
Pune News, 18 Jan : मनसेमध्ये असलेले वसंत मोरे (Vasant More) व्हाया वंचित ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाऊन पोहोचले आहेत. यानंतर आता ते आगामी महापालिका निवडणुका लढण्याची तयारी देखील करत आहेत. तात्यांना पुण्याचं खासदार व्हायचं होतं. त्यानंतर त्यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघाचा आमदार होण्याचं देखील स्वप्न पाहिलं.
मात्र, आता तात्या पुन्हा एकदा कात्रज येथील प्रभागामधून नगरसेवक होण्याच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेमधून (MNS) आपल्याला लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही. याचा अंदाज आल्यानंतर वसंत मोरेंनी आपला मनसेमधील प्रदीर्घ असा प्रवास थांबवत पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत पुणे लोकसभेची निवडणूक देखील लढवली. मात्र त्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं. त्यानंतर मी शेवटच्या श्वासापर्यंत वंचितमध्येच राहणार म्हणणाऱ्या वसंत मोरेंनी अवघ्या काही महिन्यातच वंचितला रामराम करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षामध्ये प्रवेश केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आगामी विधानसभा निवडणूक ते निश्चित लढतील असा कयास लावण्यात येत होता. हडपसर अथवा खडकवासला विधानसभा मतदारसंघ वसंत मोरे यांच्यासाठी ठाकरेंची सेना महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागा वाटपात आपल्याकडे ठेवेल असं चित्र दिसत होतं. त्यामुळे वसंत मोरे देखील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले होते.
मात्र, जागा वाटपामध्ये या दोन्ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेल्याने वसंत मोरे यांचं यंदा विधानसभा निवडणूक लढवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यामुळे लोकसभा नाही विधानसभा नाही तर आता वसंत मोरे हे आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. याबाबत बोलताना वसंत मोरे म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकी संदर्भात नुकतीच एक पक्षाची बैठक झाली.
या बैठकीमध्ये मी पुणे महापालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून लढाव्यात असं मत मांडलं. मात्र त्या ठिकाणी देखील दोन मतप्रवाह होते. एक मतप्रवाह स्वबळावर निवडणूक लढण्याच्या बाजूने होता. मात्र, जेव्हा चार चार प्रभागांमध्ये शिवसेना निवडणूक लढवते तेव्हा कुठेतरी सेनेची ताकद कमी पडते. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवल्यास ते अधिक योग्य ठरेल असं मी या बैठकीत सांगितलं होतं. आगामी महापालिका निवडणुका लढवणार का?
असं विचारलं असता वसंत मोरे म्हणाले, 100 टक्के मी आगामी महापालिका निवडणुक लढवणार आहे. महापालिका हा माझा बेस आहे. आगामी काळात माझ्यासोबत चार शिवसेनेचे नगरसेवक या भागातून असतील असा विश्वास देखील वसंत मोरे यांनी व्यक्त केला. तसेच जे पाच माजी नगरसेवक सेनेला सोडून गेलेत त्यांनी जे काही मत व्यक्त केला आहे. त्याबाबत आमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.