Balasaheb Thackeeay Birthday :  Sarkarnama
विशेष

Balasaheb Thackeray Birthday : बाळासाहेबांनी नाशिकवर प्रेम केले अन् या गोदानगरीनेही शिवसेनेला भरभरून दिले...

Chetan Zadpe

Shivsena News : शिवसेना या पक्षाच्या प्रवासात नाशिकचं महत्त्वाचं स्थान आहे. फार कमी लोकांना याची माहिती असेल की, नाशिकचे विमादी पटवर्धन हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गुरुस्थानी होते. शिवसेनेच्या स्थापनेआधी ठाकरे विमादींकडे येऊन या विषयावर प्रदीर्घ मंथन करीत असत. त्यामुळे शिवसेनेच्या स्थापनेत नाशिकचादेखील एक आगळावेगळा संदर्भ राहिला आहे. (Latest Marathi News)

यासंदर्भात नाशिकचा विशेष अभ्यास असलेले आणि पूर्वाश्रमीचे शिवसेना पदाधिकारी डॉक्टर कैलास कमोद यांनी हे संदर्भ सांगितले आहेत. या विषयावर विविध वर्तमानपत्रांमध्ये काही माहितीदेखील यापूर्वी प्रकाशित झाली आहे. मात्र महाराष्ट्रातील फार कमी लोकांना शिवसेनेच्या स्थापनेमध्ये नाशिकचादेखील एक महत्त्वाचा सहभाग राहिला आहे, याची कल्पना असावी.

साहित्यिक आणि विचारवंत असलेले 'विमादी' पटवर्धन हे नाशिकचे होते. शहराच्या बुधवार पेठ भागात आणि सध्याच्या सुभाष वाचनालयाच्या गल्लीत 'विमादी' पटवर्धन यांचा वाडा होता. साधारणत: 1967 च्या सुमारास व शिवसेनेच्या स्थापनेआधी बाळासाहेब ठाकरे 'विमादी' यांना भेटण्यासाठी या वाड्यात येत असत. 'विमादी' यांच्याशी त्यांचा नियमित संपर्क होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे लोकांना फारसे परिचित नव्हते. ते येऊन गेल्यावर प्रबोधनकारांचे पुत्र विमादींना भेटण्यासाठी येऊन गेले, अशी चर्चा होत असे.

बाळासाहेब ठाकरे यांची विमादी यांच्याशी शिवसेनेच्या स्थापनेबाबत आणि ही संघटना कशी असावी, या विषयावर चर्चा होत असे. त्यात विमादी यांनीदेखील काही कल्पना सूचना व सल्ला नक्कीच दिला असावा. त्याचा विचारही ठाकरे यांनी गांभीर्याने केला असावा, शिवसेना ही संघटना आणि संकल्पना प्रबोधनकार ठाकरे यांची आहे. त्यात काही वाटा विमादी पटवर्धन यांच्या रूपाने नाशिकचादेखील आहे, असे म्हणता येईल.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर लगेचच काही दिवसांत 1969 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांची एक सभा आजचे दामोदर सिनेमागृह आणि भद्रकाली बाजार येथील मोकळ्या जागेत झाली होती. त्या सभेनंतरदेखील ठाकरे हे विमादी पटवर्धन यांना भेटण्यासाठी गेले होते.

बाळासाहेब ठाकरे आणि नाशिक यांचे अतिशय प्रदीर्घ ऋणानुबंध आहेत. आज शिवसेना विख्यात संघटना आणि राजकीय पक्ष झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व संघटनेचे कौशल्य आणि वक्तृत्व यालादेखील जगभरामध्ये निश्चितच वाखाणले गेले. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाशी ठाकरे यांचा संबंध जोडला जातो. मात्र नाशिकची त्यांचे एक वेगळे नाते होते, ते शेवटपर्यंत कायम राहिले. विशेषतः शिवसेनेच्या स्थापनेत नाशिकचे महत्त्वाचे स्थान होते.

(Edited by - Chetan Zadpe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT