Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

Cabinet Meeting : खटका उडालाच; लाडक्या बहिणीवरून मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे अन अजितदादांच्या मंत्र्यांत खडाजंगी!

Vijaykumar Dudhale

Mumbai, 05 September : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या श्रेयावरून राज्य मंंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या मंत्र्यांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांचे नाव वगळून ही योजना आम्ही आणली, असे सांगितले जात आहे, असा आक्षेप नोंदवून अजितदादा एकटेच कसे या योजनेचे श्रेय घेऊ शकतात, असा सवाल शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात केल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद निवळल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. शासकीय निर्णय झाल्यानंतर अधिकारी बाहेर पडल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आक्षेप घेतले. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या श्रेय एकटे अजितदादा कसे घेऊ शकतात, असा सवाल केला आहे.

मुख्यमंत्र्यांचे नाव काढून त्या ठिकाणी अजित पवार आपले नाव कसे लावू शकतात. अजितदादांचा वादा आणि जाहिरातींवर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई, दीपक केसरकर, दादा भूसे हे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्रमक झाले होते. शिंदे गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या मंत्र्यांच्या वादात अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे.

आगामी काळात कोणीही एकटा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे श्रेय घेणार नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, या योजनेवरून शिंदे गट आणि अजित पवार गटाचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीतच आक्रमक झाले होते. फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले.

हा अट्टाहास कशासाठी?

याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ बैठकीतील वादाला पुष्टी दिली. महायुतीमध्ये वाद होऊ नयेत, या भूमिकेत आम्ही असतो. मात्र, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत मुख्यमंत्री हा शब्द नसावा. हा अट्टाहास कशासाठी?

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली हे आपल्या सरकारचे यश आहे. मग एकच वादा...अजितदादा हे कशासाठी. तुमच्या पक्षाच्या कार्यक्रमात या गोष्टी चालतात. पण सरकारची योजना आम्ही आणली असे सांगणं म्हणजे इतरांना दुखावण्याचा प्रकार आहे. असे वाद उदभवत राहिले तर त्याचा त्रास सर्वांनाच होणार आहे, असा इशाराही शिरसाट यांनी दिला.

शिंदे गटाला एवढी मळमळ होण्याचे कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, तानाजी सावंतांनी केलेल्या घाणेरडे विधानासंदर्भात शिंदे गटाने आज भूमिका स्पष्ट करायला हवी होती. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान केला.

त्यावर बोलण्याऐवजी लाडकी बहिण योजनेचा प्रचार करणाऱ्या अजित पवारांबाबत शिंदे गटाला एवढी मळमळ होण्याचे काहीच कारण नाही. सरकारची योजना म्हणून राष्ट्रवादीकडून प्रचार केला जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT