Sharad Pawar NCP Sarkarnama
विशेष

Sharad Pawar NCP : तुतारीवर विधानसभा लढण्याची 1350 जणांची इच्छा; अहिरेंच्या देवळालीतून सर्वाधिक इच्छूक!

Assembly Election 2024 : इच्छूकांकडून राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे तरुणांचा ओढा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 26 September : विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरजोरात वाजायला सुरुवात झाली आहे. इच्छूकांकडून राष्ट्रीय पक्षांची उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. विशेषतः महाविकास आघाडीकडे अनेकांचा ओढा असल्याचे दिसून येत आहे.

त्यातही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे तरुणांचा ओढा मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. तब्बल 1350 इच्छुकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी मिळावी, यासाठी अर्ज केले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या आठवडाभरात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीकडून जागा वाटप आणि निवडून येणारा उमेदवार शोधण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. त्याच पद्धतीने इच्छुकांकडूनही उमेदवारी मिळण्यासाठी विविध नेत्यांचे उंबरे झिजवले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे (NCP Sharadchandra Pawar Party) राज्यभरातील तब्बल 1350 इच्छुकांनी उमेदवारी मिळावी, यासाठी अर्ज केले आहेत. नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून सर्वाधिक इच्छुकांचे अर्ज आहेत.

या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आमदार सरोज अहिरे मागील 2019 च्या निवडणुकीत निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आमदार अहिरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे.

सरोज अहिरे यांच्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक इच्छुकांनी तयारी दाखवली आहे. तुतारीवर निवडणूक लढविण्यासाठी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे देवळाली मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत शरद पवार कोणाला संधी देतात, हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, वैद्यकीय कारणामुळे जामिनावर बाहेर असलेले नवाब मलिक यांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे नऊ जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे मलिकांच्या मतदारसंघातही तुतारीच्या उमेदवारीसाठी चुरस दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या बहुतांश इच्छुकांनी प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे, त्यात उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवणार नाही, असे बॉन्ड पेपरवर लिहून देण्यात आलेले आहे. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीतून बंडखोरी होण्याची शक्यता कमी दिसून येत आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतात, हे पाहावे लागणार आहे. त्यातून नवख्या उमेदवारांना किती संधी मिळते की जुन्यांनाच पुन्हा प्राधान्य दिले जाते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT