Sharad Pawar, Amit Bhangre Sarkarnama
विशेष

Amit Bhangre : वडिलांच्या 40 वर्षांच्या संघर्षाचं अमित भांगरे चीज करणार का? शरद पवारांच्या शिलेदाराकडं लक्ष...

Akole Assembly Election : आता 2024 च्या निवडणुकीत अशोकराव भांगरे राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र त्यांचे 12 जानेवारी 2023 रोजी निधन झाले.

Sunil Balasaheb Dhumal

Akole - Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना होणार हे आता निश्चित मानले जात आहे. अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे आणि शरद पवार गटाचे अगस्ती कारखान्याचे संचालक अमित भांगरे यांच्यात ही लढत होण्याची शक्यता आहे.

रोहित पाटलांनंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अमित भांगरे यांच्या रुपाने नव्या दमाच्या अगदी तिशीतील युवक हेरला. नुसता हेरलाच नव्हे तर अजित पवार गटाचे किरण लहामटे आणि भाजप नेते मधुकर पिचड यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. यामुळे आता अकोले मतदारसंघाच्या 'हाय व्होल्टेज' लढतीची आत्तापासूनच राज्यात चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अकोल्याचे आमदार डॉ. लहामटे Kiran Lahamate यांनी तळ्यात मळ्यात करत शेवटी अजितदादांना साथ दिली. त्यानंतर शरद पवारांनी आपले निष्ठावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिवंगत अशोकराव भांगरे यांचे चिरंजीव अमित यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला.

अकोल्यातील सभेत शरद पवारांनी, अमितच्या मागे उभे राहा आणि नको तिकडे बसलेल्या डॉ. लहामटे यांना आता घरी बसवा, असे आवाहनही केले आहे. त्यामुळे 2019 मध्ये अशोक भांगरे यांच्यामुळे सोपी गेलेली निवडणूक यावेळी लहामटे यांना जड जाणार असल्याचे बोलले जात आहे.

2019 ला काय झालं होतं?

दिवंगत अशोक भांगरे Ashok Bhangre यांनी अकोल्यातून तब्बल सहा वेळा विधानसभा लढवली. मात्र त्यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले नाही. या मतदारसंघात भांगरे आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यात कायम संघर्ष राहिला आहे. या काळात अशोक भांगरेंनी अनेक पक्ष बदलेले असले तरी पवार कुटुंबाशी असलेली नाळ तुटू दिली नाही. तर दुसरीकडे ज्या पक्षात जातील, तेथे मोठ्या संख्येने मित्र जमवले.

अशोकराव भांगरेंची 2019 मध्ये हवा होती. मात्र राज्यात भाजपचे वारे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची Narendra Modi लाट होती. ती पाहता एकास एक उमेदवार असावा, असा आग्रह शरद पवारांनी धरला. त्यानुसार त्यांनी भांगरे यांना थांबण्यास सांगितले. पवारांच्या शब्दास मान देऊन भांगेरेंनी पक्षाचे उमेदवार डॉ. लहामटे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला.

लहामटे यांना 1 लाख 13 हजार 414 मते मिळाली. तर भाजपचे वैभव पिचड यांना 55 हजार 725 मते मिळाली. लहामटे तब्बल 57 हजार 689 मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत भांगरे यांच्या झंजावाताने पिचड यांच्या 40 वर्षांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लागला.

आता 2024 च्या निवडणुकीत अशोकराव भांगरे राष्ट्रवादीकडून प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र त्यांचे 12 जानेवारी 2023 रोजी निधन झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै 2023 मध्ये फूट पडली. त्यावेळी भांगरे कुटुंबाने शरद पवारांची साथ दिली. तर आमदार लहामटे हे अजित पवारांसोबत गेले.

आता विधानसभेपूर्वीच शरद पवारांनी Sharad Pawar अकोल्यात जाऊन दिवंगत अशोकराव भांगरे यांचे चिरंजीव अमित भांगरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या सभेसाठी अकोल्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

मोठा राजकीय वारसा

अमित भांगरे यांना स्वतंत्रपूर्व कालखंडापासून राजकीय वारसा आहे. त्यांचे पणजोबा गोपाळराव भांगरे हे संगमनेर-अकोले विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार होते. त्यानंतर त्यांचे आजोबा यशवंतराव भांगरे यांनी तीन वेळा आमदार होते. वडील अशोकराव भांगरे यांनी 1989 पासून विधानसभा निवडणूक लढवली. या काळात त्यांनी प्रस्थापितांविरोधात तालुक्यात रान पेटवले होते. 2019 मध्ये शरद पवाराच्या विनंतीमुळे त्यांनी पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार केला.

भांगरे कुटुंबाचा राजकीय प्रवास

दरम्यानच्या काळात अशोक भांगरे यांनी पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जि. प. अध्यक्ष, तसेच अगस्ती कारखाना संचालक आदी पदांना न्याय दिला. आई सुनीता भांगरे यांनी जिल्हा परिषद सदस्य, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा उपाध्यक्ष पद भूषवले. तसेच चुलते दिलीपराव भांगरे पंचायत समितीचे सदस्य होते. आता ते सरपंच आहेत. तर स्वतः अमित भांगरे हे अगस्ती साखर कारखान्याचे संचालक आहेत.

अशोकराव भांगरे यांनी जनता दल, काँग्रेस, शिवसेना, मनसे, भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर कधी अपक्ष उभे राहूनही विधानसभा लढवली आहे. आता राष्ट्रवादी फुटीनंतर भांगरे कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहण्याचा निर्णय घेतला. आता अमित भांगरे Amit Bhangre आपल्या वडिल्यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण करणार का, भांगरे कुटुंबास पुन्हा अमितच्या रुपाने आमदार मिळणार का, हे आगामी तीन महिन्यांत स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT