Devendra Fadnavis-Chhagan Bhujbal Sarkarnama
विशेष

Devendra Fadnavis 'CM' : छगन भुजबळांनीही केला देवेंद्र फडणवीसांचा ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख!

Vijaykumar Dudhale

Solapur, 04 August : माढा तालुक्यातील अरण येथे संत शिरोमणी सावता महाराज भक्त निवासाचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमात बोलताना जुन्या सभामंडपाचा इतिहास सांगताना छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘मुख्यमंत्री महोदय’ असा केला.

दरम्यान, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनीही आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा उल्लेख केला होता. भाजप नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा जनतेचे मुख्यमंत्री असा उल्लेख होतोच. पण आज चक्क छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीच देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.

छगन भुजबळ यांनी बोलताना ‘सोन्यासारखी माणसं’ या पुस्तकाचा उल्लेख केला. अरणला सभामंडप बांधण्यासाठी पुढाकार घेणारे आणि सभामंडपासाठी वर्गणी देणाऱ्या व्यक्तींचा त्या पुस्तकात संदर्भ आहे. त्याबाबत भुजबळ म्हणाले, अरणला सभामंडप बांधण्यासाठी नाशिकच्या मंडळींनी वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू केले होते.

प्रत्येकांनी आपआपल्या ऐपतीप्रमाणे वर्गणी दिली होती. माझ्याकडे हे लोक आले होते. मीही त्यांना नाराज केले नाही. त्यावेळी म्हणजे 1985 मध्ये मी आमदार होतो. मी पंधरा हजार रुपये दिले होते. त्या वेळी दोन हजार रुपये तोळा सोने होते.

या पुस्तकात पांडुरंग गायकवाड म्हणून थोर पत्रकार होते. ते 1950 मध्ये बीए, बीकॉम झाले होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत त्यांनी काम केले होते. त्यांनी या सभामंडपासाठी पुढाकार घेतला होता. मारुतीराव खैरे, बाबूराव आणि शंकरराव जेजुरकर, डॉ. कमोद अशी सगळी ती मंडळी होती.

त्या लोकांनी वर्गण गोळा करून आज अस्तित्वात असलेला मंडप उभारलेला आहे. मुद्दाम या मंडळींचा उल्लेख करतो, असे छगन भुजबळ जुन्या सभामंडपाच्या बांधकामाची माहिती देत असताना अचानकपणे त्यांनी फडणवीसांचा उल्लेख ‘मुख्यमंत्री महोदय’ असा केला.

अरणमधील सभामंडपाच्या दर्जेदार कामाबाबत भुजबळ बोलत होते. त्या वेळी ते म्हणाले, विशेष म्हणजे ‘मुख्यमंत्री महोदय’, चाळीस वर्षांनंतरही हा मंडप आहे तसाच आहे हो. एकदम मजबूत आहे. आता आम्ही मंडप बांधतो आणि पुढच्या वर्षी गेलो की इकडे तडा गेला आणि तिकडे तडा पडला, अशी परिस्थिती असते. त्या वेळी अरणला बांधलेला मंडप आजही उत्तम स्थितीत आहे. पण, आता स्वरुप वाढणार आहे. त्या सभा मंडपाचे काम आता महाराष्ट्र सरकार करणार आहे.

अतुल सावे आता तुम्ही मोठा वाटा उचलला पाहिजे

अतुल सावे तुम्ही तरुण आहात. आता तुम्ही मोठा वाटा उचलला पाहिजे. सतत अरणला यायला पाहिजे. आम्ही तर आहोतच. आम्हीही करतोच आहोत. आम्ही कोठेही जाणार नाही, काळजी करू नका. पण, नव्या लेाकांनी आता पुढाकार घेतला पाहिजे. अरणला यायला पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT