Balasaheb Thorat, RadhaKrishna Vikhe Patil, Vivek Kolhe Sarkarnama
विशेष

Ganesh Sugar Factory Result : भाजपच्या मदतीनेच थोरातांनी विखेंना दिला धक्का; होमग्राऊंडवरच मोठा पराभव

Ahmednagar Politics News : यामुळे राहता या मतदारसंघातच विखेंना पहिल्यांदाच मोठा धक्का बसला.

Amol Jaybhaye

Nagar Vikhe Vs Thorat News : गणेश सहकारी साखर कारखान्यावर गेल्या आठ वर्षांपासून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता होती. ही सत्ता माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी एकत्र येत हिसकावून घेतली. सोमवारी झालेल्या मतमोजणीत त्यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन मंडळाने 19 पैकी 18 जागा जिंकून दिमाखदार विजय संपादन केला.

राधाकृष्ण विखे पाटील (RadhaKrishna Vikhe Patil) यांच्या गटाला केवळ एक जागा मिळाली. या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. सरासरी सहाशे ते सातशे मतांच्या फरकाने थोरात-कोल्हे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला. यामुळे राहता या मतदारसंघातच विखेंना पहिल्यांदाच मोठा धक्का बसला.

गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी एकत्र येत पॅनल तयार केले होते. विखे पाटील यांच्या विरोधात भाजपचेच कोल्हे मैदानात उतरल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. थोरात यांच्या संगमनेर आणि कोल्हे यांच्या कोपरगाव मतदारसंघात विखे लक्ष घालतात. यामुळे या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत विखे यांच्या राहता मतदारसंघातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातले.

या निवडणुकीच्या माध्यमातून थोरात आणि कोल्हे यांनी विखे पाटलांना एक प्रकारे इशारा दिला आहे. विखे यांनी थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात ग्रामपंचायतच्या निवडणुका लढवल्या होत्या. त्यामध्ये ही ठिकाणी त्यांना यश मिळाले. यामुळे विखे यांच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठीच ही थोरात-कोल्हे युती झाल्याचे सांगितले जात आहे.

या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय समिकरणे फार बदलणार नसली तरीही नगरमधील राजकीय नेत्यांनी विखे पाटलांना सूचक इशारा दिला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. विखे यांचा मतदारसंघात वाढणारा हस्तक्षेप हा थोरात आणि कोल्हे यांच्यासाठीही डोखेदुखी वाढवणारा आहे. यामुळे एकत्र येत त्यांना त्यांच्याच मतदासंघातील निवडणुकीत शह दिल्यामुळे विखे यांच्या वर्चस्वाला रोखले जाऊ शकते, याची निश्चितच त्यांना खात्री झाली आहे. त्यामुळे विखे पाटलांनाही पुढील काळात राजकारण करताना काळजी घ्यावी लागणार असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT