Ajit Pawar Sarkarnama
विशेष

थोरातांना राष्ट्रवादीने तिकिट दिले की पराभूत करता अन्‌ अपक्ष निवडून देताय : पवार दौंडमधील पराभव विसरेनात

गेली २१ वर्ष एकहाती सत्ता असलेले चेअरमन कारखान्याचा कारभार पाहत आहे. मग आता तुम्हीच सांगा कारखाना नेमका कोणामुळे बंद पडला आहे.

संतोष काळे

राहू (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यात आमदारकीला काँग्रेस (congress)-राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आघाडीच्या सर्व जागा जिंकून आल्या. मात्र, दौंडची (Daund) जागा अवघ्या सातशे मतांनी गेली. रमेश आप्पा थोरात (Ramesh Thorat) यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले की दौंडची जनता त्यांचा पराभव करते. मात्र, रमेश आप्पा अपक्ष उभे राहिले की तुम्ही निवडून देताय. मला खरंच दौंडच्या जनतेचे राजकारण कळायलाच तयार नाही. आता तुम्हीच मला सुचवा, यापुढे काय निर्णय घ्यायचा, अशा शब्दांत रमेश थोरात यांच्या २०१९ च्या निवडणुकीतील पराभवाची सल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली. (Daund politics is not ready to know : Ajit Pawar)

पारगाव येथील भीमा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीचे उदघाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, दौंड तालुक्यातील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याला पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने नेहमीच सहकार्याची भूमिका ठेवली आहे. गेली २१ वर्ष एकहाती सत्ता असलेले चेअरमन कारखान्याचा कारभार पाहत आहे. मग आता तुम्हीच सांगा कारखाना नेमका कोणामुळे बंद पडला आहे, अशी बोचरी टीकाही अजितदादांनी आमदार राहुल कुल यांचे नाव न घेता केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी काय निर्णय घेतले. जबरदस्तीने सभेला आणलेली माणसे बसत नाही. महाराष्ट्रातील जनता दूध खुळी नाही. नेमके गद्दार कोण आहे, हे आगामी निवडणुकीत जनता दाखवून देईल. दिल्लीच्या आदेशावर राज्य सरकार काम करत आहे, असा आरोपही पवार यांनी या वेळी केला.

पवार म्हणाले की, शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात रोज सरासरी चार ते पाच शेतकरी आत्महत्या करतात. हे याच सरकारचे पापच आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायला वेळ नाही. लंपीमुळेही शेतकरी त्रस्त आहेत.

दौंड शुगरची गाळप क्षमता प्रतिदिन १७ हजार टन होणार आहे, त्यामुळे दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा उस गाळपविना शिल्लक राहणार नाही. जो कारखाना वजन मारणार नाही आणि उसाला जादा बाजार भाव देईल, त्याच कारखान्याला शेतकऱ्यांनी ऊस घालावा, असे आवाहन पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले.

रमेश थोरात यांनी राहू सोसायटीच्या अनागोंदी कारभारावर टिका केली. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज वाटप बंद आहे. शून्य टक्क्यांनी कर्जवाटप करणारी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. बँकेला दीडशे कोटींचा नफा झाला आहे. बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लागतात. राष्ट्रवादीचे काम तळागाळापर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT