Ajit Pawar Sarkarnama
विशेष

NCP Ajit Pawar : पुरोगामित्व जपण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक!

सरकारनामा ब्युरो

- सदानंद पाटील

NCP Ajit Pawar and Vidhan Sabha Election ‘‘आम्ही पुरोगामी विचार सोडलेला नाही. आम्ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने जाणारे आहोत, अल्पसंख्याक, मुस्लिम समाजाच्या बाबतीत चुकीचे बोलले तर खपवून घेणार नाही...’’ ही अलीकडच्या काळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वक्तव्य बरेच काही सांगून जातात.

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाच्या मतदारांनी महायुतीच्या विरोधात दिलेला कौल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत या समाजाचा राज्यातील ४०-५० मतदारसंघांत असलेला प्रभाव पाहता, या समाजाकडे दुर्लक्ष करणे राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही म्हणून असेल किंवा महायुतीत राहूनही पुरोगामी विचार सोडलेले नाही हे सिद्ध करण्यासाठी अजित पवार(Ajit Pawar) यांचा आटोकाट प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपापल्या मतपेढ्या सुरक्षित करण्याची धडपड सर्वच पक्षांकडून सुरू झाली आहे. प्रत्येक पक्षाने त्याची मतपेढी निश्चित केली आहे. यासाठी कोणी जातीचा आधार घेतला आहे तर कोणी योजनांचा आधार घेत आहे. महायुतीतील व विशेषतः भाजप आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील काही नेते आक्रमक हिंदुत्वाची भाषा करत आहेत.

मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुस्लिम समाजाच्या या नाराजीचा महायुतीला लोकसभा निवडणुकीत फटका बसला. मुंबई येथील काही मुस्लिमबहुल लोकसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या आणि त्यातही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत चांगले मतदान मिळाले. यातून या समाजाच्या मनात नेमकं काय, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही.

मुस्लिमांना लक्ष्य केल्याने अस्वस्थता -

महायुतीतील काही नेते मुस्लिम समाजाला लक्ष्य करत असताना अजित पवार मात्र अस्वस्थ आहेत. मुळात महायुतीत गेल्याने विरोधकांनी त्यांच्यावर अगोदरच जातीयवादाचा शिक्का मारला आहे. त्यातून पुन्हा युतीचे नेते हिंदुत्वाची भाषा करताना आणि मुस्लिम समाजाला थेट लक्ष्य करत असताना, स्वस्थ बसणे हे अजित पवार यांना अनेक अर्थांनी परवडणारे नाही. त्यांनी जातीयवादी विचारांना विरोध केला नाही तर विरोधक करत असलेल्या टीकेला पोषक वातावरण तयार होईल. तसेच आतापर्यंत पुरोगामित्वाचा केलेला जागर हा नकली होता, असा समज निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होऊ लागल्यानेच अजित पवार या मुद्द्यावरून अधिक आक्रमक होत आहेत.

दुरावलेल्या मतदारांना साद -

यातील आणखी एक बाजू अशीही आहे की, मुस्लिम मतदारांची काही प्रमाणात अजित पवार यांच्याबाबत सौहार्दाची भूमिका असली तरी ते महायुतीत असल्याने हा मतदार दुरावला आहे. लोकसभा निवडणुकीत दुरावलेल्या या मतदाराला विधानसभा निवडणुकीत साद घालण्याचे कामही या माध्यमातून अजित पवार यांच्याकडून सुरू आहे. राज्यातील किमान ४० ते ५० मतदारसंघात मुस्लिम समाजाची लक्षणीय मते आहेत. यातील काही मतदारसंघांत अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’कडून उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी तरी मुस्लिम समाजाची मदत होईल, असे राजकीय आडाखे बांधण्यात येत आहेत.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) तसेच नबाब मलिक हे दोनच मुस्लिम आमदार आहेत. आपापल्या मतदारसंघात कामातून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. मात्र, समाज म्हणून त्यांची महायुतीसोबत जाण्याची भूमिका तेथील मुस्लिम समाजाला पटलेली नाही. युतीतील नेते समाजाविरोधात बोलत असताना पक्षाकडून काहीच भूमिका घेतली जात नसल्याबद्दल नाराजीही निर्माण झाली होती. या नाराजीवर फुंकर घालण्याचे कामही अजितदादा यांच्याकडून सुरू असल्याचे बोलले जात आहे.

मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक -

लोकसभा निवडणुकीत भायखळा, मुंबादेवी अशा ठिकाणी मुस्लिम मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला साथ दिली. अणुशक्तीनगर, धारावी, मानखुर्द शिवाजीनगर, घाटकोपर पश्चिम, ईशान्य मुंबई, कलिना तसेच मराठवाड्यातही मुस्लिम समाजाच्या मतांचा गठ्ठा मोठा आहे. राज्यात मुस्लिम मतदार संख्या १२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मुंबईत या समाजाची मोठी ताकद आहे. तसेच ठाणे, भिवंडी, परभणी, लातूर, धुळे, अकोला अशा दहा जिल्ह्यांत १५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदार हे मुस्लिम समाजाचे आहेत. निवडणुकीतील त्यांची भूमिका निर्णायक राहणार आहे.

अजित पवारांची भूमिका... -

- नितेश राणे यांच्या मुस्लिम समाजविरोधी भूमिकेला खणखणीत विरोध

-मुस्लिम समाजासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची उजळणी

- जातीयवादी टिप्पणीवरून शिंदे सेनेच्या नेत्यांना दिलेल्या कानपिचक्या

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT