे बाभळीची झाडं होती. अनेकजण त्यात अडकले, काहींनी उड्या मारून जीव वाचवला. यात माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर व तत्कालीन नगराध्यक्ष वसंतराव शिंदे यांचाही समावेश होता. बोर्डीकर तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे सभापती होते.

गेले त्यातले बहुतेक औरंगाबादचे होते. कारण विमान औरंगाबादला पोचले तेव्हा इथून 50 च्या वर लोक विमानात चढले. त्या काळी सीटनंबर फार काटेकोरपणे नसल्याने मागच्या बाजूला सगळ्यांची बसायची व्यवस्था होती. आणि क्रॅशमध्ये विमान उलटे झाले, मागची बाजू खाली आली आणि पेटली. पुढच्या बाजूचे लोक व्यवस्थित इमर्जन्सी एग्झिटमधून बाहेर पडले. मागच्या भागात बसलेले आणि तरीही वाचलेले एक जण आठवतात ते म्हणजे गरवारे कंपनीचे अनिल भालेराव. त्यांचा सीटबेल्ट निघाला. अरूण काकांचा निघाला नाही.

सिंगला नोकरीवरून काढलं तरी औरंगाबादचे लोक हा अपघात विसरू शकले नाहीत. आता विमानतळ मोठं झालं. अपघातानंतर मोठा काळ गेला. आता नियम अतिशय काटेकोर पाळले जातात. बऱ्याच गोष्टी स्वयंचलित आहेत. सेफ्टी आणि सेक्युरटी अतिशय वरच्या स्तराची आहे. त्यामुळे या अपघाताच्या कारणांचा तसा संदर्भ आजच्या काळासाठी योग्य नाही. तरीही टेक ऑफ नंतर नागरी वस्तीत झालेला क्रॅश म्हणजे औरंगाबाद विमान अपघात नजरेसमोरून जात नाही. कित्येक दिवस ज्या शेतात विमान पडले त्याच्या खाणाखुणा त्या रस्त्यावरून दिसायच्या. आता सगळेच बदलले, जे लोक गेले त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशिवाय जगणे स्वीकारले. ते त्यांना भाग होते.

पण आज त्यांना पुन्हा एकदा हे सारे काही दिसले असणार. सगळे काही सहन करण्याची ताकद त्यांना जशी मिळाली तरी अहमदाबादला मरण पावलेल्या प्रवासी, हॉस्टेलमधले डॉक्टर्स, पायलट, क्रू मेंबर्स सगळ्यांच्या घरच्यांना मिळो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT