Balasaheb Thackeray Birthday: बाराव्या वर्षी घेतला बाळासाहेबांकडून गुरूमंत्र!

Shiv Sena Jayant:शिवसेनेचे काम मरेपर्यंत थांबविणार नाही...
Balasaheb Thackeray Birthday
Balasaheb Thackeray BirthdaySarkarnama
Published on
Updated on

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने जाणून घेऊया नाशिकचे शिवसैनिक जयंत दिंडे यांनी सांगितलेल्या आठवणी...

१९७८ साली लोणावळ्यातील एका कंपनीसमोर दत्ताजी साळवी भाषण करीत होते. त्यांचे भाषण ऐकले अन् शिवसेना हे नाव मनात घर करून गेलं. यानंतर काहीच महिन्यात मातोश्रीवर जाण्याचा योग आला. 'स्वाक्षरी काय घेतो मुला, मी तुला गुरूमंत्र देतो,' असे म्हणत बाळासाहेबांनी नाशिक ग्रामीणचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्या खांद्यावर हात ठेवला. आजही या गुरूमंत्रावर दिंडेचे आयुष्य उभे आहे. बाळासाहेब अन् शिवसेना यासाठी दिंडेंनी उभे आयुष्य पणाला लावले. लग्नही केले नाही. बाळासाहेबांच्या अनेक आठवणी समोर येतात. त्यांचा एक एक शब्द आजही त्याच ताकदीने मनात घर करून असल्याचे जयंत दिंडे सांगतात.

शिवसेना या नावाने घर केले.

नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला. मुंबईबाहेर शिवसेना बाहेर पडली अन् नाशिकमध्ये स्थिरावली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पक्षीय राजकारण आणि पक्ष संघटन यात मेळ घालताना बाळासाहेबांनी अनेक कार्यकर्ते उभे केले. त्यात नाशिक ग्रामीणचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे हे एक होते. बाळासाहेबांच्या आठवणींबाबत बोलताना जयंत दिंडे यांनी सांगितले की, तेव्हा मी लोणावळ्यात एका इंग्लीश मिडीयम शाळेत होतो. हॉस्टेलला राहायचो. १२ ते १३ वर्षांचा असेन. लोणावळ्यातील एका कंपनीसमोर दत्ताजी साळवे भाषण करीत होते. ते भाषण मी ऐकले अन् माझ्या मनात बाळासाहेब अन् शिवसेना या नावाने घर केले.

मी तुला गुरूमंत्र देतो...

माझे दाजी त्यावेळी भायखळ्याला राहत होते. तेही कार्यकर्तेच होते. एक दिवस त्यांच्याकडे गेलो, त्यावेळी त्यांची मातोश्रीवर जाण्याची तयारी सुरू होती. मी म्हणालो मलाही यायचं! तु काय करणार, असे ते म्हणाले पण त्यांनी मला सोबत घेतले. बाळासाहेबांचा वावर जिथे राहायचा तिथे त्यांचा दरारा आपोआप निर्माण व्हायचा. तो ही दिवस तसाच होता. इंग्लिश मिडीयमचा विद्यार्थी असल्याने भीत भीत आटोग्राफ देतात का, असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी माझे नाव विचारले. नावावरून तु तर हिंदू वाटतो. मग, या स्वाक्षऱ्या काय गोळा करतोस. मी तुला गुरूमंत्र देतो. तो तु घेणार का, असे विचारले. मी हो म्हणाले. पण बघ एकदा गुरूमंत्र घेतला की मागे हटायचे नाही, असे साहेब म्हणाले. मी लागलीच प्रतिक्रिया दिली. त्यावेळी सदैव हिंदूचे रक्षण करायचे, परिणामाची चिंता करायची नाही, असा गुरूमंत्र साहेबांनी दिला. याच गुरूमंत्रानी माझी शिवसैनिक म्हणून नोंद झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Balasaheb Thackeray Birthday
Ram Mandir : रामाची मूर्ती श्यामल रंगाची का? जाणून घ्या!

नाशिकमधून मीच एकटा असायचो.

पुढे १९८२ मी नाशिकमध्ये आलो. त्यावेळी राजेंद्र बागुल हे शहरप्रमुख होते. माझे काम सुरू झाले होतेच. नगरपालिका क्षेत्र होते. किशोर थोरात हे आमचे जिल्हाध्यक्ष होते. दुर्दैवाने एका अपघातात त्यांचे निधन झाले. त्यावेळी बाळासाहेबांनी बागुल यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद दिले तर, माझ्याकडे शहरप्रमुखपद आले. ती वेळ पक्षासाठी खूप काम करण्याची होती. त्यामुळे युवावस्था आणि पुढे तरूणपण पक्षासाठीच गेले. बाळासाहेबांपुढे कधी घराचाही विचार आलाच नाही. पुढे मुंबई, कोकण, नाशिकसह महाराष्ट्रातील बहुतांश मतदार संघांमध्ये फिरणे झाले. अनेकदा अटीतटीच्या प्रसंगी मुंबईच्या टीममध्ये नाशिकमधून मीच एकटा असायचो.

बाळासाहेब ठाकरेंचे निधन, त्यापूर्वी राज ठाकरेंची फुट आणि आताची शिवसेनेची परिस्थिती याबाबत कडवट शिवसैनिक म्हणून काय वाटते, या प्रश्नाला उत्तर देताना दिंडे म्हणाले, ‘आताची जी परिस्थिती आहे, ती बघता मला कधीच दु:ख होत नाही. किंबहुना बाळासाहेबांचे सानिध्य लाभलेले शिवसैनिक संकट हीच संधी मानतात. पक्ष हा दोन पातळीवर असतो. एक राजकीय आणि दुसरी संघटनात्मक. शिवसेनेची पायाभरणीच संघटनात्मक पातळीवर भक्कम आहे.

राजकीय पातळीवर घडामोडी घडतात. आपण फोकसमध्ये राहावे यासाठी राजकीय व्यक्ती प्रयत्न करतात. त्यातून ते पक्षासाठी तयारच झाले नाही, याची जाणीव होते. अशा व्यक्ती सोबत असल्या काय की नसल्या काय याने फरक पडत नाही. मला सुरूवातीपासून संघटनेचे कामच भावले. ही बाब बाळासाहेबांना माहिती होती. त्यामुळे राजकीय पातळीवर काही निर्णय घ्यायचा असेल, अथवा तडजोड असेल तेव्हा मला बाजूला ठेवण्याचा निर्णय होत असे. मला त्याचे दु:ख कधीच वाटले नाही. उलट, माझ्यातील ताकद आणि उणिव याची जाणिव बाळासाहेबांना आहे, याचा अभिमान वाटायचा. आजही मी तुम्हाला राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही.

उद्धव ठाकरे त्यांच्यापैकी नाही...

शिवसेनेची संघटना भक्कम असली की शिवसेना पुन्हा भरारी घेते हा इतिहास आहे. विरोधक बाळासाहेबांना हुकूमशाह म्हणून टीका करायचे. पण, साहेबांनी आमच्या उपस्थितीत एकदाही एकतर्फी निर्णय घेतल्याचे आठवत नाही. उपस्थित असलेल्या प्रत्येकाची मते ते जाणून घ्यायचे. सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर ते आपला निर्णय द्यायचे. मात्र, दिलेल्या निर्णयानंतर पुन्हा मागे फिरायचे नाही, हा साहेबांचा गुण आजही स्मरणात असल्याचे दिंडे म्हणतात. काही राजकीय विरोधक राजकीय फायद्या तोट्याचे गणित आखून शिवसेनेकडे पाहतात. मात्र, उद्धव ठाकरे त्यांच्यापैकी नाही. बाळासाहेबांच्या जागी आता उद्धव ठाकरे असून, शिवसेना संघटनेचे काम मरेपर्यंत थांबविणार नाही’, असे दिंडे यांनी स्पष्ट केले.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com