मुंबई : हिवाळी अधिवेशनाआधी (Winter session) नव्या मंत्र्यांना शपथ देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ‘शब्द’ आता मित्रपक्ष भारतीय जनता पक्षांतील (BJP) कुरघोड्यांमुळे खोटा ठरण्याची चिन्हे आहेत. नव्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून तशी यादी ठरवूनही ऐनवेळी भाजपचे मंत्री ठरत नसल्याने शिंदे यांना ‘बॅकफूट’ वर यावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Chief Minister Eknath Shinde on 'backfoot' due to BJP's tactics)
‘आपले मंत्री ठरले आहेत, आपल्याला विस्तार करायचाच आहे,’ असे मोजकेच उत्तर देऊन शिंदे हे आपल्या आमदारांची बोळवण करीत आहेत. तरीही, शिंदे गटाच्या आमदारांनी मात्र, मंत्रीपदाची आशा सोडली नसून पुढच्या ७२ तासांत कुठच्याही क्षणी विस्तार होण्याची अपेक्षा इच्छुक आमदारांना आहे. त्यामुळे पुढचे तीन दिवस राजकीय माहोल गरम राहणार आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर ९ ऑगस्टला पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि त्यात दोन्ही पक्षाच्या १८ आमदारांचा शपथविधी झाला. त्यानंतर सप्टेंबरपासून लांबलेला विस्तार हिवाळी अधिवेशनाधी करण्याचे संकेत खुद्द शिंदे यांनी अप्रत्यक्ष आणि उपमुख्यमंत्री यांनी तर उघडपणे जाहीर केले होते. त्यामुळे १३ डिसेंबरला मंत्र्यांचा छोटेखानी शपथविधी होण्याची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात मात्र अधिवेशन आठ दिवसांवर येऊन ठेपले तरीही, विस्ताराची लगबग दिसत नाही.
परिणामी, मंत्रिपदाकडे डोळे लावलेल्या शिंदे गटाच्या आमदारांत पुन्हा एकदा नाराजीचा सूर दिसत आहे. ही नाराजी ओळखून मंत्रीमंडळाची तयारी केल्याचे पुरावे शिंदे गटातील प्रमुख नेत्यांनी आमदारांना दाखविले. पण, भाजपकडून अद्याप भूमिका स्पष्ट झाली नसल्याने अडचणी येत असल्याचे शिंदे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऐन अधिवेशनाच्या तोंडावरच शिंदे गटात नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता वर्तविण्यात आहेत.
सरकार स्थिरस्थावर झाल्याने आपल्या गटातील नाराजी उघड होऊ नये, याकरिता शिंदे गटाने आपल्या संभाव्य मंत्र्यांची नावे निश्चित केल्याचे बोलले जात आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यापासून धक्कातंत्र म्हणजे, जुन्या नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांपासून लांब ठेवण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यांसाठी भाजपकडून नवे मंत्री ठरत नाहीत. पक्षांतर्गत परंतु, छुप्या राजकारणामुळेच भाजपपुढे पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. भाजपमधील प्रस्थापितांना बाजूला ठेवून विस्तार करण्याची चाल प्रदेश नेतृत्वाची आहे. परंतु, ही बाब दिल्लीतील नेत्यांना पटत नसल्याने भाजपमध्ये गोंधळ उडाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्ताराची तयारी केलेल्या शिंदे गटाला ताटकळत राहावे लागणार असल्याचे दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.