ब्रिजमोहन पाटील
Delhi governance news : मित्रपक्षांच्या टेकूवर केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजपची बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमारांकडून 12 खासदारांच्या ताकदीवर भाजपची कोंडी केली जाऊ शकते. त्यासाठी भाजपला नवे मित्र जोडणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजप महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा फायदा घेऊन केंद्रात मोदी सरकार भक्कम स्थितीत ठेवेलच, पण गेल्या 10 वर्षांपासून केंद्रातील सत्तेपासून दूर पवारांचा व सहकाऱ्यांचा राजकीय वनवास संपू शकतो. त्यामुळेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या मनोमिलनाच्या चर्चेला उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला (BJP) केवळ 240 जागा मिळाल्या, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 293 असे काठावरचे बहुमत आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष आणि नितीशकुमार यांचा जनता दल-संयुक्त (जेडीयू) या दोन मित्र पक्षांकडे प्रत्येकी 16 आणि 12 खासदार असल्याने त्यांना सांभाळणे भाजपसाठी महत्त्वाचे आहे. त्या खालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एक खासदार आहे.
दिल्ली सुरक्षित ठेवायची असेल तर भाजपला इतरांना मित्र बनविणे ही गरज आहे. गेल्या आठवड्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने अजित पवार यांनी सहकुटुंब पवार यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाचे 41 आमदार निवडून आल्याने राज्यात राजकारणात त्यांचे पुन्हा एकदा वजन वाढले आहे. विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीत सुंदोपसुंदी सुरू झाली आहे.
काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षांमध्ये स्वतंत्र निवडणुका लढण्यावरून जाहीर टीकाटिपणी सुरू आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडे आठ खासदार असले तरी राज्यात व केंद्रात भाजप सत्तेत असल्याने त्यांना फारसा काही फायदा मिळणार नाही. उलट पुढची पाच वर्षे तग धरण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. त्यामुळेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चेने उचल खाल्ली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून नितीशकुमार भाजपची डोकेदुखी वाढवू शकतात.
सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची भाषाही ते करू शकतात हे ओळखून भाजपने आधीच सावध पावले टाकायला सुरूवात केली आहे. भाजपला नितीशकुमारांच्या 12 खासदारांची उणीव भरून काढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे फायद्याचे आहे. तसे केल्याने ‘राष्ट्रवादी’च्या दोन्ही गटांच्या नऊ खासदारांचा पाठिंबा मिळू शकतो. त्याशिवाय राष्ट्रवादीलाही केंद्रीय सत्तेत स्थान मिळेल. केंद्रातील सत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा उपयोग करून भाजप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपचे शिवसेनेवर नियंत्रण कायम
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत भाजपची युती असताना शिवसेनेच्या पक्षाच्या कारभारात भाजप नेते हस्तक्षेप करत नसत. पण आता स्थिती पूर्ण बदलली आहे. शिवसेनेमध्ये फूट पाडल्यानंतर पक्ष एकनाथ शिंदेंना बहाल केला गेला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार कोण असणार? यावरही भाजपचे बऱ्यापैकी नियंत्रण होते. विधानसभा निवडणुकीत 230 जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले असले तरीही राज्यात लगेच सत्ता स्थापन झाली नाही. फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावर विराजमान करण्यासाठी बराचसा वेळ लागला.
लाडकी बहीण योजनेच्या लाटेवर स्वार झालेल्या एकनाथ शिंदे यांना इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्रिपद घ्यावे लागले. तर अजित पवारांनी नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्रिपद आनंदाने स्वीकारले. भाजप आणि शिवसेनेत महत्त्वाच्या खात्यावरून बरीच धुसफूस झालेली आहे. तरीही भाजपने शिवसेनेचा हट्ट पुरविलेला नाही. भाजपचे निर्णय अजित पवार हसत स्वीकारत असल्याने व फारसा विरोध करण्याच्या फंदात पडत नसल्याने ते भाजप नेत्यांच्या ‘गुडविल’मध्ये आहेत. तर या उलट स्थिती एकनाथ शिंदे यांची आहे.
पडळकर, खोतांचे उपद्रवमूल्य
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात जाणीवपूर्वक भाजपच्या काही कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांची ताकद वाढवली आहे. विशेषतः शरद पवार आणि अजित पवारांवर टीका करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांचा योग्य पद्धतीने वापर केला. सध्या अजित पवार महायुतीसोबत असल्याने त्यांच्यावरील टीका बंद झाली आहे. पण शरद पवार यांच्यावर भाजपचे कोणताही नेता टीका करत नसताना पडळकर, खोत या दुसऱ्या फळीतील नेत्यांना मात्र खुली सूट दिली जात आहे. कधी कधी या दोघांचा तोल सुटतो, त्यामुळे भाजप नेत्यांना पुन्हा स्पष्टीकरण देऊन या दोघांना शांत राहण्याचे आदेश द्यावे लागतात किंवा बोलताना शब्द जपून वापरावेत असे सांगितले जाते.
ऐन निवडणुकीत सदाभाऊ खोत यांनी पवारांच्या आजारपण व दिसण्यावरून अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. त्यानंतर ते पूर्ण निवडणुकीत गायब होते. निकालानंतर मारकडवाडी येथील ईव्हीएम व मतपत्रिकांद्वारे मतदान या वादावर महाविकास आघाडीच्या प्रचारमोहिमेला उत्तर देण्यासाठी भाजपने पुन्हा गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांचा खुबीने वापर केला. या दोघांनी पुन्हा एकदा शरद पवार, मोहिते पाटील यांच्यासह अन्य नेत्यांवर सडकून टीका केली. भाजपला पुन्हा या जोडगोळीच्या भाषेवरून टीकेचे धनी व्हावे लागले. पण तरीही पडळकर, खोत यांच्या उपद्रवमूल्याचा व्यवस्थित वापर भाजप करून घेत आहे.
खोत व पडळकर यांच्याप्रमाणेत नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे व अमरावतीच्या नवनीत राणा यांचा वापर भाजपने विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केला होता. आता नितेश राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला गेला असल्याने त्यांना जबाबदारीने बोलावे लागणार आहे. मात्र भाजपकडे अशा नेत्यांची वाणवा नाही. तिचा वापर ते सोईने करत असतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.