Raipur News : छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार पुन्हा येणार, असेच वातावरण महिनाभरापर्यंत होते. भाजपही फारसा आशावादी वाटत नव्हता. मात्र, नोव्हेंबरमध्ये सक्तवुसली संचालनालयाने (ईडी) धमाका उडवून दिला आणि छत्तीसगडमधील राजकीय वातावरणच बदलून गेले. ‘महादेव बेटिंग ॲप’च्या प्रवर्तकांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला. भाजपने त्यावरून बघेल यांच्याविरोधात रान उठवले. त्यानंतर निवडणुकीचा नूरच पालटला आणि ‘महादेव’च्या त्या वावटळीत बघेल यांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्नही वाहून गेले.
छत्तीसगडमध्ये काठावर का होईना काँग्रेसचे सरकार येईल, असा राजकीय निरीक्षकांचा होरा होता. दुसरीकडे मुख्यमंत्री बघेल यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या कार्डला उत्तर देण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्वाचे कार्ड काढले होते. काँग्रेसचे डावपेच सुरळीत सुरू होते. मात्र, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ईडीने छत्तीसगडच्या राजकारणात स्फोट घडवला. तोपर्यंत असं काही होईल, हे काँग्रेस नेत्यांच्या गावीही नव्हते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महादेव बेटिंग ॲपमधील एका ई-मेलच्या आधारावरून ‘महादेव ॲप’च्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपयांची लाच दिली आहे, असा खळबळजनक आरोप ईडीने केला. रायपूरमधील एका हॉटेलमधून जप्त करण्यात आलेला ५.३९ कोटी रुपये काँग्रेस पक्षाला निवडणूक खर्चासाठी दिले होते, असेही ईडीने म्हटले होते. मात्र, मुख्यमंत्री बघेल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते.
ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत ईडीने केलेल्या भ्रष्टाचाराच्या या आरोपांमुळे छत्तीसगडमधील राजकीय वातावरण तापले. भाजपकडून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली गेली. काँग्रेसने भगवान शिव यांचे नाव असलेल्या महादेवालाही सोडले नाही, अशी बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात केली.
‘महादेव ॲप’ प्रकरणी आरोप होताच भाजपचे नेते तथा माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी बघेल यांच्या विरोधात आघाडी उघडली. सर्व काही सिद्ध झाले असून, भूपेश बघेल यांना आता मुख्यमंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असा आरोप केला होता. खरं तर बघेल यांचा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद मिळविण्याचा प्रयत्न होता. मात्र, ईडीच्या खेळीने तो बिघडला.
महादेव बेटिंग ॲप प्रकरणामुळे निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. ईडीच्या सततच्या धाडीमुळे बघेल सरकार भ्रष्टाचारी आहे, असा राज्यातील जनतेचा समज पक्का होत गेला. छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार, असे वाटत असताना ईडी आणि महादेव ॲप प्रकरणामुळे बघेल आणि काँग्रेसचे पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न भंग पावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.