Balasaheb Thackeray Birth Anniversary News in Marathi: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला वंदन करून, अशा पद्धतीने भाषणाची सुरुवात करून युवा मंडळींच्या मनात स्फुल्लिंग चेतवण्याचे काम दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वर्षोनुवर्षे केले. बाळासाहेबांची तुळजाभवानीवर नितांत श्रद्धा होती.
त्यांनी कुठल्याही कार्याची सुरुवात आईभवानीला वंदन करूनच केली. ठाकरेंनी 'जय भवानी, जय शिवाजी'हा जयघोष पहिल्यांदा तुळजापुरातच दिला. बाळासाहेबांनी दिलेला हा स्फूर्तीचा मंत्र शिवसैनिकांनी आपल्या हृदयात कायमचा कोरला.
बाळासाहेब जेथे जातील तेथे 'जय भवानी,जय शिवाजी'चा जयघोष होत होता. 'जय भवानी, जय शिवाजी'असा जयघोष झाला की ती सभा शिवसेनेची म्हणून आजही लांबून न पाहता कोणीही ओळखते.
शिवसेना ही देखील मराठी माणसाच्या वेदनेतून निर्माण झालेली संघटना. शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 साली त्यांनी मुंबईत केली. शिवसेनेची स्थापना केल्यानंतर ते 1968 साली पहिल्यांदा तुळजापुरला देवीदर्शनासाठी आले होते.
त्यावेळी त्यांच्यासोबत अंदाजे 50 कार्यकर्ते होते. भवानी रोडवरील आशीर्वाद लॉजवर ते थांबले असता, लॉजमालकांनी पुजारी दिगंबर इंगळे यांची बाळासाहेबांची भेट घालून दिली. त्यावेळी बाळासाहेबांनी पहिल्यांदाच तुळजाभवानीची विधिवत पूजा केली.
यावेळी बाळासाहेब ठाकरे तुळजापूरमध्ये प्रथमच आल्यानंतर त्यांनी देवीला दही, तूप, दूध केळीचा पंचामृताचा अभिषेक केला.सर्व साहित्याचे मिश्रण करुन हाताने देवीच्या संपूर्ण मूर्तीला लावण्यात येत होते. हा प्रकार बाळासाहेब कौतुकाने पाहत होते.
मंदिराबाहेर आल्यावर त्यांनी पुजाऱ्यांना अभिषेकाबद्दल अधिक तपशीलाने माहिती विचारली.यावेळी पुजाऱ्यांनी अभिषेकाची परंपरा त्याचे पारंपारिक महत्त्व कथन केले. पहिल्यांदाच आशीर्वाद घेतल्यानंतर बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रावर भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेच्या विस्तारासाठी भवानीआईला साकडे घातले होते.
त्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे 1994 मध्ये शिवसेना महिला आघाडीच्या तीन दिवसीय मेळाव्याच्या निमित्ताने मीनाताई ठाकरे यांच्यासह तुळजापुरात आले होते. तुळजाभवानी मंदिरासमोरील भवानी शंकराचे दर्शन घेताना पिंडीवर असलेली एकमुखी रुद्राक्षाची माळ त्यांनी उचलून आपल्या गळ्यात घातली. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रावर भगवा फडकू दे, असे साकडे घातले.
याबरोबरच सोबत आणलेल्या गंगेच्या पाण्याने माता तुळजा भवानीला स्नान घातले. पुजारी कुमार इंगळे यांचे वडील पुरोहित कै. दिगंबर इंगळे यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा केली होती. 1994 साली शिवसेनेच्या मेळाव्यात बाळासाहेबांनी पदाधिकाऱ्यांना होर्डिंगवर देखील तुळजाभवानीचे छायाचित्र लावण्याच्या सूचना केल्या होत्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भवानी शंकराच्या पिंडीवरील रुद्राक्षाची ही माळ पुढे आयुष्यभर बाळासाहेबांच्या गळ्यात होती. विशेष म्हणजे 1994 च्या या मेळाव्यानंतरच मराठवाड्यात शिवसेनेने विविध ठिकाणी विजयी पताका फडकावल्या. त्यासोबतच त्यांनी 1995 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात तुळजापूरमधून केली होती.
यावेळी त्यांनी 1995 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेचा भगवा विधानसभेवर फडकवू दे, असे साकडे घातले होते. त्यासोबतच तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा आमदार निवडून येऊ दे,असे साकडे घातले होते.
त्यानंतर त्यांनी उमरगा येथे मोठी जाहीर सभा घेत 1995 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला होता.ही सुरुवातीच सभा 'ना भूतो, ना भविष्यतो'अशीच झाली. त्यामुळे या निवडणुकीनंतर 1995 ला राज्यात शिवसेना भाजप युतीचे पहिल्यांदा सरकार आले. बाळासाहेबांनी पाहिलेले स्वप्न पहिल्यांदा साकार झाले.
धाराशीव जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले. शिवसेनेचे मनोहर जोशी (manohar joshi) मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यानंतर सत्ता आल्यानंतर ते दर्शनासाठी येणार होते. मात्र, त्यातच त्यांच्या कुटुंबावर दोन संकटे वर्षभरात कोसळली. पत्नी मीनाताई ठाकरे, चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांना परत दर्शनासाठी येता आले नाही.
बाळासाहेबांनी कायम त्यांच्या वाटचालीत तुळजाभवानी मातेला कायम प्रेरणास्थानी मानून काम केले. ठाकरे कुटुंबीय तुळजाभवानीचे निस्सीम भक्त आहेत. त्यामुळेच जेव्हा कधी ते तुळजापूर परिसरात येत तेव्हा ते आवर्जून आई तुळजाभवानीचे दर्शन घेत होते. मात्र, ती परंपरा पुढे उद्धव ठाकरे यांनी जपली आहे. प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात ते तुळजापुरला येऊन करतात.
दर्शनाला आल्यानंतर बाळासाहेब पाच मिनिटे देवी पुढे नतमस्तक होत असत, अशी माहिती दिगंबर इंगळे यांचे चिरंजीव पुजारी कुमार इंगळे यांनी दिली. बाळासाहेब यांच्या सांगण्यावरून यापूर्वी पुजारी दिगंबर इंगळे यांनी अनेकवेळा मातोश्रीवर देवीच्या पायावरचे कुंकू व प्रसाद नेला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठीही कुमार इंगळे मातोश्रीवर देवीचा प्रसाद घेऊन गेले.
विशेष म्हणजे पुजारी असल्यामुळे त्यांना आजही मातोश्रीवर थेट प्रवेश आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून देवीची सेवा सुरूच आहे. दरवर्षी नवरात्रात दुर्गाष्टमीला देवीला ठाकरे घराण्याचा अभिषेक असतो,असेही कुमार इंगळे यांनी सांगितले.
त्यासोबतच तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा आमदार निवडून येऊ दे, असे साकडे घातले होते. हे बाळासाहेबांचे स्वप्न मात्र अधुरे राहिले. तुळजापूर मतदारसंघात आतापर्यंत शिवसेनेच्या उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. विशेष म्हणजे 2009 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ही जागा शिवसेनेने भाजपला सोडली आहे.