Ajit Pawar Sarkarnama
विशेष

लहान भाऊ पोहायला शिकला अन्‌ मला रात्रभर झोपच लागली नाही : अजितदादांची तुफान फटकेबाजी

अजित पवार यांनी आपल्या नेहमीच शैलीत जोरदार फटकेबाजी केली. त्यातून त्यांनी आपल्या सर्वांनाच चिमटे काढले.

मिलिंद संगई

बारामती : श्रीनिवास (अजित पवारांचे लहान बंधू) पोहायला शिकला आणि संध्याकाळी मला येऊन सांगितलं, ‘दादा मी पोहायला शिकलो.’ झालं रात्रभर मला झोपच आली नाही. दुसऱ्या दिवशी गेलो आणि पोहायलाच शिकलो. धाकटा भाऊ पोहायला शिकला आणि आपण बिनशिकता राहून कसं चालेल, असा किस्सा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (ता. २१ आक्टोबर) बारामतीत (Baramati) सांगितला. (Ajit Pawar told the story of learning to swim)

ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या जलतरण तलावाचे उदघाटन आज बारामतीत करण्यात आले. त्या कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्या नेहमीच शैलीत जोरदार फटकेबाजी केली. त्यातून त्यांनी आपल्या सर्वांनाच चिमटे काढले. सुप्रिया सुळे यांनी पोहण्याचा किस्सा सांगितला. त्यानंतर अजितदादांनी ‘आप बिती’ सांगून टाकली.

जलतरण तलावाच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम असल्याने पोहण्याचा विषय आपसूकच सर्वांच्या भाषणात आला. त्यामुळे अजित पवारांच्या अगोदर भाषण केलेल्या सुप्रिया सुळे यांनी ‘पवार कुटुंबीयांतील सर्वांनाच पोहता येतं,’ असे सांगितलं. तसेच, त्यावेळच्या गमतीजमतीही कथन केल्या. त्या म्हणाल्या की, लहानपणी ज्यांना बरं पोहता यायचं, त्यांना ओढ्यात आणि ज्यांना येत नाही, त्यांना डबा लावून विहिरीत ढकलून दिलं जायचं...त्यामुळे आमच्यापुढे पोहण्याशिवाय गत्यंतरच नसायचे. त्यामुळे ‘पाण्यात पडलं की पोहायला येतं’ ही म्हण पवार कुटुंबीयांतील मुलांना लागू होते, असे त्यांनी हसत हसत स्पष्ट केले. माझी आई मला मुंबईत जलतरण स्पर्धांना घेऊन जायची, याचे क्रेडीट मी आईलाच देईन; कारण बाबांना त्या काळात वेळच नसायचा, असे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.

सुप्रिया सुळेंच्या किस्स्याचा धागा पकडून अजित पवार म्हणाले की, सुप्रियाने ओढ्याचा उल्लेख केला, तो ओढा नव्हता तर फाटा होता. तो ३३ नंबरचा फाटा होता, त्यात आम्ही पोहायचो. ऊन तापायला लागलं की पुन्हा बाहेर यायचो आणि मातीत झोपायचो...राजूदादा तेच आठवण करुन देत होता...कशी मजा यायची...कसली मजा यायची...आता काय मजा येतीय ते बघू.?

अजितदादा पुढे म्हणाले की, माझं तर काही सांगूच नका. मी तर पाण्याला एवढा घाबरायचो की लांबूनच सगळ्यांची मजा बघत बसायचो. पण, डबा बांधून वरूनच मला फेकून द्यायचे. मला भीती वाटायची, त्या डब्याचा दोर तुटला तर काय होईल. पण, आमच्या वरिष्ठांना काही वाटायचं नाही...ते वरून खाली फेकून द्यायचे. तेव्हापासून वरिष्ठ आमच्याशी असं वागतात...(त्यावर सभागृहात प्रचंड हशा झाला) तरी आम्ही इथपर्यंत पोहोचलोय....खरंच तुम्ही सर्वांनी आमचं कौतुक केलं पाहिजे.

भाषणाचा शेवट करता करता ते राजेंद्र पवारांकडे आले. आज तर काय जीनची पँट, टी शर्ट, बूट घातलेत...माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे, पण मीच मोठा दिसतोय आणि हा लहान दिसतोय...आता राजूदादा आणि रोहित भाऊ भाऊ दिसतात...असं म्हटल्यावर सभागृहात पुन्हा हास्याच्या स्फोट झाला. तू एकटं एकटं सगळं करतोस...मला, सुप्रिया आणि रोहितला पण जरा सांग काय काय करायचं ते, आम्ही तुझं तू सांगशील ते सगळं ऐकू...’अस म्हणताच पुन्हा सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT