Bhagirath Bhalke
Bhagirath Bhalke Sarkarnama
विशेष

BRS Offer to Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंना BRSची मोठी ऑफर : पवारांच्या दौऱ्यानंतर आठवडाभरातच राव यांनी साधला संपर्क

विजय दुधाळे

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर पंढरपूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांना भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधून मोठी ऑफर दिली आहे. मात्र, भालके यांनी मात्र ‘वेट ॲंड वॉच’ची भूमिका घेतली आहे. या घडामोडीमुळे राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली आहे. (BRS big offer to Bhagirath Bhalke)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात शेतकरी मेळावा झाला. त्या मेळाव्यात अभिजीत पाटील यांचा राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश झाला आणि विधानसभा उमेदवारीबाबत संकेतही दिले. त्यामुळे राष्ट्रवादीतील भालके, कल्याणराव काळे आणि युवराज पाटील हे विठ्ठल परिवारातील नेतेमंडळी नाराज झाले. पवारांनी सोलापुरात बोलावून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला शंभर टक्के यश आले नसल्याचे पुढील घडामोडीवरून दिसून येते.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे निमित्त साधून भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी शक्तीप्रदर्शन करत आपली भूमिका जाहीर केली. त्यात त्यांनी विधानसभेची आगामी निवडणूक संपूर्ण ताकदीने लढणार असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वीच पवारांचा दौरा झाल्यानंतर भालके गटाला चुचकारण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीकडून (BRS) करण्यात आला होता.

पवारांच्या दौऱ्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K CHANDRASHEKHAR RAO) यांच्या कार्यालयातून भगीरथ भालके यांना फोन आला होता. भालके यांनी पक्षात प्रवेश करावा. विधानसभेच्या उमेदवारीसह पक्षाची आणखी काही जबाबदारी देण्याचा शब्दही राव यांच्याकडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भालके यांना बीआरएसमध्ये सामील करून घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री राव यांनी त्यांची कन्या आणि निकटवर्तीय आमदारावर सोपवली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भगीरथ भालके यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला तर पंढरपूर-मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसू शकतो. पंढरपूरपेक्षा मंगळवेढ्यात भालके यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. भालके नावाचा करिश्मा या मतदारसंघात चालू शकतो, हे (स्व.) भारत भालके यांनी तीन निवडणुका वेगवेगळ्या पक्षाकडून लढून जिंकून दाखवून दिले आहे, त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढ्यात नवसंजीवनी भेटलेल्या राष्ट्रवादीला भालके यांना गमावून चालणार नाही, हे स्पष्ट आहे.

दुसरीकडे, विधानसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी भगीरथ भालके यांच्याशी संपर्क साधून समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भालके काय निर्णय घेतात, याकडे पंढरपूर-मंगळवेढ्याचे लक्ष लागले आहे. सध्या तरी भालके यांना बीआरएसची मोठी ऑफर आहे. मात्र, त्यांनी ’वेट ॲंड वॉच’ भूमिका घेतली आहे, असे भालके यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT