Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis. sarkarnama
विशेष

BJP Politics : अजित पवार, एकनाथ शिंदे सोबत नको! कार्यकर्त्यांना हवे शतप्रतिशत भाजप

Jagdish Pansare

BJP Politics : शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली यातून अडीच वर्षाची राज्यात सत्ता मिळाली. पण 106 आमदार असूनही भाजपला बॅकसीटवर बसावे लागले. पुन्हा येईन म्हणत 2019 च्या विधानसभेत युतीला बहुमत मिळवून देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. बरं हे सगळं ज्या लोकसभा निवडणुकीसाठी केलं तिथेही भाजपच्या पदरी निराशाच आली.

फोडोफोडीचे राजकारण केल्याचा आरोप, सर्वाधिक आमदार असून बॅकफुटवर राहून खेळावे लागले, शिवसेना-राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागामुळे निष्ठावंत भाजप आमदारांना मंत्री पदावर पाणी सोडावे लागले. या सगळ्याची सल भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कायम आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील भाजपच्या एका बैठकीतील व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. यात पक्षाचा एक पदाधिकारी अजित पवारांना सोबत का घेतले? असा जाब विचारत होता.

एकूणच एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत घेऊन केलेली महायुती वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय डावपेचाचा भाग असली तरी सामान्य भाजप कार्यकर्त्यांना ती कधीच पटली नाही. पण पक्षात नेत्यांच्यापुढे जायचे नाही हा शिरस्ता असल्याने हे कार्यकर्ते निमूटपणे आलेल्या आदेशाचे पालन करत होते. महाविकास आघाडीचे सरकार घालवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना बंड करायला लावून शिवसेना फोडली.

बहुमत असताना आणि नव्या मित्राची गरज नसताना राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि अजित पवारांसह 40 आमदारांना सत्तेत सहभागी करून घेतले. या सगळ्या राजकारणामुळे राज्यात व देशात भाजप आणि महाराष्ट्राची बदनामी झाली, अशी भावना निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात होती. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची पिछेहाट झाल्यानंतर आता मित्रपक्षांबद्दलचा असंतोष उफाळून येत आहे. महायुती नको, शतप्रतिशत भाजप हवे, असा सूर आता निघू लागला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपला फायदा तर झालाच नाही उलट महायुतीत सर्वाधिक बदनामीचा डाग याच पक्षाच्या माथी लागला. लोकसभेला झालेली चूक विधानसभेला तरी सुधारली जावी, अशी अपेक्षा भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

रविवारी (ता.21) पुण्यात झालेल्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार येईल, असे सांगितले. याचाच अर्थ महायुती असली तरी राज्याचे नेतृत्व आता भाजप करणार म्हणजेच मुख्यमंत्री पद आपल्याकडे असणार याचे स्पष्ट संकेत शाह यांनी आपल्या भाषणातून दिले. एकनाथ शिंदे-अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे दुखावलेल्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न होता.

लोकसभा निवडणुकीत राज्यात दारूण पराभव झाल्यानंतर एका झटक्यात मित्रपक्षांना बाजूला सारता येणार नाही. तसे केले तर आधीच पक्ष फोडल्याचा आरोप असलेल्या भाजपला नव्या वादाला सामोरे जावे लागेल. शिवाय राज्यातील राजकीय परिस्थिती, जातीय समीकरणे सध्या भाजपच्या विरोधात आहेत. अशावेळी शतप्रतिशतचा नारा अंगलट येऊ शकतो, याची जाणीव भाजपमधील चाणक्यांना आहे.

महायुतीतील मित्र पक्षांबद्दल भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असला तरी राजकीय अपरिहार्यता म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुका महायुती म्हणूनच लढाव्या लागणार आहेत, असा संदेश अमित शाह यांनी कालच्या अधिवेशनातून दिला आहे. एकीकडे महाविकास आघाडीची वज्रमूठ भक्कम होत असताना दुसरीकडे मित्र पक्षांशिवाय स्वबळावर विधानसभा निवडणुक लढवण्याचे धाडस भाजप करणार नाही.

भाजपचे हात सध्या दगडाखाली आहेत, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे मनात नसलं तरी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आणण्यासाठी ही तडजोड करावीच लागणार आहे. तुर्तास शतप्रतिशत भाजपचे स्वप्न रंगवणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आपल्या मनाला आवर घालावा लागणार आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT