Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray News Sarkarnama
विशेष

Maharashtra politics : राज्यात काँग्रेसची ताकद वाढणार? विधानसभा अन् विधान परिषदेतील महत्त्वाच्या पदावर ठोकला दावा

Nana Patole News : नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्यात विरोधी पक्षनेते पदावर चर्चा होण्याची शक्यता

Amol Jaybhaye

Congress News : महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसची ताकद वाढताना दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेली काँग्रेस आता बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये पहिल्या क्रमांकावर आली आहे. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेतील दोन्ही विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा काँग्रेसला होताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विधानसभेमध्ये पक्षाचे संख्याबळ घटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जवळपास ३० ते ३५ आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे असलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केला आहे. काँग्रेसचे सध्या विधानसभेत ४५ आमदार आहेत. त्यामुळे ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाकडे विरोधी पक्षनेते पद जाते.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस (Congress) संख्याबळाने तीन नंबरचा पक्ष होता. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काँग्रेस मोठा पक्ष झाला आहे. त्यातच विधान परिषदेमध्ये सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र, आमदार मनीषा कायंदे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

त्यामुळे ठाकरे गटाची संख्या घटली आहे. परिणामी दानवे यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले होते. हे पद राष्ट्रवादीकडे (NCP) जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच पक्षात फूट पडली. राष्ट्रवादीचे विधान परिषदेतले दोन आमदार अजित पवारांच्या गटात गेले. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाची सदस्य संख्याही कमी झाली.

सध्या ठाकरे गटाकडे विधान परिषदेत आठ सदस्य आहेत. काँग्रेसकडेही आठ सदस्य आहेत. त्यामध्ये डॉ. प्रज्ञा सातव, अभिजित वंजारी, धीरज लिंगाडे, राजेश राठोड, सतेज पाटील, भाई जगताप, जयंत आसगावकर, डॉ. वजाहत मिर्झा हे आमदार आहेत. मात्र, सुधाकर अडबाले हे नागपूर शिक्षक मतदासंघाचे अपक्ष आमदार आहेत. त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ नऊ आहे.

त्यामुळे आता काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. काँग्रेसचे नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी हे या पदासाठी इच्छुक आहेत. वंजारी यांनी काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी एच.के.पाटील यांना पत्र लिहून विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळावे, अशी विनंती केली आहे.

या वेळी वंजारी म्हणाले, सध्याची महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती काही बरी नाही. विधान परिषदेतले राष्ट्रवादीचे काही आमदार अजित पवार यांच्याकडे गेले आहेत. त्यामुळे विधान परिषदेत आता काँग्रेस मोठा पक्ष आहे. आम्ही एकूण नऊ आमदार आहोत. यापैकी मला हे पद मिळावे, अशी माझी इच्छा आहे. आमचे आमदार राजेश राठोड यांनीही इच्छा व्यक्त केली आहे. विदर्भात काँग्रेसला बळ द्यायचे असेल तर माझा उपयोग काँग्रेस करू शकते, असेही वंजारी यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत नुकतीच बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये राज्यातील लोकसभेच्या आणि राज्यातील बदललेल्या परिस्थितीवर चर्चा झाली. त्यानंतर आज पुन्हा नाना पटोले दिल्लीला गेले आहेत. या दिल्ली भेटीमध्ये विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT