Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-भाजप-जेडीएस अशी तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत काँग्रेसची सरशी झाली आहे. निवडणुकीत विधानसभेच्या २२४ जागांपैकी काँग्रेसला १३५ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला. भाजपला फक्त ६५ जागांवर विजय मिळाला. जेडीएसला केवळ १९ जागांवर समाधान मानावे लागले. तर अपक्षाला काही जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने कर्नाटकात जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपला मात्र, सत्ता राखण्यास यश आले नाही.
भाजप (BJP) २०१८ मध्ये १०४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष बनला होता. त्यावेळी काँग्रेस आणि जेडीएस पक्षांनी एकत्र येत सरकार बनविले होते. दरम्यान, काही आमदार फुटल्याने भाजपने सत्ता स्थापन केली. सत्तेत आलेल्या भाजपवर काँग्रेसने टीकेची चांगलीच झोड उठविली. दरम्यान, काँग्रेसने भाजपला भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून धारेवर धरले. प्रत्येक विकासकामात भाजप सरकार ४० कंत्राटदारांकडून तब्बल ४० टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप केला. हाच प्रमुख मुद्दा करून या निवडणुकीत काँग्रेसने भाजपवर सर्व बाजूने हल्लाबोल केला.
दरम्यान, ठेकेदारांकडून घेतलेले ४० टक्के थेट मुख्यमंत्री यांच्याकडे जातात, असाही आरोप काँग्रेसने सुरू ठेवला. त्यासाठी काँग्रेसने 'पे-सीएम' अशी मोहीमच राबविली. 'पेटीएम'च्या धर्तीवर काँग्रेसने कर्नाटकमध्ये ठिकठिकाणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांच्या 'क्यूआर कोड'मधील चित्राचे पोस्टर चिकटवले. त्यातून पे-सीएम असा उल्लेख करन ४० टक्के येथे स्वीकारले जातील, असेही त्यावर नमूद केले. या मोहीमेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
भाजप सरकार ४० टक्केवाल्यांचे आहे, ही प्रतिमा जनमानसात रुजविण्यात काँग्रेस यशस्वी झाल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले. ही मोहीम राबविताना काँग्रेसने कल्पकतेने काही जाहिरातीही केल्या. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांना काही पत्रे पाठविण्यात आली. त्या पत्रातून ४० टक्क्यांवरून तुम्ही २० टक्केच घ्या, अशी विनंतीही करण्यात आली होती. तर मठाधिपती यांनीही त्याच पद्धतीने विनंती केली होती. यातून भाजप सरकार भ्रष्टाचारात रुतले असल्याची प्रतिमा तयार झाली होती. त्याचा मोठा फटका भाजपला या निवडणुकीत बसला आहे. या निवडणुकीत भाजपच्या जागा १०४ वरून ६५ पर्यंत घसरल्या आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.