Ashish Shelar-Rahul Narvekar- Bhaskar Jadhav  Sarkarnama
विशेष

Assembly Session : भास्कर जाधवांनी खिंडीत गाठलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या मदतीला आशिष शेलार धावले

Ashish Shelar-Rahul Narvekar- Bhaskar Jadhav : विधीमंडळाच्या इतिहासात एकदा गिलोटिन जाहीर झालं की ते रद्द होण्याचा प्रकार सोमवारी पहिल्यांदाच आपल्या विधीमंडळात घडला.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 09 July : मुसळधार पावसामुळे सोमवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास विधानसभेचे कामकाज तहकूब केले. मात्र, विधानसभेच्या कामकाजात सोमवारी गिलोटिन (चर्चारोध) ठेवण्यात आलं होतं. पण, नितीन राऊत यांच्या मुद्यावर अध्यक्षांनी मागच्या वेळेचे अथवा मागील दिवसातील प्रश्न आपण पुढे घेत नाही, असा मुद्दा मांडला. त्यावरून भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नार्वेकरांच्या मदतीला आशिष शेलार धावून आले. तसेच, अपवादात्मक परिस्थिती म्हणून गिलोटिन आज चर्चेला घेण्यात येईल, असे उत्तर नार्वेकरांनी जाधवांच्या मुद्यावर दिले.

सभागृहात नितीन राऊत (Nitin Raut) यांनी उपस्थिती केलेल्या मुद्यावर मागच्या वेळेचे आणि गेल्या दिवसांतील प्रश्न पुढे घेण्याची प्रथा नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सांगितले. त्यानंतर आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी अध्यक्ष महोदय आपण, विधानसभेच्या कामकाजातील मागच्या वेळचे आणि गेल्या दिवसांतील प्रश्न पुढे घेण्याची प्रथा नाही, असा शब्द प्रयोग केला. ते खरंही आहे. आपण वस्तुस्थिती बोललात. पण, विधीमंडळाच्या इतिहासात एकदा गिलोटीन जाहीर झालं की ते रद्द होण्याचा प्रकार सोमवारी पहिल्यांदाच आपल्या विधीमंडळात घडला. त्यामुळे विधीमंडळाच्या विशेषतः विधानसभेच्या कामकाजावर वेगवेगळे विचारवंत आणि जाणकरांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली आहे.

काही प्रथा मोडीत काढल्या जात आहेत, त्यावर मी सातत्याने बोलतो आहे. आपण त्यासंदर्भाने गांभीर्याने घेत नाहीत. कदाचित माझ्याबद्दल आपल्या मनात काय आकस आहे, हे मला माहीत नाही. तेवढ्यात सत्ताधारी बाकावरून ‘हेतू आरोप करू नये,’ अशी कमेंट झाली. त्यावर गांभीर्याने घेत नाही, यात हेतू आरोप काय झाला. सभागृहात तुम्ही बोलूच देत नाही म्हणजे काय झालं, असं भास्कररावांनी खडसावलं.

विधानसभेचे सभागृह अकरा वाजता सुरू झाल्यावर मी त्या ठिकाणी आलो होतो. विधीमंडळ सचिवांना आपल्याला आठवण करायला सांगितलं होतं की, आज गिलोटिन (चर्चारोध) आहे. ते आपल्याला टाळता येणार नाही, असे सांगून गेलो होतो. त्यांनी तो विषय आपल्यापर्यंत पोचवला की नाही, हे मला माहिती नाही. पण आपण कालचं गिलोटिन टाळलं किंवा पूर्वी असं कधी टाळलं होतं का. याबाबत खुलासा करावा, अशी विनंती भास्कर जाधव यांनी केली.

भास्कररावांनी कोंडीत पकडलेल्या राहुल नार्वेकरांच्या मदतीला आशिष शेलार धावून जाऊन स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात एकच्या सुमारास माझ्यासह काही आमदार होते. पाऊस वाढला, ट्रेन्स रद्द झाल्या आहेत, अशा बातम्या आल्या. त्यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्री, अधिकारी आज सुटी जाहीर करणार आहेत.

प्राप्त परिस्थितीत सरकार सुटी जाहीर करणार असेल, तर विधानसभेच्या सभागृहात अंतिम निर्णय विधानसभा अध्यक्षांचा मानला जातो. पण आपत्कालीन परिस्थितीत सरकार सुटीचा निर्णय जाहीर करणार असेल तर तो निर्णय सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित आहे का. तो सभागृहाला पूरक आहे का, असे सांगून त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

शेलार यांनी अध्यक्षांच्या दालनातील घटनाक्रमाविषयी सांगताच भास्कर जाधव यांनी अध्यक्षांच्या चेंबरमधील चर्चा सभागृहाला कळण्याचं काहीच कारण नाही. प्रथेप्रमाणे अध्यक्षांनी सभागृहात येऊन उपस्थित सदस्यांचा कौल घ्यायला पाहिजे होता. सभागृह हे सर्वोच्च आहे, सरकारने काय निर्णय घेतला, यापेक्षा अध्यक्षांनी सभागृहाचा कौल घेणे महत्वाचे होते, असे सांगितले.

भास्कर जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, भास्कर जाधवांनी सभागृहाच्या प्रथा परंपरानुसार कामकाजासंदर्भात काही गोष्टींबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईत सोमवारी पावसाची काय परिस्थिती होती, हे सर्वांनाच माहिती आहे. अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाल्याने मुंबईत सर्वत्र पाणी साचले होते. त्यामुळे आपण सव्वा एकच्या सुमारास सभागृह तहकूब केले. भास्कर जाधवांविषयी माझ्या मनात कोणताही आकस ठेवण्याचा विषयच उद्‌भवत नाही. आपल्याविषयी प्रेम आणि आदराचीच भावना आहे.

सभागृहाचा कौल घेऊनच विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री यांना काल सभागृहात बोलायची संधी दिली. इतर सदस्यांनाही बोलायाची संधी दिली. आमदार आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये; म्हणून कामकाज पुढं ढकलं. आपण गिलोटिन रद्द केलेलं नाही. आपत्कालीन परिस्थिती म्हणून ते गिलोटीन आज आपण चर्चेला घेणार आहेात, असे सांगून अध्यक्षांनी पुढील चर्चेला सुरुवात केली.

गिलोटिन म्हणजे काय?

गिलोटिन म्हणजे चर्चारोध. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अनुदानाच्या मागण्यांवर सभागृहात चर्चा होते. धोरणे, संबंधित विभागाचे कामकाज यांवर विस्ताराने सदस्य बोलतात. पण चर्चेसाठी ठरविलेल्या दिवसांपैकी शेवटच्या दिवशी सभागृहाचे कामकाज संपण्यापूर्वी ही चर्चा थांबवली जाते. म्हणजे अर्थसंकल्पावरील ती चर्चा वाढवली जात नाही. ज्या विभागाच्या अनुदानाच्या मागणीवर चर्चा अथवा मतदान झाले तर ते वगळून इतर सर्व विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवर मतदान होते आणि त्या मंजूर केल्या जातात. त्या प्रक्रियेला गिलोटिन अथवा चर्चारोध असे म्हणतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT