Uddhav thackeray, Omraje Nimbalkar  Sarkarnama
विशेष

Dharashiv Loksabha 2024 : धाराशिव जिंकायचंच ! उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला; ओमराजेंना सहा सभांचं बळ, पण...

Political News : तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांत 7 मे रोजी मतदान होणार आहे. धाराशिव मतदारसंघात पारंपरिक विरोधक पुन्हा आमनेसामने आल्याने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Political News : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील लढत महायुती व महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार व विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील या दीर-भावजयीमध्ये होत असलेल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांत 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. धाराशिव मतदारसंघात पारंपरिक विरोधक पुन्हा आमनेसामने आल्याने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर महायुतीला (Mahayuti) हतबल करण्यासाठी काही मतदारसंघांवर अधिकचे लक्ष केंद्रित करीत काही लढती प्रतिष्ठेचा केल्याचे जाणवत आहे. उद्धव ठाकरे यांनी धाराशिव मतदारसंघ प्रतिष्ठेचा करताना संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. (Dharashiv Loksabha 2024 News)

विशेषतः त्यांनी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच त्यांनी धाराशिव मतदारसंघात येणाऱ्या पाच विधानसभा मतदारसंघात प्रचारसभा घेत मतदारसंघ पिंजून काढला होता. 7 मार्च रोजी औसा, उमरगा व तुळजापूर मतदारसंघात सभा घेतल्या तर 8 मार्चला वाशी, बार्शी, भूम, परंडा येथे सभा घेतल्या. त्यासोबचतच यावेळी कळंब तालुक्यातील अनेक ठिकाणी जात त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. यावेळी धाराशिवच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांनी जुन्या-जाणत्या नेत्याची मोट बांधण्यावर भर दिला होता.

त्यानंतर प्रचार संपण्यासाठी 24 तासाचा अवधी असताना त्यांनी धाराशिव येथे शेवटची मोठी सभा घेतली. या सभेला शिवसैनिकांनी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे ही सभा चांगलीच गाजली. शिट्ट्या, जल्लोष व घोषणाबाजीमुळे मैदानाचा संपूर्ण परिसर ढवळून निघाला होता. विशेषतः या सभेवेळी मोठी गर्दी झाल्याने सभास्थळी असलेले 'डी' हटवून याठिकाणी बसण्यासाठी जागा करावी लागली होती. त्यामुळे 1995 साली विधानसभा निवडणुकीपूर्वी उमरगा येथे झालेल्या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला झालेल्या गर्दी एवढी गर्दी या सभेला झाल्याची चर्चा जुन्या जाणत्या शिवसेनेच्या नेत्यात या सभेनंतर रंगली होती.

तत्पूर्वी या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार, काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थित शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

दुसरीकडे या सभेच्या चार दिवस आधीच 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. या भर उन्हात झालेल्या सभेस नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी व्यासपिठावर माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री तानाजी सावंत उपस्थित होते. धाराशिव शहरात पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पीएम मोदी आले असल्याने व त्यांनी संपूर्ण भाषण गळ्यात तुळजाभवानी मातेची कवड्याची माळ घालून केले. त्यामुळे या सभेसाठी जमलेल्या नागरिकात त्यांची मोठी क्रेझ दिसून आली.

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे यांच्या पाठीशी उद्धव ठाकरे शेवटपर्यंत उभे राहिले. दुसरीकडे मात्र महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री तानाजी सावंत वगळता अन्य कोणी खंबीरपणे उभे असल्याचे जाणवले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थित शक्तिप्रदर्शन केले. यावेळी अजितदादांची सभा पार पडली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी येथे सभा घेतली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकही सभा झाली नाही.

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंचा तेरणा कारखाना परिसरात शेतकरी मेळावा पार पडला होता. त्यामुळे अर्चना पाटील यांना प्रचार करीत असताना महायुतीच्या पाच आमदारांवरच अवलंबून राहावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटील या भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे त्यांना महायुतीमधील तीन पक्षांकडून मोठे पाठबळ मिळणे आवश्यक होते.

पीएम मोदी व उद्धव ठाकरे यांच्या सभेला जमलेली गर्दी पाहता नक्की ही गर्दी कोण मतदानात रूपांतरित करू शकतो त्याचा विजय निश्चित होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार, हे समजण्यासाठी सर्वांना 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.

SCROLL FOR NEXT