Abhimanyu Pawar, Dinkar Mane, Santosh Somvanshi, Shrishail Utage Sarkaranama
विशेष

MVA News : औसा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत कुरघोडीचे राजकारण; नेतेमंडळींचे मात्र सूचक मौन

MVA Politcs News : औसा मतदारसंघावर आघाडीतील घटक पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी दावा केला असला तरी या जागेबाबत आघाडीतील नेतेमंडळींने मात्र सूचक मौन पाळले आहे.

Sachin Waghmare

Latur News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विजय मिळाल्याने त्यांचे मनोबल उंचावले आहे. त्यातच आता राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेसमध्ये रस्सीखेच पहावयास मिळत आहे.

औसा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांना जवळपास 50 हजार पेक्षा अधिक मताची आघाडी आहे. त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांच्यासाठी ही आघाडी धोक्याची घंटा ठरत आहे.

दुसरीकडे या जागेवर आघाडीतील शिवसेना (Shivsena) ठाकरे गट, काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे येथील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर आघाडीतील घटक पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी दावा केला असला तरी या जागेबाबत आघाडीतील नेतेमंडळींने मात्र सूचक मौन पाळले आहे.

लातूर जिल्ह्यातील सहापैकी लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा ही तीन मतदारसंघ काँग्रेस (Congress) लढणार आहे. तर उदगीर, अहमदपूरवर राष्ट्र्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा दावा आहे. त्यामुळे औसा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गट दावा करू शकतो. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या आघाडीच्या जागावाटपात या जागा कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

औसा मतदारसंघात करण्यात आलेल्या सर्व्हेत महायुती बॅकफुटवर असल्याचे चित्र आहे. या मतदार संघातील मुस्लिम, दलित मतदार त्यांच्यापासून दुरावला आहे. तर मराठा व ओबीसीमध्ये मताची विभागणी होत असून त्यामुळे त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात या मतदारसंघात महायुतीला तयारी करावी लागणार आहे.

औसा मतदारसंघात या पूर्वी दोनवेळा शिवसेनेचे दिनकर माने आमदार राहिले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यानंतर याठिकाणी काँग्रेसचे बसवराज पाटील हे दोनवेळा आमदार राहिले आहेत. पराभूत झाल्यानंतर नुकताच त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अभिमन्यू पवार याठिकाणी निवडून आले.

या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे व मानणारे मतदार मोठ्याप्रमाणात आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून माजी आमदार दिनकर माने हे इच्छुक असून ते तयारी करीत आहेत. त्यासोबतच शिवसेनेचे संतोष सोमवंशी देखील इच्छुक असून त्यांनी तयारी सुरु केली आहे.

काँग्रेसकडून लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे हे इच्छुक असून गेल्या काही दिवसापासून ते या ठिकाणी तयारी करीत आहेत. त्यामुळे ही जागा कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघाबाबत वरिष्ठ नेत्यांची मुंबईत 7 ऑगस्टला बैठक हॊणार असून त्यामध्ये निर्णय होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT