Deepali Sayed News Sarkarnama
विशेष

Deepali Sayed News : दीपाली सय्यद वर्षभरानंतरही राजकीय विजनवासात; शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेश रखडलेलाच

Sachin Waghmare

Deepali Sayed News : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी वर्षभरापूर्वी ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. या प्रवेशाची माहिती दीपाली सय्यद यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. मात्र, दीपाली सय्यद यांनी ठाकरे गटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस त्यासोबतच भाजप नेते माजी खासदार किरीट सौमय्या यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजपने त्यांचा प्रवेश रोखून धरला होता. त्यामुळे वर्षभरानंतरही दीपाली सय्यद यांना राजकीय विजनवासातच राहावे लागले आहे.

लहानपणापासून नृत्याची आवड असलेल्या दीपाली सय्यद यांनी 2006 मध्ये करिअरला सुरुवात केली. बंदिनी, समांतर या दीपाली सय्यद यांच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या मालिका होत्या. 'जाऊ तिथे खाऊ', चष्मेबहाद्दूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या सिनेमांमधल्या भूमिकांमधून दीपाली सय्यद यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. 'जत्रा' सिनेमातील दीपाली सय्यद यांचे "ये गो ये, ये मैना पिंजरा बनाया सोने का" हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले होते.

उत्तम नृत्यांगना ते रियालिटी शोच्या परीक्षका

2008 मध्ये दीपाली भोसले सय्यद यांनी दिग्दर्शक बॉबी खान उर्फ जहांगीर सय्यद यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर दीपाली यांचे नाव सोफिया जहांगीर सय्यद असे ठेवण्यात आले. लग्नानंतर त्या अभिनयात फारशा रमल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिका, जाहिराती तसेच सिनेमांमध्ये काम केले आहे. दीपाली सय्यद या उत्तम नृत्यांगना आहेत, त्यामुळे अनेक रियालिटी शोमध्ये त्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसल्या.

असा आहे राजकीय प्रवास

2014 मध्ये अहमदनगरमधून आम आदमी पक्षातून दीपाली सय्यद यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर काही दिवसांनी दीपाली सय्यद यांनी शिवसंग्राम या पक्षात प्रवेश केला होता. नगर जिल्ह्यातील साकळाई पाणी योजनेसाठी त्यांनी आंदोलन केले. त्यामुळे त्या चर्चेत आल्या होत्या.

मुंब्रा-कळवा मतदारसंघातून स्वीकारावा लागला पराभव

विशेषत, त्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्या पुन्हा चर्चेत आल्या. दीपाली सय्यद यांनी 3 ऑक्टोबर 2019 ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. ठाणे जिल्ह्यातील कळवा-मुंब्रा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीची या भागातील 'हॅटट्रिक' मोडण्यासाठी शिवसेनेचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातून दीपाली भोसले-सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली. दुसर्‍या दिवशी दीपाली सय्यद यांनी मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर दीपाली सय्यद पराभूत झाल्या.

त्यानंतर जून 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदार व 13 खासदारांना घेऊन वेगळी चूल मांडली. त्यामध्ये काही नेतेमंडळी हे उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेली. सुरुवातीचे चार पाच महिने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या दीपाली सय्यद यांनी ही अचानक एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर दिलजमाई केली.

8 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांचा प्रवेश त्यावेळेसपासून भाजपकडून रोखण्यात आला. दीपाली सय्यद यांनी भाजपवर केलेली टीका चांगलीच जिव्हारी लागल्याने त्यांचा शिंदे गटातील प्रवेश गेल्या काही महिन्यांपासून वेटिंगवरच आहे. गेल्या वर्षभरापासून त्या राजकीय विजनवासातच असल्याचे दिसते.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT