Chandra Shekhar Political Journey Sarkarnama
विशेष

Chandra Shekhar Political Journey: इंदिराजींनी सांगितल्यावरही मोरारजींची माफी न मागणारे निर्भीड, स्पष्टवक्ते माजी पंतप्रधान...

इंदिरा गांधी यांच्यासमोर कुणीही मोठ्या आवाजात न बोलण्याचा तो काळ होता. अशा काळात चंद्रशेखर यांनी असा निर्भीडपणा दाखवला होता. राम मनोहर लोहिया यांनाही चंद्रशेखर यांनी एकदा असंच सुनावलं होतं. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा अंगभूत गुण होता.

अय्यूब कादरी

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाला दिल्लीतील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता, मात्र गुण कमी होते. ते वर्ष होतं 1987. वडिलांची शिफारस आणली तर प्रवेश देऊ, असे प्राचार्यांनी त्या मुलाला सांगितलं. मुलगा वडिलांकडे जातो, प्राचार्यांचा निरोप देतो. वडिल शिफारस करण्यासाठी साफ नकार देतात आणि म्हणतात, ''जितके गुण मिळाले आहेत, त्या आधारावर ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल, तेथून शिक्षण पूर्ण करायचं.''

हा किस्सा कोण्या साध्या माणसाशी निगडित नाही, तर साधेपणा आणि तत्त्वांशी निष्ठा ठेवणारे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचा हा किस्सा आहे. आपल्या मुलाला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी शिफारस करण्यासाठी त्यांनी नकार दिला होता, हे आजच्या पिढीला खरे वाटेल का? चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांनी वडिलांवर लिहिलेल्या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. त्यांना एका साधारण महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि तेथून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. मुलांना शाळेत पाठवणं, ही पालकांची जबाबदारी असते, मुलांनी कष्ट करून आपल भविष्य उज्ज्वल करायचं असतं, असं ते म्हणत असत. जुन्या काळात राजकारणातील नैतिकतेची पातळी अशी होती.

विद्यार्थी चळवळीत कार्यरत असताना एक फायरब्रँड नेता, अशी त्यांची ओळख होती. सडेतोडपणा, स्पष्टवक्तेपणा हे त्यांचे अंगभूत गुण होते. 17 एप्रिल 1927 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात इब्राहीमपट्टी येथे चंद्रशेखर यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंबीय शेतकरी होते. त्यांचं शालेय, महाविद्यालयीन शिक्षण भीमपुरा येथे झालं. अलाबाहाद विद्यापीठातून त्यांनी एमए केलं. महाविद्यालयीन जीवनातच ते राजकारणात सक्रिय झाले. बंडखोर स्वभावाचे, आदर्शवादी राजकारणी अशी त्यांची ओळख निर्माण झाली. दुजादेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. नीरज आणि पंकज ही त्यांची अपत्यं.

अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी 1950-51 मध्ये राज्यशास्त्रात एमए केलं. त्यानंतर ते समाजवादी चळवळीत सक्रिय झाले. आचार्य नरेंद्र देव यांचा सहवास त्यांना लाभला. समजावादी प्रजा पार्टीचे बलिया जिल्हा सचिव म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर वर्षभरातच ते या पक्षाचे प्रदेश संयुक्त सचिव बनले. 1955-56 मध्ये प्रजा समाजवादी पार्टीचे उत्तर प्रदेश सरचिटणीस बनले. चंद्रशेखर यांचं एकेक पाऊल पुढेच पडत होतं. संघटनात्मक पातळीवर विविध पदांवर काम केल्यानंतर त्यांना संसदेत जाण्याची संधी मिळाली. 1962 मध्ये उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर गेले.

चंद्रशेखर यांनी 1967 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यसभेत त्यांनी शोषित, दलितांच्या विविध प्रश्नांना आवाज दिला. या वर्गांतील लोकांची प्रगती व्हावी, यासाठी धोरणे तयार करावीत, यासाठी सतत आग्रही राहायचे. समाजात उच्चवर्णीयांची, श्रीमंतांची एकाधिकारशाही वाढू लागली होती. त्याच्याविरोधात चंद्रशेखर यांनी आवाज उठवला. त्यामुळं सत्ताधाऱ्यांशी त्यांचे मतभेद निर्माण झाले. राजकारणातील वैयक्तिक स्वार्थाच्या विरोधात त्यांनी मोर्चा उघडला. ही लढाई त्यांनी प्रामाणिकपणे लढली.

दिल्लीतून 1969 मध्ये यंग इंडियन नावाचं साप्ताहिक प्रकाशित होत असे. ते या साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक होते. या साप्ताहिकातील अग्रलेख खूप गाजले. देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर हे साप्ताहिक बंद करण्यात आल. त्यानंतर फेब्रुवारी 1989 मध्ये ते पुन्हा सुरू झालं. त्यावेळी चंद्रशेखर हे या साप्ताहिकाच्या संपादकीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष बनले. चंद्रशेखर हे व्यक्तीपूजा, वैयक्तिक स्वार्थाच्या राजकारणाच्या विरोधात होते. समाजात बदल घडवून आणणारं राजकारण हवं, असं त्यांना वाटत असे. त्यातूनच ते जयप्रकाश नारायण यांच्याकडे आकर्षित झाले. त्यामुळं कॉँग्रेसमध्ये त्यांच्याविषयी नाराजी निर्माण झाली.

25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली. त्यानंतर चंद्रशेखर यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, अटक झाली त्यावेळी चंद्रशेखर हे काँग्रेसमध्येच होते. काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्यही होते. अटक केल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात झाली. सत्तेच्या राजकारणाला विरोध आणि सामाजिक बदलाच्या राजकारणासाठी आग्रही राहिल्यामुळं त्यांच्यावर ही वेळ औढवली होती. कारागृहात असताना त्यांनी पुस्तक लिहिलं. 'मेरी जेल डायरी' या नावाचं ते पुस्तक नंतर प्रकाशित झालं. 1977 मध्ये जनता पार्टीची स्थापना झाली. आणीबाणी उठवल्यानंतर या पक्षाचं सरकार आलं. चंद्रशेखर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणं सहजशक्य होतं, मात्र त्यांनी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं. ते 1977 मध्ये बलिया मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत गेले.

राहुल गांधी यांनी 2022 मध्ये भारत जोडो यात्रा काढली होती. कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर असा पायी प्रवास त्यांनी केला होता. राहुल गांधींनी ही पदयात्रा काढली आणि चंद्रशेखर यांच्या पदयात्रेती लोकांना आठवण झाली. चंद्रशेखर यांनी 1983 मध्ये कन्याकुमारी ते नवी दिल्लीतील महात्मा गांधीजी यांच्या समधीस्थळापर्यंत म्हणजे राजघाटापर्यंत पदयात्रा काढली. लोकांना भेटणे, त्यांना समजून घेणे, त्यांच्या महत्वाच्या अडचणी जाणून घेणे, हा उद्देश या पदयात्रेचा होता. 6 जानेवारी 1983 ते 25 जून 1983 या कालावधीत ही यात्रा झाली.

या पदयात्रेची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. काही पत्रकारांनी चंद्रशेखर यांच्यासोबत या पदयात्रेचं वार्तांकन केलं होतं. चंद्रशेखर एका पत्रकाराशी बोलताना म्हणाले होते, ''ही पदयात्रा निश्चितपणे राजकीय आहे. मला ना शंकराचार्य व्हायचे आहे ना विनोबा भावे. यात्रा राजकीय असली तरी पारंपरिक राजकारणापासून ती वेगळी ठेवायची आहे. देशातील सामान्य लोकांना बदल हवा आहे, असं मला वाटतं आणि त्यासाठीच ही यात्रा काढली आहे. ही पदयात्रा एका पक्षापुरती मर्यादित राहू नये, यासाठी सहभागी होण्यासाठी मी सर्व राजकीय पक्षांशी संपर्क साधला आहे.''

चंद्रशेखर यांनी 6 जून 1983 रोजी पदयात्रा सुरू केली त्याच दिवशी कर्नाटकमध्ये जनता पक्षाचं सरकार आलं होतं. रामकृष्ण हेगडे यांनी 10 जानेवारी 1983 रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 25 जून 1983 रोजी पदयात्रेचा समारोप झाला, तो दिवस आणीबाणी जाहीर झाल्याचा आठवा वर्धापनदिन होता. त्याच दिवशी कपिलदेव यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघांन पहिला विश्वकरंडक जिंकला होता. या पदयात्रेवर अनेकांनी टीका केली, खिल्ली उडवली. विशेष म्हणजे, असं करणाऱ्यांमध्ये त्यांच्या पक्षाचेही लोक होते.

चंद्रशेखर हे पक्षापेक्षा स्वतःला अधिक महत्त्व देतात, असं त्यांच्याच पक्षातील लोक म्हणायचे. पक्षाच्या नेत्यांना ज्या बाबी ते समजावून सांगू शकले नाहीत, त्या समाजाला सांगण्यासाठी ही पदयात्रा होती. आरोग्य, पाणी, कुपोषण आदी लोकांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांवर त्यांनी पदयात्रा काढली होती. 1983 मध्ये देशाची लोकसंख्या 90 कोटी होती. त्यापेकी 17 कोटी लोकांकडे ना सायकल होती, ना त्यांना बस प्रवास करता यायचा. त्यामुळं हे 17 कोटी लोक पदयात्रीच आहेत, असं चंद्रशेखर म्हणायचे. या पदयात्रेनंतर सात वर्षांनी म्हणजे 1990 मध्ये चंद्रशेखर पंतप्रधान बनले.

1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले. त्यांच्या मंत्रिमंडळात व्ही. पी. सिंह यांच्या समावेश करण्यात आला, मात्र त्यांचे राजीव गांधींसोबत खटके उडू लागले. अर्थमंत्री असताना सिंह यांनी करचोरांच्या विरोधात मोहीम राबवली होती. त्यामुळं अर्थमंत्रिपद काढून घेऊन त्यांना संरक्षणमंत्रिपद देण्यात आलं होत. इथेही सिंह शांत बसले नव्हते. जर्मनीशी पाणबुडी खरेदी करार करण्यात आला होता. त्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा संशय सिंह यांना होता. राजीव गांधींची संमती न घेता सिंह यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

त्यामुळे दोघांतील अंतर वाढत गेलं आणि अखेर व्ही. पी. सिंह हे 1987 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले. 1989 च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. जनता दलाला 144 जागा मिळाल्या. भाजप, डाव्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा दिला आणि व्ही. पी. सिंह पंतप्रधान बनले. चंद्रशेखरही इच्छुक होते. चंद्रशेखर यांचा सिंह यांच्या नावाला विरोध होता, मात्र सिंह यांची पंतप्रधानपदासाठी निवड करताना अरुण नेहरू, देवीलाल यांनी त्यांना अंधारात ठेवलं. निवडीसाठी आयोजित बैठकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. नाराज झालेले चंद्रशेखर त्या बैठकीतून निघून गेले होते.

पंतप्रधान बनल्यानंतर सिंह यांनी 7 ऑगस्ट 1990 रोजी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या. त्याच्या विरोधात देशभरात आंदोलनं झाली होती. सरकारला पाठिंबा दिलेल्या भाजपलाही सिंह यांचा हा निर्णय आवडलेला नव्हता. भाजपनं त्यावेळी रामजन्मभूमी आंदोलनाला वेग दिला. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा निघाली होती. त्यामुळं सिंह यांच्या सरकारसमोरील अडचणी वाढल्या होत्या. भाजपनं मंडल आयोगाच्या राजकारणाला कमंडल राजकारणानं उत्तर दिलं होतं. त्यावेळी लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. लालूप्रसाद यांनी बिहारमध्ये ही रथयात्रा अडवून अडवाणी यांना अटक केली. त्यामुळं भाजपनं 23 ऑक्टोबर 1990 रोजी व्ही. पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला. 11 महिने सत्तेवर राहिलेलं सिंह यांचं सरकार कोसळलं.

सिंह यांचं सरकार कोसळल्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या होत्या. त्यापूर्वीच राजीव गांधी आणि चंद्रशेखर यांच्यातील संवाद वाढला होता. राजीव गांधी यांच्या निरोपानुसार चंद्रशेखर यांनी त्यांची भेट घेतली. त्यावेळी राजीव गांधी त्यांना म्हणाले होते, आपण सरकार कधी स्थापन करणार? सरकार स्थापन करण्यासाठी नैतिक अधिकार माझ्याकडे नाही, असं उत्तर चंद्रशेखर यांनी दिलं होतं. तुम्ही सरकार स्थापन करा, आम्ही बाहेरून पाठिंब देऊ, असं राजीव गांधी यांनी त्यांना आश्वस्त केलं होतं.

चंद्रशेखर काँग्रेसचा पाठिंबा कसा घेणार, असा प्रश्न निर्माण झाला होता, कारण इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केल्यामुळं त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. मंडल आयोगाच्या विरोधात देशभरात आंदोलन पेटलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळण मिळू लागलं होतं. अशा परिस्थितीत काँग्रेसच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन करणं योग्यच आहे, देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे गरजेचं आहे, अशा शब्दांत चंद्रशेखर यांनी आपल्या निर्णयाचं समर्थन केलं. काँग्रेसनं पाठिंब्यावर 10 नोव्हेंबर 1990 रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सिंह यांचे सरकार पडल्यानंतर त्यांनी समाजवादी जनता पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्यासोबत 64 खासदार आले होते. राज्यात किंवा देशात मंत्रिपद न भूषवता चंद्रेशेखर थेट पंतप्रधान झाले होते. राजीव गांधी यांच्यानंतर ते असे दुसरे पंतप्रधान ठरले.

काँग्रेसनं चंद्रशेखर यांच्या कामात हस्तक्षेप करायला सुरुवात केली. ते त्यांना आवडत नसे. यातूनच काँग्रेसनं पाठिंबा काढून घेतला. त्यामुळं त्यांनी चार महिन्यानंतर 6 मार्च 1991 रोजी राजीनामा दिला. त्यांच्या सरकारला अर्थसंकल्पही सादर करता आला नव्हता. नवीन पंतप्रधानपदाची निवड होईपर्यंत म्हणजे 21 जून 1991 पर्यंत ते या पदावर राहिले. पंतप्रधान म्हणून त्यांना सात महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. इतक्या कमी कालावधीत त्यांनी राममंदिर-बाबरी मशीद वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि मुस्लिम इतिहासकारांना चर्चेसाठी एकाच टेबलवर आणण्याची किमया त्यांनी साधली होती.

काँग्रेसमध्ये असताना मोरारजी देसाई यांच्यासोबत त्यांचा एकदा वाद झाला होता. मोरारजी ज्येष्ठ आहेत, त्यांची माफी मागा, असं इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या होत्या. चंद्रशेखर यांनी माफी मागण्यास नकार तर दिलाच, शिवाय पक्ष सोडण्याचा गर्भित इशाराही दिला होता. इंदिरा गांधी यांच्यासमोर कुणीही मोठ्या आवाजात न बोलण्याचा तो काळ होता. अशा काळात चंद्रशेखर यांनी असा निर्भीडपणा दाखवला होता. राम मनोहर लोहिया यांनाही चंद्रशेखर यांनी एकदा असंच सुनावलं होतं.

बलिया येथे एका कार्यक्रमासाठी आचार्य नरेंद्र देव यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. काही अडचणींमुळे नरेंद्र देव यांनी लोहिया यांना पाठवलं. लोहिया यांना कोलकात्याला जायचं होतं, त्यासाठी बलिया येथून व्यवस्था करावी, अशी अटच त्यांनी ठेवली होती. याचा ते सातत्यानं पाठपुरावा करू लागले. त्यामुळं चंद्रशेखर यांचा संताप झाला. कार्यक्रमासाठी आम्हाला तुमची गरज नाही, जेवण करून तुम्ही जाऊ शकता, असं चंद्रशेखर यांनी सुनावल्यानंतर लोहिया शांत झाले होते. काँग्रेसला समाजवादी करायचं आहे, असं ते इंदिरा गांधी यांच्याशी बोलताना म्हणाले होते. चंद्रशेखर यांच्या सडेतोड, स्पष्टवक्तेपणाची अशी अनेक उदाहरणं आढळतात. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात 8 जुले 2007 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांना मायलोमा आजार जडला होता. 10 जुलै रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT