Ramesh Bodke,Balasaheb Thackeray Sarkarnama
विशेष

Bal Thackeray Birth Anniversary: भुईमुगाच्या शेंगा अन् 'दोराबजी'बिर्याणीवर बाळासाहेब ताव मारायचे!

Mangesh Mahale

Balasaheb Thackeray Jayanti : पुण्याचे अन् बाळासाहेब ठाकरे याचं अतूट नाते, पुण्यात अनेक शिवसैनिक त्यांचे निकटवर्तीय होते. ज्येष्ठ शिवसैनिक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश बोडके हे 1972 पासून त्यांच्या संपर्कात आले. त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना दिलेला उजाळा...

बाळासाहेबांनी पु्ण्यात नंदू घाटे, सुभाष सर्वगौड, काका वडके, शशिकांत सुतार, दीपक पायगुडे, अप्पा अमराळे, रामभाऊ पारिख, नाना वाडेकर, निलम गोऱ्हे आदी अनेक कार्यकर्ते घडवले. पुण्यात गणेश उत्सवात दंगल माजली होती. त्यावेळी बाळासाहेबांना काका वडकेंनी पुण्यातील महाराष्ट्र मंडळाच्या सजावटीच्या उद्धघाटनासाठी बोलवले होते.

पुण्यात दंगल सुरु असताना बाळासाहेब म्हणाले, 'चला पायी फिरुन येऊ,' असे म्हणत ते फडके हौद ते जिजामाता उद्यानपर्यंत चालत गेले. त्यावेळी सुटकेसचे दुकान नुकतेच पेटवण्यात आल्याचे त्यांना दिसले, मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी त्यापुढे जाऊ नका, अशी विनंती ठाकरेंना केली, विनंती मान्य करून ते गाडीत बसून हॉटेलकडे रवाना झाले.

कार्यकर्त्यांना ते जिवापाड जपत..

एकदा बाळासाहेब हे भाऊसाहेब शिरोळे यांच्या पंपावरून जात असताना तेथे बसलेल्या भाऊसाहेबांनी त्यांना बोलावले. त्यानंतर गप्पांची मैफल रंगली. बाळासाहेब त्यांना म्हणाले, "शिरोळे आणि सणसांमुळे पुण्यात काँग्रेसचे वर्चस्व राहिले,"खाण्याबाबत बाळासाहेब चोखंदळ होते, पुण्यातील कॅम्प परिसरातील दोराबजी हॉटेलमधील बिर्याणी त्यांना खूप आवडायची.

त्यांना त्या बिर्याणीची आठवण झाली की ते मागवायला सांगत. जवळच्या कार्यकर्त्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते, कार्यकर्त्यांना ते जिवापाड जपत. मुंबईत गेलेल्या पुण्यातल्या कार्यकर्त्यांना नाश्ता जेवण केल्याशिवाय ते पाठवत नसे.

पुण्यात शिवसेनेचे कार्यालय बांधा...

आम्ही हॉटेलकडे रवाना होत असताना वाटेत त्यांना शेंगाची गाडी दिसली. त्यांनी शेंगा घेण्यास सांगितले. आमच्यासोबत असलेले मनोहर जोशी यांनी दहा रुपयाची नोट दिली. त्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्वांनी शेंगांचा खरपूस आस्वाद घेतला.

पुण्यात शिवसेनेचे कार्यालय बांधा, असे बाळासाहेब नेहमी म्हणायचे. कार्यालय झाले की मला उतरायला बरे पडेल. दुमजली इमारत बांधली तर वरच्या मजल्यावर मी राहू शकेल, असे ते म्हणायचे. मात्र अशी जागा न मिळाल्यामुळे शिवसेनेचे कार्यालय झाले नाही.

पुण्यातील राजकारणावर ही बाळासाहेबांचे बारीक लक्ष असायचे, पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या हालचाली पुण्यातून चालत असायच्या. निवडणुकीच्या वेळेस उमेदवारांच्या मुलाखती 1990 मध्ये त्यांनी पुण्यात आपटे सभागृहात घेतल्या होत्या. भाजपसोबत युती झाल्यावर त्यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात शशिकांत सुतार यांच्यासाठी मागून घेतला होता.

पालकमंत्रिपद त्यांनी शिवसेनेकडे घेतले...

विधानसभेच्या 1995 मध्ये निवडणुकीच्या प्रचारात मला पुण्यातील पुण्यातून आमदार हवेत, ते म्हणाले होते. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्यांनी शिवसेनेकडे घेतले. त्यांनी पुण्याच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.

खडकवासल्याच्या धरणाचे पाणी शुद्ध ठेवा पुणेकरांना पुरेसे पाणी द्या, असे आश्वासन निवडणुकीत दिले होते. युतीच्या काळात खडकवासला धरणापासून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या बंद नळ योजनेच्या मान्यता मिळाली आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांचे भूमिपूजन झाले.

बाळासाहेब विरोधकांवर तुटून पडायचे. आपल्या सभांमधून ते टिका करायचे. शंकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना पुण्यात बाळासाहेब आणि ते एकाच व्यासपीठावर होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अमृत महोत्सवानिमित्त बाळासाहेबांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली त्याची तेव्हा उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या होत्या.

Ramesh Bodke,Balasaheb Thackeray

वसंतराव वैद्य यांच्याकडे ते नेहमी जात

नंदू घाटे यांच्या चारही मुलींच्या लग्नात बाळासाहेब उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्याशी बोलत मॉडेल कॉलनीत राहत असलेल्या वसंतराव वैद्य यांच्याकडे ते नेहमी जात. त्यांच्याकडे गप्पांची मैफल रंगायची.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT