N. T. Rama Rao Biography Sarkarnama
विशेष

NTR in Politics: जावयानं बंड केलं अन् त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं!

Chandrababu Naidu Political Career: तेलुगु चित्रपटांतील एन. टी. रामाराव यांच्या देव-देवतांच्या भूमिका घराघरांत पोहोचल्या होत्या. राजकारणातही लोकांनी त्यांना खूप प्रेम दिलं. एका चुकीमुळं जावयानं त्यांच्याविरोधात बंड केलं आणि त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं.

अय्यूब कादरी

पुण्यभूमी ना देशम नमो नमामि

कन्ना भूमी तेलुगु देशम सदा स्मरामी...

मेजर चंद्रकांत या तेलुगु चित्रपटातील हे गीत आहे. 'माझ्या देशाला नमन करतोच आणि तेलुगु जन्मभूमीलाही सदा स्मरतो,' असा या ओळींचा अर्थ आहे. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील या गाण्याला एस. पी. बालसुब्रमण्याम यांनी आवाज दिला आहे.

हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या 11 वर्षे आधी अविभाजित आंध्र प्रदेशात तेलुगु देशम पार्टीची स्थापना झाली होती. तेलुगु चित्रपटसृष्टीतील शो मॅन अशी ओळख असलेल्या नंदमुरी तारक रामाराव अर्थात एन. टी. रामाराव यांनी या पक्षाची स्थापना केली होती. मेजर चंद्रकांत या चित्रपटात मुख्य भूमिकेतही तेच होते.

दक्षिणेतील लोक चित्रपट तारे, तारकांना अगदी डोक्यावर घेतात. दाक्षिणात्य चित्रपट कलाकारांची फॅन फॉलोईंग मोठी असते. याच्याच बळावर अनेक चित्रपट कलाकार राजकारणात यशस्वी झाले आहेत. नंदमुरी तारक रामाराव अर्थात एन. टी. रामाराव हे त्यापैकीच एक नाव. ते एनटीआर या नावानंही ओळखले जातात. त्यांनी तेलुगु देशम पार्टीची स्थापना केली आणि अविभाजित आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाला तीन वेळा गवसणी घातली. जावयाने 1995 मध्ये केलेल्या बंडामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं.

एनटीआर यांनी राजकारणात प्रवेश का केला, याचे वेगवेगळे किस्से सांगितले जातात. ती 80 च्या दशकाची सुरुवात असेल. तेलुगु चित्रपटसृष्टीतील शो मॅन असलेले एनटीआर हे नेल्लोरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी नेल्लोरमध्ये सुसज्ज हॉटेल, लॉजची संख्या कमी होती. त्यामुळं ते शासकीय विश्रामगृहात गेले, मात्र तेथील सर्व खोल्या बुक झालेल्या होत्या.

एक खोली रिकामी होती, तीही राज्यातील एका मंत्र्यांसाठी बुक झालेली होती. एनटीआर आल्यामुळं कर्मचाऱ्यानं त्यांना ती खोली दिली. मग ते आंघोळीला गेले आणि त्याचवेळी मंत्री आले आणि आपली खोली दुसऱ्याला का दिली, असे म्हणत त्यांनी कर्मचाऱ्याला झाप झापले. त्यामुळं एनटीआर यांना बाहेर पडावं लागलं होतं.

तुम्ही कितीही लोकप्रिय असाल, प्रसिद्धीच्या शिखरावर असाल, मात्र खरी 'पॉवर' तर राजकीय नेत्यांच्या हातात आहे, याची जाणीव एनटीआर यांना त्यावेळी झाली आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1982 मध्ये त्यांनी तेलुगु देशम पार्टीची स्थापन केली.

तीनवेळा आंध्रप्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा मान त्यांना मिळाला. एनटीआर यांच्या कन्या भुवनेश्वरी यांचा एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी विवाह झाला. नायडू हे टी.अंजय्या हे मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळं राजकीय घडामोडींमध्ये त्यांना रस निर्माण झाला, असाही किस्सा सांगितला जातो.

आंध्र प्रदेशची प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी म्हणून एनटीआर यांनी 29 मार्च 1982 रोजी तेलुगु देशम पार्टीची स्थापना केली. या पक्षाला टीडीपी या नावानंही ओळखलं जातं. राजकारणात प्रवेश केला त्यावेळी अभिनेता म्हणून एनटीआर यांची लोकप्रियता शिखरावर होती. त्यावेळी आंध्र प्रदेशात काँग्रेसचं वर्चस्व होतं.

शेतकरी, मागासवर्गातील नागरिक आणि मध्यमवर्गाचं प्रतिनिधित्व या पक्षानं केलं. या पक्षाचं निवडणूक चिन्ह सायकल आहे. आंध्र प्रदेशाचं विभाजन झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या तेलंगणा राज्यात टीडीपीची सत्ता असून, बंड करून सासऱ्यांची म्हणजे एनटीआर यांची सत्ता उलथवून टाकलेले त्यांचे जावई एन. चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री आहेत.

एनटीआर यांचा जन्म 28 मे 1923 रोजी कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा तालुक्यातील निम्माकुरू या खेडेगावात नंदमुरी लक्ष्मैय्या आणि नंदमुरी वेंकट रामम्मा या तेलुगु शेतकरी दांपत्याच्या पोटी झाला. त्यावेळी हा भाग मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये होता. एनटीआर यांचे काका, म्हणजे त्यांच्या वडिलांच्या भावाला अपत्य नव्हतं. त्यामुळे त्यांना काकांना दत्तक देण्यात आलं. शेजारच्या गावातून आलेल्या शिक्षकाकडं त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं.

एनटीआर यांचं तेलुगु भाषेवर प्रभुत्व होतं. याचं श्रेय त्यांच्या या पहिल्या शिक्षकांनाच जातं. त्याकाळी प्राथमिक शिक्षण झालं की मुलांना शाळेतून काढलं जायचं. मात्र एनटीआर यांच्या वडिलांनी तसं केलं नाही. ते प्रचंड महत्वाकांक्षी होते.

त्यातच एनटीआर हे त्यांच्या कुटुंबातील पहिले मुलगे होते. त्यामुळं त्यांना पुढील शिक्षणासाठी विजयवाडा येथे पाठवण्यात आलं. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये नागरी सेवेची परीक्षा दिली, उपनिबंधक म्हणून त्यांची निवड झाली. ही नोकरी त्याकाळी प्रतिष्ठेची समजली जायची. मात्र एनटीआर यांचा ओढा अभिनय क्षेत्राकडे होता. त्यामुळं तीनच आठवड्यांत त्यांनी नोकरी सोडली होती.

वयाच्या 20 वर्षी मे 1943 मध्ये एनटीआर यांचा बसवा राम तारकम यांच्याशी विवाह झाला. त्या एनटीआर यांच्या मामांच्या कन्या होत्या. या दांपत्याला 12 अपत्ये झाली, त्यात आठ मुलगे आणि चार मुलींचा समावेश आहे. त्यांच्या पत्नी बसवा राम तारकम यांचे 1985 मध्ये कर्करोगानं निधन झालं. नंदमुरी रामकृष्ण सिनियर, जयकृष्ण, साईकृष्ण, नंदमुरी हरिकृष्ण, नंदमुरी मोहन कृष्ण, नंदमुरी बालकृष्ण, रामकृष्ण ज्यूनियर, जयशंकर कृष्ण, गरपती लोकश्वरी, डी. पुरंदेश्वरी, नारा भुवनेश्वरी आणि कांतमनेनी उमा माहेश्वरी ही एनटीआर यांची अपत्यं.

पत्नी तारकम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एनटीआर यांनी 1986 मध्ये हैदराबाद येथे कर्करोगावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलची उभारणी केली. बसवतारकम इंडो अमेरिकन कॅन्सर हॉस्पिटल असं त्यांच नाव आहे.

एनटीआर यांनी नंतर 1993 मध्ये लक्ष्मी पार्वती यांच्याशी दुसरा विवाह केला. त्यातून त्यांच्या कुटुंबात कलह निर्माण झाला होता. विवाहानंतर तीन वर्षांच्या आत एनटीआर यांचं निधन झालं. लक्ष्मी पार्वती यांचा राजकारणात हस्तक्षेप वाढल्यामुळेच जावई चंद्राबाबू नायडू यांनी बंड करून वेगळी चूल मांडली होती. त्यामुळं एनटीआर यांचा मुख्यमंत्रिपद गेलं होतं.

तत्पूर्वी, एनटीआर यांनी तेलुगु चित्रपटसृष्टीत चांगलाच जम बसवला होता. ते शो मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले होते. 1949 मध्ये प्रदर्शित झालेला 'मन देशम' हा त्यांचा पहिला चित्रपट. यात त्यांची पोलिस कर्मचाऱ्याची छोटी भूमिका होती.

1954 मध्ये आलेला 'राजू पेडा' हा त्यांचा चित्रपट हिट झाला. नंतर त्यांनी हिंदू देव-देवता, महापुरुषांच्या भूमिका केल्या. एकूण 17 चित्रपटांत त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली. याद्वारे ते प्रचंड लोकप्रिय झाले आणि घराघरांत पोहोचले. नंतर त्यांनी व्यावसायिक चित्रपटही केले. अभिनयासह त्यांनी पटकथा लेखक, निर्माते, दिग्दर्शक म्हणूनही काम केलं.

एनटीआर यांनी 300 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केलं. यातील जवळपास सर्वच चित्रपट तेलुगु भाषेतील असले तरी एनटीआर यांची गणना देशातील महान अभिनेत्यांमध्ये होते. व्यावसायिक चित्रपटांसह त्यांनी मध्यमवर्ग, कामगारवर्गाला आकर्षित करतील, असे चित्रपटही केले.

समाजातील विषमतेवर त्यांनी या माध्यमातून प्रहार केला. तेलुगु कवी श्रीनाथ यांच्या जीवनावर आधारित श्रीनाथ कवी सर्वभौमुदु हा 1993 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. 1968 मध्ये त्यांचा 'पद्मश्री'नं सन्मान करण्यात आला.

चित्रपटसृष्टीत मोठं यश मिळवल्यानंतर एनटीआर यांनी राजकारणात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी तेलुगु अस्मितेला साद घातली. 29 मार्च 1982 रोजी त्यांनी तेलुगु देशम पार्टीची स्थापना केली. त्यावेळी आंध्र प्रदेशात काँग्रेसचं वर्चस्व होतं. काँग्रेसला सक्षम पर्याय देण्यासाठी म्हणून एनटीआर यांनी या पक्षाची स्थापना केली होती. तेलुगु अस्मितेचा, प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पुढे केल्यामुळं त्यांचा पक्ष काँग्रेसला सक्षम असा पर्याय ठरला. अभिनेता म्हणून एनटीआर हे राज्यभरात लोकप्रिय झालेले होते. त्याचाही मोठा फायदा त्यांना राजकारणात जम बसवण्यासाठी झाला.

काँग्रेसच्या प्रदीर्घ सत्तेला लोक कंटाळले होते. आंध्र प्रदेशात सलग 26 वर्षे काँग्रेसची सत्ता होती. लोकांना बदल हवा होता. एनटीआर यांनी तेलुगु देशम पार्टीची स्थापना करून लोकांसाठी सक्षम पर्याय उपलब्ध केला होता. 1983 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यात टीडीपीला बहुमत मिळालं आणि 9 जानेवारी 1983 रोजी एनटीआर यांनी आंध्र प्रदेशचे 10 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. उपचारांसाठी एनटीआर यांना 1984 मध्ये अमेरिकेला जावं लागलं. त्यांच्या अनुपस्थितीत एन. भास्कर राव यांनी बंड करत राज्यपाल रामलाल ठाकूर यांच्या मदतीनं मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली. एनटीआर यांच्या मंत्रिमंडळात राव हे अर्थमंत्री होते. राज्यपालांनी 'फ्लोअर टेस्ट'' न घेताच राव यांना संधी दिली होती. याच्याविरोधात आंध्र प्रदेशात हिंसाचार उफाळला होता.

केंद्रात त्यावेळी काँग्रेसची सत्ता असल्यामुळं एन. भास्कर राव यांचं बंड यशस्वी झालं, मात्र ते फार का टिकू शकलं नाही. राव हे केवळ 21 दिवस मुख्यमंत्रिपदावर राहिले. एनटीआर यांचे जावई एन. चंद्राबाबू नायडू यांनी हे बंड मोडित काढलं. एनटीआर यांच्या अनुपस्थितीत नायडू यांनी टीडीपीच्या आमदारांना एकत्र केलं. एनटीआर परत येईपर्यंत त्यांनी सर्व आमदारांना रामकृष्ण सिने स्टुडिओमध्ये ठेवलं. अमेरिकेहून परत आल्यानंतर एनटीआर यांनी दिल्लीत विरोध प्रदर्शन केलं. त्यानंतर एन. भास्कर राव यांना पायउतार व्हावं लागलं आणि मुख्यमंत्रिपदाची सूत्रं पुन्हा एनटीआर यांच्याकडं आली.

या राजकीय संकटावर मात केल्यानंतर एनटीआर यांनी विधानसभा भंग करून 1985 मध्ये निवडणूक घेतली. या निवडणुकीतही टीडीपीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यांचे जावई एन. चंद्राबाबू नायडू हे 'टेक्नोसॅव्ही' आहेत. त्यांनी आमदारांना प्रशिक्षित केलं. संगणकीकरणावर भर दिला. 1986 मध्ये नायडू यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. एनटीआर यांनी विविध विकासकामे केली, सुधारणा केल्या.

जलसिंचनाची कामे मोठ्या प्रमाणात केली. गरजूंना घरांसाठी अनुदान, तांदूळ वाटप आदी कल्याणकारी योजना राबवल्या. असे असतानाही 1989 च्या निवडणुकीत त्यांना सत्ता गमवावी लागली. एनटीआर यांनी राष्ट्रीय राजकारणातही भूमिकी निभावली होती. 1988-89 मध्ये बोफोर्स प्रकरणाच्या विरोधात विरोधक एकजूट झाले होते. त्यावेळी स्थापन झालेल्या राष्ट्रीय मोर्चाच्या अध्यपक्षदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळच्या निवडणुकीनंतर व्ही. पी. सिंह पंतप्रधान बनले होते.

वयाच्या 70 व्या वर्षी 1993 मध्ये एनटीआर यांनी 33 वर्षीय लक्ष्मी पार्वती यांच्याशी दुसरं लग्न केलं आणि ते त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरलं. या विवाहाला एनटीआर यांच्या कुटुंबातील सर्वांचा विरोध होता, मात्र त्यांनी कोणाचीही पर्वा केली नाही. त्यानंतर 1994 च्या विधानसभा निवडणुकीत टीडीपीने 216 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसला केवळ 26 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. एनटीआर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यांचे जावई एन. चंद्राबाबू नायडू हे अर्थमंत्री बनले.

सरकार आणि पक्षामध्ये नायडू हे क्रमांक दोनचे नेते बनले. असं असलं तरी सरकारमध्ये चलती होती ती एनटीआर यांच्या दुसऱ्या पत्नी लक्ष्मी पार्वती यांची. कुटुंबापासून ते सरकारपर्यंत लक्ष्मी पार्वती यांचाच दबदबा चालू लागला होता. एनटीआर यांच्या चरित्रलेखनासाठी म्हणून आलेल्या लक्ष्मी पार्वती या त्यांच्या पत्नी बनल्या, नंतर सरकारमध्ये आपला दबदबाही निर्माण केला होता. त्यामुळं टीडीपीच्या बहुतांश आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या अस्वस्थतेचा अखेर स्फोट झाला. एनटीआर हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनल्याच्या 9 महिन्यांनंतर ऑगस्ट 1995 मध्ये टीडीपीमध्ये बंड झालं. या बंडांच नेतृत्व अर्थातच एनटीआर यांचे जावई एन. चंद्राबाबू नायडू यांनी केलं.

नायडू यांच्यासोबत 150 पेक्षा अधिक आमदार होते. विशेष म्हणजे, एनटीआर यांच्या मुलांनीही नायडू यांना पाठिंबा दिला. इतक्या मोठ्या बंडानंतर राजीनामा देण्याशिवाय एनटीआर यांच्यासमोर पर्याय राहिलेला नव्हता. त्यांच्या राजीनाम्यानंतर टीडीपीत दोन गट पडले. नायडू गटाचे चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री बनले. एनटीआर यांनी नायडू यांच्यावर प्रचंड टीका केली. धोकेबाज, विश्वासघातकी आदी विशेषणं त्यांना लावली. त्यानंतर त्यांनी आपल्या गटाची संघटनात्मक बांधणी करण्यावर लक्ष केंद्रीत केलं.

नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर पाच महिन्यांच्या आत 18 जानेवारी 1996 रोजी एनटीआर यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या मागे जावई एन. चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपीच्या राजकारणाचे एकमेव वारस म्हणून उदय झाला. त्यांनी आंध्रप्रदेशच्या राजकारणात, विकासात महत्वाची भूमिका बजावली आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली. आंध्र प्रदेश विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत टीडीपीला बहुमत मिळालं आणि नायडू मुख्यमंत्री बनले.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT