Former Prime Minister Atal Bihari Vajpayee passionately addressing the Lok Sabha in 2002 in response to Sonia Gandhi’s remarks on working under pressure. Sarkarnama
विशेष

Atal Bihari Vajpayee : चारित्र्यावर कलंक, अभद्र भाषा..! संतापलेल्या वाजपेयींनी सोनिया गांधींवर लोकसभेत साधले होते शरसंधान...

Sonia Gandhi’s Allegations in Parliament : ‘पोटा’ बिलावर लोकसभेतील चर्चेदरम्यान सोनिया गांधी यांनी अटलबिहारी वाजपेयींवर दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर वाजपेयींनी आवर्जून लोकसभेत येत सडतोड प्रत्युत्तर दिले होते.

Rajanand More

Atal Bihari Vajpayee’s Powerful Response in 2002 : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेला संघर्ष अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे थांबल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली आल्याचा आरोप होत आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही सरकारवर दबाव असल्याचा आरोप राहुल गांधींकडून सातत्याने केला जातो. असेच आरोप 23 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरही झाले होते. विशेष म्हणजे हे आरोप तत्कालीन विरोधी पक्षनेते सोनिया गांधी यांनी केले होते.

‘पोटा’ बिलावर लोकसभेतील चर्चेदरम्यान सोनिया गांधी यांनी वाजपेयींवर दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर वाजपेयींनी आवर्जून लोकसभेत येत सडतोड प्रत्युत्तर दिले होते. 26 मार्च 2002 रोजीच्या या भाषणादरम्यान वाजपेयींना आपला संताप अनावर झाला होता. तसे त्यांनी आपल्या भाषणादरम्यान बोलूनही दाखवले होते.

चर्चेत सहभागी होण्याची आपली इच्छा नव्हती, असे सांगत त्यांनी भाषणाला सुरूवात केली होती. पण जेव्हा मी ऐकले आणि वाचले की, माझ्याविषयी सोनिया गांधी यांनी विशेष उल्लेख केला आहे, त्यामुळे स्पष्टीकरण देणे आवश्यक झाले, असे सांगत वाजपेयींनी सोनियांचे भाषण वाचून दाखवत त्यावर कठोर शब्दांत भाष्य केले होते.

सोनिया गांधी यांनी वाजपेयी भाजपशी संबंधित संघटनांच्या दबावाखाली असल्याचा आरोप केला होता. त्यावर सोनिया यांनी आपल्या परिवाराच्या मुद्द्यांमध्ये दखल देऊ नये, असे प्रत्युत्तर वाजपेयींनी दिले होते. काँग्रेसच्या कृपेने मी पंतप्रधान नाही. काँग्रेसच्या विरोधानंतरही आहे. लोक जोपर्यंत मला स्वीकारतील, तोपर्यंत राहीन. पण माझ्याविषयी एवढी रुची असण्याची गरज काय आहे?, असा सवालही वाजपेयींनी केला होता.

मी दबावाखाली काम करतोय, हा माझ्यावर आरोप आहे. हे चुकीचे आहे. मी कुणाच्या दबावाखाली काम करत नाही. संसदेतील जीवन याचे साक्षीदार आहे. मी 1957 मध्ये पहिल्यांदा लोकसभेचा सदस्य बनलो. मी दबावाखाली काम केले असते तर माहिती नाही काय झाले असते. मी परिवाराच्या दबावाखाली आहे, असे म्हटले जाते. डावे पक्ष मी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याचे बोलतात. आम्ही दबावाखाली काम करत असू तर मग आमचे मित्रपक्ष माझ्यासोबत का आहेत? जगाचा विरोध पत्करून आम्ही अणुचाचणी केली. कुणाच्या दबावाखाली आम्ही आलो नाही, असे सडेतोड उत्तर वाजपेयींनी दिले होते.

अणुचाचणीबाबत माजी पंतप्रधान कशा वागल्या होत्या, हे सगळं मी संसदेपुढे मांडू शकतो. एकदा परीक्षण करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. भूयार खोदण्यात आले होते. चाचणीची तारीख ठरली होती. पण ऐनवेळी चाचणी रद्द करण्यात आली. कारण विदेशी दबाव होता, असा प्रहार वाजपेयींनी काँग्रेसवर केला होता.

भाषणादरम्यान काही विरोधी नेत्यांकडून विरोध केला जात होता. त्यावर वाजपेयी संतापले. ऐकण्याची एक मर्यादा असते. तुम्ही गप्प बसा. कारगील युध्द सुरू असताना राष्ट्रपती क्लिंटन यांनी मला वॉशिंग्टनमध्ये बोलवले होते. इथे पाकिस्तानचे पंतप्रधानही आले आहेत, तुम्हीही या. दोघे मिळून चर्चा करा, असे ते म्हणाले होते. पण मी त्यांना सांगितले, जोपर्यंत भारताची एक इंचही जमीन पाकिस्तानकडे आहे, तोपर्यंत मी चर्चा करणार नाही. मी त्यावेळी अमेरिकेच्या दबावाखाली आलो नाही, असे प्रत्युत्तर वाजपेयींनी दिले होते.

पंतप्रधानांविरोधातील या भाषेचा अर्थ काय आहे, माझ्या परीक्षेचा दिवस आला आहे, याचा अर्थ काय आहे, असे सवाल करत पुन्हा वाजपेयींनी सोनिया गांधींच्या भाषणावर संताप व्यक्त केला होता. मी रोज परीक्षा देतोय. सोनियाजी राजकारणापासून कोसो दूर होतो, तेव्हापासून मी या संसदेत आहे. आज मला आरोपीच्या पिंजऱ्या उभे केले जात आहे. काय अधिकार आहे?, असा संतप्त सवाल वाजपेयींनी केला होता.

त्यावर काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार गदारोळ घालण्यास सुरूवात केली. त्यानंतर लोकसभेच्या उपाध्यक्षांनी वाजपेयींच्या संमतीने खासदार अर्जून सिंग यांना बोलण्यास परवानगी दिली. त्यांनी वाजपेयींच्या सोनिया गांधींविषयी वापरलेल्या शब्दांवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. त्यावर वाजपेयींनीही माझ्या भाषणात असंसदीय शब्द असल्यास ते कामकाजातून वगळावेत, असे उपाध्यक्षांना सांगितले होते. माझ्या बोलण्याच्या पध्दतीवर आक्षेप घेतला जातोय. पण या वयात ते मी बदलू शकत नाही, असा टोलाही वाजपेयींनी विरोधकांना लगावला होता. जवाहरलाल नेहरूंनीही माझी ही पध्दत स्वीकारली होती. त्यानंतर आलेल्या पिढीकडूनही मला असे या लिखीत भाषणातील शब्द आहेत, तसे ऐकायला मिळाले नाहीत.

मी अजूनही सोनिया गांधींचे पूर्ण भाषण वाचले नाही, असे सांगत वाजपेयींनी काही मुद्दे वाचून दाखवत त्यातील काही शब्दांवर आक्षेप घेतला. या शब्दांविषयी सोनिया गांधींनी खेद व्यक्त करायला हवा. मी माझ्या संसदीय कामकाजात कधीही अभद्र भाषा वापरली नाही, ना अभद्र आचरण केले. ‘पोटो’विषयी हे आरोप केले जात आहेत. तुम्ही टाडा आणला तर ठीक आहे, तुम्ही मिसा आणला तर ठीक आहे. त्यावेळी आम्ही तुमच्या नीतिमत्तेवर संशय व्यक्त केला नव्हता. आज नीतिमत्तेवर संशय व्यक्त केला जातोय. म्हणून मला त्रास होतोय, असा संताप वाजपेयींनी व्यक्त केला होता.

मी खरेतर तर एका प्रश्नावरून त्यांचे कौतुक करणार होतो. या भाषणात त्यांनी म्हटलंय की, दहशतवादाविरोधात आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुमच्यासोबत लढू. पण त्यांनी त्यांनी माझ्याविरोधातच लढाई सुरू केली. हे व्यक्तिगत आरोप आहेत. हे धोरणांसंबंधी नाहीत. हा माझ्या चारित्र्यावर कलंक आहे. मी ते सहन करू शकत नाही, असा संताप वाजपेयींनी व्यक्त केला होता.

मला इथे जनतेने पोहचवले आहे. मी दबावाखाली काम करत असेन तर माझे सहकारी मला सोडतील, पक्ष सोडेल. विरोधी पक्षनेत्यांनी मला हे सांगू नये, की मी दबावाखाली काम करू की कल्याण करू. मी माझ्या पध्दतीने देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करत आलो आहे आणि पुढेही करत राहीन. पण जर मला आपत्तीजनक शब्द ऐकायला मिळाले तर त्याचे उत्तरही ऐकावे लागेल, असे सांगत वाजपेयींनी आपले भाषण संपविले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT