NCP News : लोकसभेला निराशाजनक कामगिरी झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवत चांगलं कमबॅक केलं.या यशाला पंधरा दिवस उलटत नाही तोच,बीडचं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण घडलं.या हत्येप्रकरणावरुन पहिल्यापासूनचे अजितदादांचे स्ट्राँग सपोर्टर राहिलेल्या धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले जात आहे.
एकीकडे धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्यासाठी दिवसेंदिवस राजकीय दबाव वाढत चालला आहे. तसेच त्यांच्या बीडच्या पालकमंत्रिपदावरही टांगती तलवार आहे. तर एकीकडे मोदींच्या मुंबई दौर्यापासून दूर ठेवल्याची चर्चा असतानाच आता शिर्डीत होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातही त्यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचं कारण ठरली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण, खंडणी प्रकरण या दोन प्रकरणात वाल्मिक कराड कारवाविरोधातील कारवाईचा फास आवळला जात असतानाच धनंजय मुंडेंविरोधातली नाराजीही बीड जिल्ह्यात वाढत चालल्याचं दिसून येत आहे.त्याची झळ 'देवगिरी'पासून ते दिल्लीपर्यंत पोहचली आहे. कराडसोबतची मुंडेंची सगळी कनेक्शन पुढे आणत त्यांच्या राजकीय विरोधकांनी संतोष देशमुखांच्या हत्येचा मुद्दा गेला दीड महिने धगधगता ठेवला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात देशमुख कुटुंबिय त्यातही धनंजय देशमुखांनी थेट धनंजय मुंडेंचं नाव घेतलेलं नाही.पण महायुतीतील आमदार सुरेश धसांनी देशमुख हत्येप्रकरणात उडी घेतली अन् मागचा पुढचा सगळा हिशोब चुकवण्याच्या हेतूनं धनंजय मुंडेंना पुरतं घेरलं आहे.त्यांच्या सोबतीला मराठा नेते मनोज जरांगे पाटील,खासदार बजरंग सोनवणे,आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही हे प्रकरणात मुंडेंची कोंडी करत गंभीर आरोपांनी राजकीय वातावरण तापवलं.
या सगळ्या घडामोडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) तूर्तास तरी धनंजय मुंडेंना अभय देतानाच विरोधकांची राजीनाम्याची मागणी झुगारली आहे. पण संतोष देशमुखांच्या हत्येनंतर धनंजय मुंडेंच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला अजितदादांव्यतिरिक्त असा बडा नेता कुणीही पुढे आलेलं दिसून येत नाही. भुजबळांनी तेवढी मुंडेंना बळ दिलं. पण तरीही राष्ट्रवादीत मुंडे एकाकी पडल्याची चर्चा आहे.
धनंजय मुंडे यांचं गेल्या आठ-दहा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसमधलं आणि त्यातही आधी महाविकास आघाडी सरकार आणि नंतर महायुती सरकारमध्ये चांगलंच वजन वाढलेलं दिसलं.त्यांच्याकडे महायुतीत तर थेट कृषिमंत्रिपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली.पण आता त्यांच्या राजकीय प्रगतीला बीड हत्येप्रकरणामुळे त्यातही वाल्मिक कराडमुळे ब्रेक लागला असल्याचं बोललं जात आहे.
बीड हत्येप्रकरणानंतर धनंजय मुंडेबद्दल राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांमध्येही मोठी नाराजी असल्याची चर्चा आहे. संतोष देशमुख हत्येनंतर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात जवळपास एक महिना प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. या हत्ये प्रकरणात गंभीर आरोप होत असतानाही या काळात दोन्ही नेत्यांकडून अशी ठोस भूमिका समोर आली नव्हती. त्यानंतर धनंजय मुंडेंनी 6 जानेवारीला अजित पवारांची भेट घेतली होती.त्या भेटीत अजितदादांनी मुंडेंना बीड हत्येप्रकरणावरुन अनेक सवाल केल्याचीही माहिती समोर आली होती.
वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्येप्रकरणात मकोका लावल्यानंतर परळी आणि बीडमधलं राजकीय वातावरण तापलं होतं. कराड समर्थकांनी परळी बंद ,ठिय्या आंदोलन,टायरांची जाळपोळ,घोषणाबाजी,निषेध आंदोलनं करत सरकार आणि तपास यंत्रणांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण हा दबाव सरकार आणि तपासयंत्रणांनी झुगारत उलट कराडविरोधातील कारवाईचा जोर वाढवला.
हे सगळं सुरू असतानाच धनंजय मुंडेंनी त्याचदिवशी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली.पंधरा ते वीस मिनिटांच्या या भेटीनंतर मुंडे तातडीनं परळीकडे रवाना झाले. यानंतर दुसर्याच दिवशी सकाळी बीड राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली.हा मुंडेंसाठी मोठा पक्षाचा मोठा झटका होता.
त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या 237 आमदारांची शिकवणी घेतली.या शिकवणीच्या आदल्याच दिवशी धनंजय मुंडे अजितदादांची भेट घेऊन तातडीनं परळीला रवाना झाले होते.यामुळे अजितदादांनी मुद्दामहून मुंडेंना पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौर्यापासून दूर ठेवल्याची चर्चा जोर धरू लागली.
त्यानंतर आता मोठा गाजावाजा करत भाजप पाठोपाठ अजितदादांच्या राष्ट्रवादीनंही शिर्डीत दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन बोलावलं आहे. मात्र,या अधिवेशनात एकीकडे पक्षातले सगळे दिग्गज नेते उपस्थित राहणार असतानाच पत्ंता कट झाल्यानंतर प्रचंड नाराज झालेल्या छगन भुजबळ पाठ फिरवणार असल्याची चर्चा होती.पण प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंच्या विनंतीला मान देऊन मोठ्या नाराजीनाट्यानंतर अखेर भुजबळांची अधिवेशनात एन्ट्री झाली.
पण दुसरीकडे ज्या धनंजय मुंडेंनी शुक्रवारी(ता.17)परळीत जनता दरबारघेतला,त्यांनी शनिवारी (ता.18) तब्येतीचं कारण पुढं करत शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला दांडी मारली. यामुळे त्यांच्या या दांडीवरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.यामागं अजित पवारांची खेळी आहे की, गेल्या काही वर्षांत राजकीय वजन वाढलेल्या धनंजय मुंडेंनी आता थेट दादा आणि पक्षावरचा दबाव वाढविण्यासाठी अधिवेशनाकडे पाठ फिरवली, अशी शंकेची पाल राजकीय जाणकारांच्या मनात चुकचुकतेय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.