Shivsena Vs Congress : शिवसेना नावाचे वादळ मुंबई नंतर मराठवाड्याची राजधानी असलेल्या तेव्हाच्या औरंगाबादमध्ये धडकले. शहरावर काँग्रेस आणि मुस्लिम लीग पक्षाचा प्रभाव होता. अशावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा विस्तार मुंबईबाहेर औरंगाबाद येथे केला. खान हवा की बाण हवा? अशी घोषणा देत 1988 मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने उडी घेतली. ठाकरेंच्या प्रभावाने पहिल्याच फटक्यात 28 नगरसेवक निवडून आले.
शिवसेनेला मिळालेले हे अभूतपूर्व यश राज्याच्या सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारे होते. काँग्रेसच्या अधिपत्याखाली वाटचाल करणाऱ्या शहरात पहिल्यांदाच नवख्या पक्षाने मुसंडी मारली होती. 60 नगरसेवकांच्या महापालिकेत शिवसेनेचे 28 आणि काँग्रेस आघाडीचे 32 नगरसेवक निवडून आले. या विजयाने शिवसेनेचा आत्मविश्वास कमालीचा बळावला आणि या जोरावर थेट महापौर पद पटकावण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मुंबईतील शिवसेनेच्या शिलेदारांना थेट संभाजीनगरमध्ये पाठवून नगरसेवकांची जुळवा जुळवा सुरू झाली.
आधीच शिवसेनेला मिळालेल्या या विजयाने प्रस्थापित काँग्रेस आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली होती. आता कोणत्याही परिस्थितीत महापालिकेतील सत्ता जाता कामा नये, या हेतूने काँग्रेस, मुस्लिम लीग, भारिप आणि गाडे गटाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आघाडीने कंबर कसली. महापौर पदाच्या निवडणुकीत मोठे राजकीय नाट्य घडले आणि त्यानंतर या शहराने पहिली जातीय दंगलही अनुभवली.
शिवसेनेचे 28 आणि काँग्रेस आघाडीचे 32 नगरसेवक निवडून आल्यानंतर महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू झाली. तत्कालीन काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख आणि अमानुल्ला मोतीवाला यांनी शांताराम काळे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. पोलीस आयुक्तालयाशेजारच्या अलंकार हॉलमध्ये महापौर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. तेव्हा शिवसेनेचे नगरसेवक प्रदीप जयस्वाल यांनी आक्षेप नोंदवला. पण निवडणूक अधिकाऱ्यांनी तो फेटाळला. यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.
जयस्वाल यांनी थेट मतपेटीच उचलली आणि ते सभागृहाबाहेर घेऊन गेले. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे इतर नगरसेवकही बाहेर पडले. पोलिसांनी त्यांच्या मागे धावत जाऊन मतपेटी परत आणली. महापौरपदासाठीचे संख्याबळ जुळत नसल्याचा अंदाज येताच शिवसेना नगरसेवकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकत सभागृह सोडले. त्यानंतर काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी मतदान केले आणि शांताराम काळे महापौर तर मुस्लिम लीगचे तकी हसन खान पहिले उपमहापौर झाले.
महापालिकेच्या पाच वर्षाच्या काळात पुढे मात्र महापौर पदाची संधी आलटून पालटून अपक्ष, शिवसेना,काँग्रेस या पक्षांना मिळाली. शांताराम काळे यांच्यानंतर अपक्ष मोरेश्वर सावे, शिवसेनेकडून प्रदीप जयस्वाल, पुन्हा काँग्रेसचे मनमोहनसिंग ओबेराय आणि त्यानंतर अशोक सायना यादव हे महापौर झाले. त्यानंतर मात्र सलग 27 वर्ष महापालिकेत शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांकडे महापौर पद आणि सत्ता होती.
यांना मिळाला महापौर पदाचा मान :
1988 ते 2020 या काळात शिवसेनेच्या पाठिंबावर सर्वप्रथम मोरेश्वर सावे, प्रदीप जयस्वाल, सुनंदा कोल्हे, शीला गुंजाळ, सुदाम सोनवणे, विकास जैन, विमल राजपूत , रुक्मिणी शिंदे, किशनचंन तनवाणी , अनिता घोडेले, कला ओझा, त्र्यंबक तुपे आणि नंदकुमार घोडेले यांनी महापौर पद भूषवले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.